उन्नाव बलात्कार: आमदार कुलदीप सिंह सेंगर अटकेत, पण प्रकरणातलं गूढ कायम

फोटो स्रोत, ANUBHAV SWARUP YADAV
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, बीबीसी हिंदीसाठी
"ही दुर्घटना नाहीये. सर्व जाणीवपूर्वक केलं गेलंय. आमदाराची माणसं हे सर्व करतायत. अनेकवेळा धमक्या दिल्या गेल्या. तडजोड करण्यासाठी दबाव आणला गेला. आमदार जेलमध्ये आहे, पण त्याची माणसं बाहेर आहेत. आम्हाला न्याय हवाय."
हे शब्द आहेत उन्नाब बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईचे.
लखनऊच्या केजीएमयू हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या बाहेर उन्नाव बलात्कार पीडितेची आई सैरभैर होऊन फिरत होती आणि कमी वेळेत खूप काहीतरी सांगायचंय, अशा पद्धतीने त्या माध्यमांशी बोलत होत्या.
कुटुंबातील व्यक्तींना जेलमध्ये टाकण्याच्या किंवा थेट हत्याच करण्याच्या धमक्या गेल्या काही दिवसांपासून दिल्या जात असल्याचं पीडितेची आई सांगत होती.
जेलमध्ये असलेल्या काकाला भेटण्यासाठी उन्नावहून रायबरेलीला जात असताना ट्रकने धडक दिली. या घटनेत पीडितेच्या काकी आणि मावशीचा मृत्यू झाला. बलात्कार पीडितेच्या कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे सर्वजण बलात्कार पीडित आणि वकील एकाच गाडीत होते. त्यामुळे या घटनेत बलात्कार पीडित आणि वकीलही गंभीर जखमी झाले आहेत. लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दोघांवरही उपचार सुरू आहेत.

फोटो स्रोत, UTTAR PRADESH POLICE
या घटनेप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी 302, 307, 506 आणि 120-बी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यासह 10 जणांची नावं आहेत.
'कट नव्हे, दुर्घटना!'
बलात्कार पीडितेची आई ज्यावेळी माध्यमांशी बोलत होती, त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांची प्रतिक्रिया आली की, "प्राथमिकदृष्ट्या ही एक दुर्घटनाच असल्याचं दिसतंय. यात कुठल्याही कटासारखी गोष्ट दिसत नाहीय."
पोलीस महासंचालकांचं विधान रायबरेलीचे पोलीस अधीक्षक सुनील कुमार सिंह यांच्या विधानासारखंच होतं. सुनील कुमार सिंह यांनी घटनेच्या प्राथमिक माहितीवर या घटनेला केवळ एक दुर्घटना म्हटलं होतं.
सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत, सगळीकडे ज्यावेळी या घनटेची चर्चा होऊ लागली, त्यानंतर लखनऊ विभागचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजीव कृष्ण यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
ते म्हणाले की, "घटनास्थळावरील सर्व गोष्टी तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. तपास अहवाल आल्यानंतर CBI चौकशी केली जाईल. ज्या ट्रकच्या धडकेने दुर्घटना घडली, त्या ट्रकचा चालक, मालक आणि क्लीनरला अटक करण्यात आली आहे."
पीडितेच्या कारला धडक देणाऱ्या ट्रकच्या नंबर प्लेटला काळं फासण्यात आलं होतं. अतिरिक्त पोलीस महासंचालक राजीव कृष्ण यांनी याबाबत सांगितलं, "ट्रकचा मालक ट्रकचे हप्ते देऊ शकत नव्हता आणि पैसे देणारी व्यक्ती वारंवार त्रास देत होती. त्यामुळे मालकाने ट्रकच्या नंबर प्लेटवर ग्रीस लावलं होतं."
पीडितेसाठी सहा सुरक्षारक्षक नेमले असताना घटनेवेळी एकही नव्हता!
बलात्कार पीडितेला सहा सुरक्षारक्षक सरकारकडून पुरवण्यात आले होते. मात्र, या घटनेवेळी त्यातला एकही जण पीडितेसोबत नव्हता. या गोष्टीचीही चौकशीही केली जाणार आहे.

फोटो स्रोत, TWITTER
याबाबत पीडितेच्या आईने माध्यमांना सांगितल की, "सुरक्षारक्षकांची काहीच चूक नाहीय. एका सुरक्षारक्षकाच्या घरी कुणीतरी आजारी होतं. त्यामुळे ते निघून गेले होते आणि तसंही गाडीत जागा नव्हती."
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला धारेवर धरलं जात आहे.
ही घटना म्हणजे एक कट आहे, असं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या घटनेला 'दुर्घटना' मानत नाहीत. शिवाय, योगी सरकारची कायदा व सुव्यवस्था मृतावस्थेत आहे, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी उत्तर प्रदेशच्या बाहेर झाली तरच पीडितेला न्याय मिळेल, असं म्हटलं.
थ्रिलर सिनेमासारखी घटना
28 जुलै रोजीच्या या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. यातील एक महिला बलात्कार प्रकरणातील साक्षीदार होती. दुसऱ्या साक्षीदाराचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता.
बलात्कार पीडितेच्या वडिलांचं आधीच निधन झालं आहे. तिचे काका काही प्रकरणामुळे जेलमध्ये आहेत. रायबरेलीतील जेलमध्ये काकांना भेटण्यासाठीच कारने जात असताना ट्रकनं उडवलं.

फोटो स्रोत, FACEBOOK/IKULDEEPSENGAR
या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम एखाद्या थ्रिलर सिनेमासारखा आहे.
2017 च्या जून महिन्यात उन्नावच्या बंगारमऊचे भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.
पीडिता मुलगी आमदार सेंगर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यास गेली असताना, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती. अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी कोर्टात जाण्याचा मार्ग अवलंबला होता.
पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी आमदार सेंगर यांच्याकडून दबाव आणण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. न्यायासाठी उन्नावच्या प्रत्येक पोलिसाकडे मदत मागितली, पण कुणीही माझं ऐकलं नाही, असं पीडित मुलगी सांगते
पीडित मुलीच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आमदार सेंगर यांचे भाऊ अतुल सिंह आणि त्यांच्या काही साथीदारांनी पीडितेच्या वडिलांना मारहाण केली होती. शिवाय, तिच्या वडिलांविरोधातच पोलिसात गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवलं होतं.
अखेर भाजप आमदाराच्या या सर्व त्रासाला कंटाळून पीडित मुलगी आणि तिच्या आईनं गेल्या वर्षी 8 एप्रिल रोजी लखनऊमध्ये मुख्यमंत्री निवासात येऊन, अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना वाचवण्यात आलं. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पीडितेच्या वडिलांचा जेलमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतरच हे सर्व प्रकरण उघडकीस आलं.

फोटो स्रोत, ANUBHAV SWARUP YADAV
चार महिन्यानंतर पोलीस कोठडीतच पीडितेच्या वडिलांच्या मारहाणीच्या साक्षीदाराचा जेलमध्ये गूढरित्या मृत्यू झाला.
बलात्कारप्रकरणी आमदार सेंगर अखेर अटकेत
भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्या माखी नामक गावातील शेजारील अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला. चहूबाजूंनी दबावानंतरही त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती. मात्र, कोर्टाने सरकारला फटकारल्यानंतर सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर गेल्या वर्षी 13 एप्रिल रोजी आमदार सेंगर यांना अटक करण्यात आली.
आमदार कुलदीप सेंगर आणि त्यांचे कुटुंबीय मात्र या सर्व प्रकाराला कट म्हणत आहेत. सेंगर यांचे कुटुंबीय म्हणत आहत की, "पीडितेच्या वडील आणि काकांवर गुन्हा दाखल आहे आणि काही जणांच्या मदतीने हे लोक कट रचून आमदाराला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत."
या संपूर्ण प्रकरणी एसआयटीचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी 363, 366, 376 आणि 506 या कलमान्वये खटला दाखल केला. घटनेवेळी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोक्सोअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








