You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चिपळूणजवळचं तिवरे धरण फुटलं, 13 ठार 11 जण बेपत्ता
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण अतिवृष्टीमुळे फुटलं आहे. किमान सात गावं पाण्याखाली गेली आहेत. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.
11 जणांचे मृतदेह आतापर्यंत बचाव पथकाच्या हाती लागले आहेत.
तर 13 जण बेपत्ता आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. या घटनेनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या सात गावांमध्ये पूर आला आहे.
दरम्यान दोन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांनी बचावकार्य तातडीनं हाती घेतलं आहे.
या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे धरण भरून वाहू लागलं.
त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचं लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यांसह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे.
यात किमान १९ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
पण,स्थानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी किमान २३ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे.
पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरंही वाहून गेल्याची भीती आहे. ज्या गावांमध्ये धरणाचे पाणी शिरलं आहे त्या गावांत सुमारे ३ हजार इतकी लोकवस्ती आहे.
एनडीआरएफला पाचारण
रत्नागिरी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री साडेदहाच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.
जिल्हाधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. पुणे तसंच सिंधुदुर्गातून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने दिली.
ही दुर्घटना अलोरे-शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत घडली असून स्थानिक पोलीस सुरुवातीपासूनच युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत.
बेपत्ता व्यक्तींची नावं
1) अनंत हरिभाऊ चव्हाण (६३)2) अनिता अनंत चव्हाण (५८)3) रणजित अनंत चव्हाण (१५)4) ऋतुजा अनंत चव्हाण (२५)5) दूर्वा रणजित चव्हाण (दीड वर्ष)6) आत्माराम धोंडू चव्हाण (७५)7) लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२)8) नंदाराम महादेव चव्हाण (६५)9) पांडुरंग धोंडू चव्हाण (५०)10) रवींद्र तुकाराम चव्हाण (५०)11) रेश्मा रवींद्र चव्हाण (४५)12) दशरथ रवींद्र चव्हाण (२०)13) वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८)14) अनुसिया सीताराम चव्हाण (७०)15) चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५)16) बळीराम कृष्णा चव्हाण (५५)17) शारदा बळीराम चव्हाण (४८)19) संदेश विश्वास धाडवे (१८)20) सुशील विश्वास धाडवे (४८)21) रणजित काजवे (३०)22) राकेश घाणेकर(३०)
रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयानं ही नावं जाहीर केली आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)