You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Man Vs. Wild: नरेंद्र मोदी झळकणार डिस्कव्हरी वाहिनीवरील बेअर ग्रिल्सच्या मॅन व्हर्सेस वाइल्ड या शोमध्ये
तुम्हाला मॅन व्हर्सेस वाईल्डमधले बेअर ग्रिल्स माहीतच असतील. घनदाट जंगलात, पर्वतांवर, नद्यांच्या किनाऱ्यावर हिंस्त्र प्राण्यांच्या आजूबाजूला अविश्वसनीय अॅडव्हेंचर करणारा बेअर ग्रिल्स.
आता बेअर ग्रिल्स यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. मॅन व्हर्सेस वाईल्ड शोचा हा एपिसोड 12 ऑगस्टला रात्री 9 वाजता डिस्कवरी चॅनलवर प्रदर्शित होईल.
खुद्द बेअर ग्रिल्स यांनी या एपिसोडचा टिजर रिलीज केला आहे. हा टीजर रिलीज झाल्यानंतर काही मिनिटांतच ट्विटरवर #PMModionDiscovery टॉप ट्रेंड होत आहे.
टीजरमध्ये पंतप्रधान मोदी बेअर ग्रिल्ससोबत बिंधास्त फिरत असल्याचं दिसत आहे.
व्हीडिओमध्ये मोदी बेअर ग्रिल्सचं भारतात स्वागत करतात. बेअर ग्रिल्स मोदींना बोलतात, "तुम्ही भारताचे सर्वांत खास व्यक्ती आहात, तुम्हाला सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे."
पंतप्रधान मोदींनीही हा टिजर ट्विटरवर शेअर केला. मोदींनी लिहिलं, "भारत - जिथं तुम्ही हिरवेगार जंगल, सुंदर पर्वत, नद्या आणि वन्यप्राणी पाहू शकता. हा कार्यक्रम पाहून तुम्हाला भारतात येण्याची इच्छा होईल. भारतात आल्याबद्दल बेअर ग्रिल्स यांचे आभार."
या टिजरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
मॅन व्हर्सेस वाईल्डचं पुलवामा कनेक्शन
दलित काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विटर करण्यात आलं आहे. "आता लोकांना सत्य कळेल. जेव्हा पुलवामा हल्ला होत होता आणि आपले जवान देशासाठी जीव देत होते, तेव्हा नरेंद्र मोदी बेअर ग्रिल्ससोबत डिस्कवरीच्या कार्यक्रमाची शुटिंग करत होते. पंतप्रधान मोदी ही लज्जास्पद गोष्ट आहे."
मुळात, पुलवामा हल्ला झाला होता, त्यावेळी पंतप्रधान मोदींची जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यातील काही छायाचित्रे समोर आली होती.
फेब्रुवारी 2019 मध्ये काँग्रेसने म्हटलं होतं, "सीआरपीएफ जवानांवर हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी जिम कॉर्बेटला गेले आणि एक जाहिरात शूटिंग करण्यात व्यस्त होते."
तेव्हा कांग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते, "नरेंद्र मोदींनी तर वेळेवर प्रतिक्रिया पण दिली नाही. दिवसभर जिम कॉर्बेटमध्ये फिरत राहिले. जाहिरातीचं शूटिंग करत होते. देश आपल्या शहिदांचे मृतदेह गोळा करत होता आणि पंतप्रधान मोदी आपली घोषणाबाजी करून घेत होते. हे मी नाही, पत्रकारांनी फोटोसह लिहिलं आहे."
यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी याचं प्रत्युत्तर दिलं. "काँग्रेस ही सेना प्रमुखांना गुंड म्हणणारा पक्ष आहे. ते सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतात. पक्षाच्या अध्यक्षा दहशतवाद्याच्या मृत्यूवर रडतात. अशा पक्षाने भाजपला देशभक्ति शिकवू नये."
"या देशाचे पंतप्रधान हल्ल्यानंतर चार तास शूटिंग करतात, चहा-नाश्ता करतात, त्यांच्याबद्दल काय बोलावं," असंही सुरजेवालांनी म्हटलं होतं.
आता डिस्कवरीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये नरेंद्र मोदी बेअर ग्रिल्ससोबत चहा पिताना दिसत आहेत.
मॅन व्हर्सेस वाईल्ड : लोकांच्या प्रतिक्रिया
निहाल लिहितात, "जर मी चुकत नसेन तर ही शूटिंग पुलवामा हल्ल्याच्या वेळी झाली होती. ही शरमेची बाब आहे."
बाबा हिंदुस्तानीने ट्विट केलं, "पुलवामा हल्ल्याच्या वेळी ही शूटिंग सुरू होती का?"
तर विनायक यांनी लिहिलं आहे, "बेअर ग्रिल्स लव्ह यू. नरेंद्र मोदी यांचा विजय असो."
तर देवेशने लिहिलं, "वा.. या शोची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे."
डी हब्बालू यांनी लिहिलं, "आपले पंतप्रधान मोदी रॉकस्टार आहेत. बेअर ग्रिल्स तुम्हीसुद्धा कमी नाहीत. तुमचा हा शो बेस्टच असेल."
गणेश लिहितात, "बाल नरेंद्रची कहाणी खरी होणार आहे."
समीर मिश्रा यांनी लिहिलं, "आता पुढची गोष्च ही असेल की नरेंद्र मोदी बिगबॉसमध्ये दिसतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)