IPS अजय पाल शर्मा यांनी बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. बलात्काराच्या आरोपीला IPSने गोळ्या घातल्या

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये पोलीस अधीक्षक अजय पाल शर्मा यांनी हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला पायावर गोळ्या झाडून पकडलं आहे. नाझील नावाच्या तरुणाने 6 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली, असा त्याच्यावर आरोप आहे.

7 मे रोजी या मुलीचे अपहरण झाल्याची नोंद झाली होती. या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता. आरोपी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यावर अजय पाल शर्मा यांनी आरोपीच्या पायांवर गोळ्या झाडून त्याला पकडलं.

आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांवर गोळ्या झाडल्यावर गोळीनेच उत्तर मिळेल असं अजय पाल शर्मा यांनी म्हटलं आहे. एबीपी न्यूजने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

2. ...अन्यथा सत्तेची आसनं शेतकरी जाळून खाक करतील- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री कोण होईल, याची मला पर्वा नाही. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहाणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा. अन्यथा ते सत्तेची आसने जाळून खाक करतील, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री आमचा होणार की तुमचा होणार, याची मला पर्वा नाही. मी शेतकऱ्यांशी बांधील आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. आमचे घट्ट जुळले आहे. युती घट्ट आहे, असंही ते म्हणाले.

युती करताना शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती ही पहिली अट होती. ती मान्य करून फडणवीस यांनी कर्जमुक्ती जाहीर केली. पीक विमा योजना आणि कर्जमाफी याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही हे तपासण्यासाठी आपण दौरे करत आहोत, असंही त्यांनी सांगितले. हे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केलं आहे.

3. राजस्थानमध्ये वादळी पावसामुळे मंडप कोसळून 14 ठार

राजस्थानमधील बाडमेरमध्ये रविवारी वादळी पावसामुळे मंडप कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

बाडमेरमधील जसोल गावामध्ये रामकथेचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये 20 लोक जखमी झाले आहेत.

जसोल गावामध्ये रामकथेच्या कार्यक्रमावेळेस अचानक पाऊस पडू लागला. या पावसामुळे मंडप कोसळला आणि वीजपुरवठा सुरू राहिल्याने लोकांचा शॉक लागून मृत्यू झाला. याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. मुंबईत मंगळवारी मॉन्सून

मुंबईमध्ये तब्बल 13 दिवस उशिरा म्हणजे मंगळवारी मॉन्सून येईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या 48 तासांमध्ये मुंबईसह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ मॉन्यूनने व्यापेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे.

भारतीय हवामान विभागानं रविवारी जाहीर केलेल्या पावसाच्या आकडेवारीतून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसतूट असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबईतही आतापर्यंत सरासरीहून 66 टक्के पाऊस कमी पडला आहे. तर उपनगरांमध्ये 50 टक्के पाऊस कमी पडल्याची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्राची एकूण सरासरी 59 टक्के, मराठवाड्याची 60 टक्के तर विदर्भाची एकूण सरासरी 78 टक्के कमी आहे. महाराष्ट्र टाइम्सने बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

5. जैश-ए-मोहम्मदच्या 4 कट्टरपंथीयांना कंठस्नान

जम्मू आणि काश्मीरमधील दारामदोरा कीगाममध्ये झालेल्या चकमकीत 4 कट्टरपंथींना भारतीय सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलं आहे.

अन्सार गझ्वातुल हिंद ग्रुप या संघटनेचे शौकत अहमद, आझाद अहमद खांडे, सुहैल युसुफ, रफी हसन मीर या चार जमांचा मृतांमध्ये समावेश आहे. या चौघांकडे शस्त्रास्त्रं सापडल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

कट्टरपंथी लपलेल्या जागेला सुरक्षा दलांनी वेढा दिल्यावर त्यांनी गोळीबार सुरु केला आणि त्यात 4 जणांचा मृत्यू झाला. इंडिया टुडेने हे वृत्त् प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)