You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तीन सख्ख्या बहिणी हरियाणाच्या मुख्य सचिव होतात तेव्हा...
- Author, अरविंद छाब्रा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) प्रशिक्षणादरम्यान केशनी आनंद अरोरा यांना उपायुक्तांच्या कामकाजाबाबत माहिती दिली जात होती, त्यावेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काहीशा नाराजीच्या स्वरात म्हटलं, "तुम्ही यावर इतकं लक्ष का देत आहात? तुम्हाला कुणी जिल्हाधिकाऱ्याचं पद देणार नाही."
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या याच वाक्याचा उल्लेख करत केशनी म्हणतात, "वरिष्ठ अधिकाऱ्याला उत्तर देताना मी म्हटलं होतं, तुम्ही काळजी करु नका. मी एक दिवस जिल्हाधिकारी होईन."
त्या पुढे म्हणाल्या, "कुठल्याच महिलेला जिल्हाधिकारी किंवा त्या तोडीचं महत्त्वाचं पद दिले जाऊ शकत नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत अनेकजण एकमेकांशी पैजाही लावत."
स्वतंत्र राज्य होऊन हरियाणाला 25 वर्ष झाल्यानंतर, 1983 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी केशनी राज्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी झाल्या. याच आठवड्यात केशनी हरियाणा राज्याच्या मुख्य सचिव झाल्या.
केशनी यांची राज्याच्या मुख्य सचिव म्हणून निवड होणं, हे त्यांच्यासह कुटुंबासाठी महत्त्वाची गोष्ट ठरली. याचे कारण केशनी यांच्या आधी त्यांच्या दोन सख्ख्या बहिणीही राज्याच्या मुख्य सचिवपदी विराजमान झाल्या होत्या.
1969 बॅचच्या IAS अधिकारी मिनाक्षी आनंद चौधरी आणि 1975 च्या IAS अधिकारी उर्वशी गुलाटी या दोघीही केशनी आनंद अरोरा यांच्या बहिणी आहेत.
विशेष म्हणजे, केशनी यांच्या आधी मिनाक्षी चौधरी आणि उर्वशी गुलाटी याही राज्याच्या मुख्य सचिव होत्या.
या तिन्ही बहिणी आपल्या यशाचं सर्व श्रेय आई-वडिलांना देतात. त्यातही प्राध्यापक असलेले वडील जीसी आनंद यांच्यामुळे हे शक्य झाल्याचे, या तिन्ही आयएएस बहिणी सांगतात.
"आमच्या वडिलांनी हे स्वप्न पाहिलं होतं, ते आज पूर्ण होत आहे. त्यांनी घरात नेहमी अभ्यासासाठी पोषक वातावरण ठेवलं." असं केशनी यांनी अभिमानाने सांगितलं.
केशनी सांगतात, "तेव्हा घरची स्थिती फारशी चांगली नव्हती. ज्यावेळी थोरली बहीण मिनाक्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या, त्यावेळी मिनाक्षी यांचं लग्न करण्यासाठी नातेवाईकांनी आई-वडिलांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र, आईने म्हटलं की, वाईट काळात तुम्हाला तुमचं शिक्षणच मदत करत असतं."
केशनी यांचं कुटुंब भारत-पाकिस्तान फाळणीनंतर रावळपिंडीतून (पाकिस्तान) भारतात आलं होतं.
लिंगभेदासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या हरियाणासारख्या राज्यातील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी भारतीय प्रशासकीय सेवेची कठीण परीक्षा उत्तीर्ण होतात आणि IAS अधिकारी बनतात. त्यानंतर तिघीही राज्याच्या मुख्य सचिवपदापर्यंत पोहोचतात, ही गोष्ट हरियाणासारख्या राज्याचा विचार केला असता क्रांतिकारक मानली जाते.
गेल्या काही वर्षात हरियाणातील लिंगभेद कमी होऊ लागला आहे. शिवाय, दुसरीकडे राज्य सरकारने सुद्धा 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' सारखे जनजागृती करणारे अभियान राबवले आहेत. मात्र, तरीही मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत अजूनही कमीच आहे.
हरियाणासारख्या राज्यात महिला एखाद्या महत्त्वाच्या पदावर विराजमान झाली आहे, हे पाहण्याची लोकांना सवयच नाही, असे म्हणत केशनी त्यांचा एक अनुभव सांगितला.
त्या म्हणाल्या, "जेव्हा कधी मी एखाद्या भागात दौऱ्यासाठी जायची, त्यावेळी लोकांना वाटायचं की उपायुक्तांची पत्नी आली आहे. मला आठवतंय, लोक तलाठ्याला म्हणत असत की, उपायुक्त साहेबांनी त्यांच्या मुलाला कामाला लावलं आहे वाटतं."
केशनी म्हणतात, "नोकरशाहीत बऱ्याचदा महिलांसाठी काही गोष्टी सहज शक्य नसतात."
पहिल्या पोस्टिंगबद्दल बोलताना केशनी म्हणाल्या, "ज्यावेळी पहिल्यांदा मला उपायुक्त करण्यात आलं, त्यावेळी मला असं सांगण्यात आलं की, जर नीट काम केलं नाहीस, तर पुन्हा कुठल्या महिलेला उपायुक्तपदाची पोस्ट मिळणार नाही. त्यानंतर पुढच्याच वर्षी ज्यावेळी ट्रान्सफर लिस्ट जारी झाली, त्यात दोन महिलांची नावं होती, हे पाहून मला खरंच आनंद झाला."
"महिलांना कायमच आपल्या हक्कांसाठी लढावं लागतं. पुरुष अधिकाऱ्यांना कायम हे सांगावं लागतं की, आमच्याकडे एका अधिकाऱ्यांसारखेच पाहा. महिला आणि पुरुष अशा दृष्टीकोनातून पाहू नका." असे केशनी आपल्या अनुभवावरुन सांगतात.
"आजच्या घडीला परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. मात्र, अजूनही खूप काही बदलण्याची गरज आहे. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांना योग्य वातावरण मिळालं, तर त्या सर्व गोष्टी साध्य करु शकतात." असेही केशनी म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)