You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा: भाजपमधील 'मेगाभरती'चा वेग मंदावणार का?
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी अमरावतीहून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची बहुचर्चित 'महाजनादेश यात्रा' अमरावती जिल्ह्यातल्या मोझरीपासून गुरुवारी सुरू केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सध्या चर्चेत असलेल्या भारतीय जनता पक्षातील 'मेगाभरती' अर्थात पक्षप्रवेशावरही भाष्य केलं. या मेगाभरतीचा वेग कमी करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या घाऊक 'इनकमिंग'वर बोलताना फडणवीस म्हणाले, "भारतीय जनता पक्ष कोणाच्याही मागे पडत नाही. आता वेगवेगळे नेते भाजपच्या मागे फिरतात आणि सांगतात 'आम्हाला प्रवेश द्या, आम्हाला प्रवेश द्या'. जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो, जे योग्य नाहीत त्यांना सांगतो 'हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे, आता येथे जागा नाहीये. तुम्ही तुमचा मार्ग शोधा कारण आता आमच्याजवळ तुमच्याकरता व्यवस्था नाहीये'."
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक,कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ या नेत्यांना बुधवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांना आणण्याची मोहीम मंदावणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय जनता पक्ष आता या पक्षप्रवेशाचा वेग कमी करेल आणि अत्यंत निवडक पद्धतीनं प्रवेश देईल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
पक्षप्रवेशाचा वेग कमी होण्याची कारणं काय?
ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सांगतात की, "आता भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे लोक आलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता आणखी नेत्यांची गरज नसावी. 'जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो,' असं मुख्यमंत्री सांगत असले तरी जे नेते भाजपमध्ये आले आहेत ते वेगवेगळ्या कारणांनी आलेले आहेत. काहींवर गैरप्रकारांच्या आरोपांमुळे कारवाईची टांगती तलवार होती तर काहींच्या संस्था अडचणीत होत्या, त्यामुळे त्यांना सत्ताधाऱ्यांसोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता."
'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामागची दोन कारणं सांगितली. "पहिली गोष्ट म्हणजे, हा संकेत आहे की युती होणार हे जवळजवळ पक्कं आहे. भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळेच्या ज्या जागांची कमतरता असेल ती भरून काढण्याची त्यांची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे ते आता घाऊक पद्धतीनं पक्षप्रवेश देणार नाहीत. पुढच्या काळात ते सिलेक्टिव्ह असू शकतात. अगदीच जे मोठे नेते आहेत किंवा विशिष्ट समाजगटाचं नेतृत्व करणाऱ्या एखाद्या नेत्याला प्रवेश देऊ शकतील.
"दुसरा मुद्दा म्हणजे पक्षांतराची ही मोहीम अंगलटही येऊ शकते. पक्षांतर करणाऱ्यांच्या बाबत सामान्यांच्या मनात एकप्रकारचा राग असतो. जर पक्षांतराची ही मोहीम अशीच सुरू राहिली तर आयारामांना प्रवेश देणारा पक्ष म्हणून भाजपबाबतही नकारात्मक भावना होऊ शकते. याची जाणीव झाल्यामुळेही मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं असावं."
'अगोदरच्या सरकारमधील मंत्र्यांना जनतेची चिंता नव्हती'
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील माजी मंत्री भाजप आणि शिवसेनेत येत असताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, "अगोदरच्या सरकारमधील मंत्र्यांना जनतेची चिंता नव्हती, त्यांना चिंता होती त्यांची स्वत:ची, त्यांना चिंता होती त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या कारखान्याची. हे असे कोडगे होते की ज्यांना असं वाटत होतं की आम्ही काहीही केलं तरी जनता आमच्या पाठीशी आहे."
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात राहिलेले बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, नारायण राणे, विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड हे सध्या भारतीय जनता पक्षासोबत आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून गणेश नाईकांच्या प्रवेशाचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर सचिन अहिर, जयदत्त क्षीरसागर हे नेते भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसोबत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत बोलताना विजय चोरमारे म्हणतात की, "मुख्यमंत्री ज्या लोकांच्या संदर्भात टीका करत आहेत, त्यातल्या अनेकांना त्यांनी पक्षात घेतलं आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस - राष्ट्रवादीतून घेतलेले साधारण पंचवीस लोक त्यांनी घेतलेले आहेत, आणि ते आता त्यांच्यासोबत आमदार आहेत. आता पक्षवाढीसाठी त्यांनी मोहिते-पाटलांपासून, विखे-पाटलांपासून ते मधुकर पिचडांपर्यंत ही सगळी मंडळी घेत आहेत. ती पुन्हा तीच मंडळी आहेत. ते ज्या दोषांबाबत बोलत आहेत ते असलेली मंडळींनाच त्यांनी सोबत घेतले आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)