'जय श्री राम'च्या घोषणा संसदेत नको, मंदिरात द्या - खासदार नवनीत कौर राणा #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. 'जय श्री राम'च्या घोषणा संसदेत नको, मंदिरात द्या - खासदार नवनीत कौर राणा

"जय श्रीरामच्या घोषणा देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्यासाठी मंदिरं आहेत. सगळे देव एकच आहेत यावर माझा विश्वास आहे. मात्र जय श्रीरामचे नारे संसदेत देणं योग्य नाही," असं मत नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्ता आणि ANI या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे.

सोमवारी (17जून) लोकसभेत खासदारांचा शपथविधी झाला. नवनीत कौर राणा यांनी सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर काही खासदार जोर जोरात जय श्रीरामच्या घोषणा देत होते.

नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत. त्या अमरावतीतून निवडून आल्या आहेत.

नवनीत कौर राणांच्या मागणीवर सरकारतर्फे त्यांना उत्तर दिलं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

2. कृषी, उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची पीछेहाट - आर्थिक पाहणी अहवाल

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra economic survey 2018-19) सादर करण्यात आला. दरडोई उत्पादनात कर्नाटक, तेलंगाणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. TV9 मराठीनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

गेल्या वर्षी दुष्काळामुळे राज्यातील कृषी उत्पादनात 8 टक्के घट अपेक्षित असल्याची चिंताजनक बाब राज्याच्या 2018-19 च्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे.

कृषी आणि संलग्न क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद केलं आहे. मागील वर्षी हा दर 3.1 टक्के होता.

कृषी क्षेत्रासोबतच उद्योग क्षेत्रातही घट पाहायला मिळत आहे. उद्योग क्षेत्रात 0.7 टक्के घट होण्याचा अंदाज आहे.

3. संजीव पुनाळेकरांच्या जामिनाला CBIचा विरोध

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी संजीव पुनाळेकरांच्या जामीन अर्जाला CBIने विरोध केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला संजीव पुनाळेकर यांनी संशयित आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला आहे,' असा युक्तिवाद CBIचे वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी सोमवारी कोर्टात केला.

विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या कोर्टात ही सुनावणी पार पडली.

"अ‍ॅड. पुनाळेकर यांनी वकिली क्षेत्राची लक्ष्मणरेषा ओलांडून एक साधक म्हणून दुसऱ्या साधकाला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांना जामीन नाकरण्यात यावा," असं अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी म्हटलं.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याचा जबाब कर्नाटक 'एसआयटी'ने नोंदविला आहे. या जबाबात त्याने पूर्ण शस्त्र नष्ट न करता त्याचे काही सुट्टे भाग करून ठाणे येथील खाडीत फेकून द्यावे, असा सल्ला अ‍ॅड. पुनाळेकर यांनी दिला असल्याचं म्हटलं आहे.

4. ममता बॅनर्जी यांच्या आश्वसनानंतर डॉक्टरांचा संप मागे

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत दीड तास चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे. बंगालमध्ये गेल्या आठवड्याभरापासून डॉक्टर संपावर होते.

डॉक्टरांनी मांडलेल्या मागण्यांवर ममता बॅनर्जी यांनी तातडीनं कृती करण्याचं आश्वासन दिल्यानंतर डॉक्टर संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. सरकार आणि डॉक्टर यांच्यात झालेल्या चर्चेचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं होतं.

काम करताना पुरेशी सुरक्षा आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा द्याव्यात अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.

डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत सरकार 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवेल तसंच अशा गुन्हेगारांविरुद्ध कडक आणि त्वरित कारवाई केली जाईल, असं बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या आठवड्यात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलं असल्याचंही या बातमी म्हटलं आहे.

5. उष्माघातापासून बचावासाठी बिहारमध्ये संचारबंदी लागू

उष्माघातापासून लोकांना वाचवण्यासाठी बिहारच्या गया जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उष्माघातामुळे बिहारमध्ये आतापर्यंत 61 लोकांचा मृत्यू झाला आहे. NDTV इंडियानं ही बातमी दिली आहे.

जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी रविवारपासून कलम 144 लागू केलं आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे कलम लागू असणार आहे. संपूर्ण गया जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल आहे.

या काळात सरकारी आणि बिगर सरकारी बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच MGNREGA, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर जमावांवर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)