काश्मीर कलम 370: काँग्रेस काश्मीरच्या मुद्द्यावरून दुभंगली आहे का?

    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याच्या चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षातून वेगवेगळे सूर उमटल्याचं सर्वांनीच पाहिलं.

पक्षाची आजची स्थिती काय आहे याची ही एक झलक होती.

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद एकीकडे म्हणत होते की कलम 370ने राज्याचे तीन भाग असणाऱ्या जम्मू, काश्मीर आणि लडाखला धार्मिक आणि सांस्कृतिकरीत्या एकत्र बांधून ठेवलं होतं. पाच ऑगस्टची नोंद भारताच्या इतिहासात काळ्या अक्षरांमध्ये केली जाईल आणि सरकारने जम्मू-काश्मीरलाच 'तुकडे- तुकडे करून आणि कलम 370 संपुष्टात आणत संपवून टाकलं आहे.'

भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातला हा सर्वांत वाईट दिवस असल्याचं माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं. पण काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं मात्र वेगळं होतं.

ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी म्हणाले, "स्वातंत्र्याच्या वेळी एक चूक झाली होती. उशिरा का होईना ती सुधारण्यात आली आणि याचं स्वागत करणं योग्य आहे."

ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवर लिहिलं, "जम्मू-काश्मीर आणि लडाखविषयी उचलण्यात आलेली पावलं आणि भारताच्या संपूर्ण एकीकरणाचं मी समर्थन करतो. घटनात्मक प्रक्रियेचे जर पूर्णपणे पालन करण्यात आलं असतं तर बरं झालं असतं. सोबतच इतर कोणतेही प्रश्न उभे राहिले नसते. पण राष्ट्रहितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मी याला पाठिंबा देतो."

कलम 370 विषयी भूमिका

दीपेंदर सिंह हुड्डांनी लिहिलं, "21व्या शतकामध्ये कलम 370 योग्य नाही आणि ते हटवण्यात यायला हवं असं मला सुरुवातीपासूनच वाटत होतं."

करण सिंह म्हणाले की जे काही झालंय ते पूर्णपणे वाईट नाही त्यात काही सकारात्मक गोष्टीही आहेत.

काँग्रेसच्या सुष्मिता देव यांनी बीबीसीशी बोलताना काँग्रेस वर्किंग कमिटीने मंजूर केलेल्या प्रस्तावाचा दाखला दिला. यामध्ये 'सर्व सहमतीने' मंजूर करण्यात आलेलं भाजप सरकारचं हे पाऊल एकतर्फी, लोकशाहीच्या विरोधात आणि निर्ल्लज्जपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलंय, "आम्ही गाई-म्हशी नाहीत. आमचेही काही विचार आहेत."

एकीकडे या गोष्टी होत असताना राज्यसभेमध्ये काँग्रेस व्हिप भुवनेश्वर कलिता यांनी कलम 370वर पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे राजीनामा दिला. 'एकाच देशात दोन घटना असू नयेत' असं मत त्यांनी व्यक्त केलं.

धोरणाविषयी प्रश्नचिन्ह

हे सगळं अशावेळी होतंय जेव्हा पक्षामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह आहे. राहुल गांधींचा राजीनामा अजूनही स्वीकारण्यात आलाय की नाही याविषयी पक्षाकडून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नवा नेता कोण असेल, हे अजूनही स्पष्ट नाही.

देशातल्या सर्वांत जुन्या आणि या घडीला सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाची ही अवस्था असेल तर संपूर्ण विरोधी पक्षाची काय परिस्थिती आहे याचा अंदाज बांधणं कठीण नाही.

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्यामते अशा मोठ्या मुद्दयावर काँग्रेससारख्या मतमतांतर असणं आश्चर्याची गोष्ट नाही, पण त्यांना दोन गोष्टींचं आश्चर्य वाटतंय.

पहिली गोष्ट म्हणजे कलम 370 हटवण्याची बाब भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक वर्षांपासून आहे. आणि भाजप एवढ्या मोठ्या संख्याबळाने सत्तेत परत आलेली असताना आतापर्यंत काँग्रेसने या मुद्द्यावरचं आपलं धोरण का ठरवलं नाही?

दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस दीर्घ काळ सत्तेत राहिली आहे. असं असूनही सरकार संसदेच्या सत्राच्या शेवटच्या दिवसांमध्ये कोणतं विधेयक किंवा आदेश सादर करणार आहे याचा जरादेखील सुगावा त्यांना कसा लागला नाही?

कुटुंबाची विचारसरणी

याबाबत विविध मार्गांनी काही जणांना तरी हे समजलं असणार. असं असताना काँग्रेसला सरकारच्या या हेतूविषयी समजलंच नाही, हे कितपत शक्य आहे?

जाणकारांचं असं म्हणणं आहे की सध्या सगळी भाजप ज्याला राष्ट्रभक्ती म्हणते त्याचा माहोल आहे. आणि काँग्रेस नेतृत्न खिळखिळं झालेलं आहे. तरुणांशी जवळीक साधणारे तरूण काँग्रेस नेते आपला पाया मजबूत करत आहेत.

पत्रकार राधिका रामाशेषन यांच्यानुसार, "ज्योतिरादित्य सिंधिया आणि दीपेंदर हुड्डा यांच्यासारख्या नेत्यांची उठबस आजच्या पिढीसोबत आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे जनसंघ परिवारातलेच असल्याचं विसरून चालणार नाही. त्यांची आजी राजमाता विजयाराजे सिंधिया या जनसंघाच्या आणि नंतर भाजपच्या मोठ्या नेत्या होत्या. म्हणूनच मला वाटतं की त्यांच्यावर कुटुंबाच्या या विचारसरणीचा परिणाम होतच असणार."

जनार्दन द्विवेदींच्या बद्दल त्या म्हणतात, "मी त्यांच्याशी जेव्हाही बोलले, तेव्हा मला नेहमीच असं वाटलं की ते थोडे मवाळ हिंदुत्त्वाच्या बाजूने झुकलेले आहेत."

राधिका रामाशेषन म्हणतात, "आजच्या तरुणांचे जे विचार आहेत - मी असं म्हणत नाही की हे विचार योग्य आहेत वा नाहीत - पण त्यांनी आज भारताला व्यापलंय. तरूण या सगळ्यांवर प्रभावित आहेत आणि नेत्यांना असं वाटलं की संसदेत किंवा बाहेर ते जे बोलतात त्यावर, त्यांच्या विचारांवर तरुणांच्या विचारांची छाप असल्याचं दिसायला हवं."

राहुल, सोनियांचं मौन

लोकांना बुचकळ्यात टाकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या निर्णयाबद्दल राहुल गांधी आणि सोनिया गांधींना संसदेमध्ये मोकळेपणाने आणि ठामपणे आपली बाजूनं मांडणं.

या बाबत राहुल गांधींनी एक ट्वीट जरी केलं असलं तरी इतक्या मोठ्या आणि गंभीर मुद्द्यावर पूर्ण पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच इतर भारतीयही त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होते. पक्षाचे याविषयीचे विचार त्यांना जाणून घ्यायचे होते.

नीरजा चौधरी म्हणतात, "आज काँग्रेस इतकी दिशाहीन, नेतृत्वहीन झाली आहे की एवढ्या महत्त्वाच्या दिवशीदेखील नेतृत्त्व काहीच बोललं नाही. काहीतरी पवित्रा घ्यायला हवा होता. काही तरी बोलायला हवं होतं. हे असे निर्णय आहेत की ज्याचा संदर्भ लोक 50 वर्षांनंतरही देतील. पण काँग्रेसचं नेतृत्त्व यावर 10 मिनिटंही बोलायला तयार नव्हतं."

अधीर रंजन यांनी वाढवल्या अडचणी

लोकसभेमध्ये काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या कामगिरीवरूनही तज्ज्ञ नाराज आहेत.

लोकसभेतल्या चर्चेदरम्यान एकदा तर त्यांनी काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे की द्वीपक्षीय प्रश्न याविषयी सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं. संयुक्त राष्ट्रांचा उल्लेखही त्यांनी केला.

नीरजा चौधरी म्हणतात, "अधीर रंजन चौधरी अतिशय गोंधळलेले होते. त्यांनी काश्मीरविषयी बोलताना संयुक्त राष्ट्र, द्विपक्षीय मुद्द्यांचा उल्लेख केला. काश्मीर हा भारताचा हिस्सा नसल्याचं उघडउघड म्हणणं ही काँग्रेससाठीची अडचण आहे."

"त्यांना लोकसभेतला काँग्रेसचा नेता म्हणून निवडणंच आश्चर्यात टाकणारं होतं. जर काँग्रेसला भाजपला टक्कर द्यायची असेल तर त्यांना ममता बॅनर्जींकडे पहायला हवं आणि ममता आणि अधीर रंजन चौधरी यांचं अजिबात जमत नाही. काँग्रेसचा नेमका विचार काय आहे, हेच समजत नाही."

राधिका रामाशेषन म्हणतात, "माझ्या माहितीनुसार ज्या दिवशी लोकसभेत चर्चा झाली, त्या दिवशी सकाळी काँग्रेसच्या बैठकीत चर्चेच्या नावाखाली काहीच झालं नाही. मनीष तिवारी आणि शशी थरूर यांनी ते काय बोलणार आहेत ते सांगितलं. अधीर रंजन चौधरी गप्प होते. ते काय बोलणार आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि ते जे काही बोलले त्याने काँग्रेस मोठ्या अडचणीत आली."

कलिता वेगळे का झाले?

गेल्या चार दशकांपासून काँग्रेससोबत असणारे आसाममधले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भुवनेश्वर कलिता यांनी पक्षाचा राजीनामा देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

त्यांनी काँग्रेसच्या स्टुडंट विंगसोबतच यूथ विंग आणि एआयसीसी मध्येही काम केलं आहे.

राज्यसभेत इतरांवर लक्ष ठेवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. मतदान कसं करायचं, काय बोलायचं हे ते सांगायचे. पण व्हिप असणारी ही व्यक्तीच उलट राजीनामा देऊन निघून गेली.

बीबीसीसोबत बोलताना भुवनेश्वर कलिता यांनी सांगितलं की पक्षामध्ये कलम 370वरून मतभेद होते आणि त्यांनी पक्ष नेतृत्वाशी बोलण्याचा प्रयत्नही केला होता, पण बोलणं झालं नाही.

काँग्रेसकडून याविषयी काही समजू शकलं नाही. ते म्हणतात, "पक्ष सध्या नेतृत्वहीन आहे. कोणीही नेता नाही, म्हणून प्रत्येक जण आपापलं मत सांगतोय."

सरकारचं समर्थन करण्याबाबत ते सांगतात, "एकाच देशात दोन घटना असू नयेत. काही वर्षांमध्ये हे कलम हळुहळू संपुष्टात आणण्यात येईल असं पंडित नेहरू स्वतः म्हणाले होते. इतर प्रांतातल्या लोकांना मिळणारे फायदे त्यांना होत नाहीत."

"तिथल्या मुलांना शिक्षणाधिकार कायद्याचा फायदा मिळत नाही. कलम 370 गेल्यानंतर सगळ्या कायद्यांचे फायदे तिथल्या लोकांना मिळतील."

कलिता यांच्यानुसार गेल्या काही काळात कलम 370वर पक्षात कधीही चर्चा झाली नाही. मग ते भाजपमध्ये सामील होणार का, ते म्हणतात, "मी नुकताच राजीनामा दिलेला आहे. मी लवकरच निर्णय घेईन कारण मी राजकारणात सक्रीय आहे आणि मला सक्रीय रहायचं आहे."

काँग्रेसची द्विधा मनस्थिती

राधिका रामाशेषन यांच्यानुसार काँग्रेसची मुख्य विचारसरणी आणि त्याचे मुख्य प्रतीक आहेत नेहरू. पण कलम 370 रद्द करण्याची गोष्ट ही जनसंघ आणि त्यानंतर भाजपच्या विचारसरणीशी निगडीत आहे.

त्या म्हणतात, "जर काँग्रेसने सरकारचं समर्थन केलं तर ते त्यांच्या मूळ विचारसरणीपासून दूर जात असल्याचा संदेश जाईल. भाजपने राष्ट्रवादाची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकली आहे. भाजपचे प्रयत्न जनसंघाच्या काळापासून सुरू होते आणि आता त्यांनी क्लायमॅक्स गाठलाय. या सगळ्यांत काँग्रेसची विचारसरणी कुठेच बसत नाही."

"म्हणूनच मला असं वाटतं की काँग्रेसची द्विधा मनस्थिती झाली आहे. जर पक्ष स्वतःच द्विधा विचारात असेल तर त्यांच्याकडून स्पष्टतेची अपेक्षा कशी करायची? कधी हा पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाविषयी बोलतो तर कधी सेक्युलरिझमविषयी. पक्षाला विचारसरणी नाही, नेतृत्त्व नाही. धोरणात्मक बोलायला कोणी तयार नाही," रामाशेषन सांगतात.

कसला विचार करतायत काँग्रेसचे तरूण नेते?

राधिका म्हणतात, "गुलाम नबी आझाद असोत वा आनंद शर्मा, नेतृत्त्वच नसल्याने पवित्रा घेण्यास सर्व कचरत आहेत. काँग्रेस हा असा पक्ष आहे जो एका कुटुंबाशी बांधलेला आहे आणि आज जेव्हा कुटुंब काहीच बोलायला तयार नाही तेव्हा काय बोलायचं, काय करायचं हे पक्षाच्या लक्षातच येत नाही. म्हणूनच प्रत्येकजण जे मनात येईल ते बोलतोय."

तर नीरजा चौधरींच्यानुसार, "यापुढे अजून खूप मोठा राजकीय कालावधी आपल्याकडे आहे याची पक्षातल्या तरूण नेत्यांना जाणीव आहे. देशाची विचारसरणी वेगळी होतेय. मोठे - ज्येष्ठ नेते अजून ४-५ वर्षं राजकारणात असतील. म्हणूनच तोपर्यंत ते म्हणतायत तसं चालू द्यावं."

"बुडती नाव सगळेच सोडतात. २०१४मध्ये पक्षाचं मनोबल खचलं नव्हतं. पण आता पक्ष इतका खचलाय की त्यांच्यात आत्मविश्वासच उरलेला नाही आणि विरोधीपक्षांचं मनोधैर्य हे काँग्रेसशी निगडीत आहे. पक्ष अजूनही कुटुंबावर अवलंबून आहे. आजही पडद्यामागे कुटुंबच निर्णय घेत आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)