You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गिरीश कर्नाड : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि अभिनेते यांचं निधन
प्रसिद्ध नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी बंगळुरूमधल्या आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कर्नाड यांनी ययाती, अग्निवर्षा, नागमंडल, हयवदन, तुघलक यांसारखी गाजलेली नाटकं लिहिली. इतिहास-पुराणांतील मिथकांचा आधार घेत जगण्याचं सूत्र शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या नाटकांमधून केला. कर्नाड यांनी मुख्यतः कन्नड आणि इंग्रजी भाषांमधून लिखाण केलं.
कर्नाड यांच्या लिखाणासाठी त्यांना 1998 साली साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. त्याचबरोबर साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, कन्नड साहित्य अकादमी, कालिदास सन्मान या पुरस्कारांनीही कर्नाड यांचा गौरव करण्यात आला होता.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व
1970 साली प्रसिद्ध झालेल्या संस्कार या कन्नड चित्रपटातून गिरीश कर्नाड यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीचा शुभारंभ केला. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला सुवर्ण कमळ पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. कर्नाड यांनी वंशवृक्ष, गोधुली, काडु, चेलुवी, कलादाली या कन्नड चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं.
आर. के. नारायण यांच्या पुस्तकावर आधारित मालगुडी डेज या चित्रपटात त्यांनी स्वामीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 1990 साली विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित टर्निंग पॉइंट या कार्यक्रमाचं संचलन गिरीश कर्नाड करायचे.
केवळ कन्नडच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही कर्नाड यांनी आपल्या अभिनय-दिग्दर्शनाचा ठसा उमटवला. मृच्छकटिक या संस्कृत नाटकावर आधारित उत्सव या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन कर्नाड यांनी केलं होतं. निशांत, मंथन, इक्बाल, डोर, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांमधूनही कर्नाड यांनी महत्त्तवाच्या भूमिका साकारल्या. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा या मराठी चित्रपटात गिरीश कर्नाड यांचा अभिनय पहायला मिळाला.
1974 साली पद्मश्री तर 1992 साली पद्म भूषण सन्मानानं कर्नाड यांना गौरविण्यात आलं होतं.
सोशल मीडियावर श्रद्धांजली
गिरीश कर्नाड यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पण केली. "बहुमुखी प्रतिभेमुळं गिरीश कर्नाड कायम स्मरणात राहतील. त्यांना आवडणाऱ्या विषयामध्ये ते भावनिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतून जायचे," असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनीही ट्विटरवरून कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली. साहित्य, नाटक, चित्रपट क्षेत्रातलं त्यांचं योगदान अविस्मरणीय आहे, असं कुमारस्वामींनी म्हटलं.
प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी कर्नाड यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं, की त्यांच्या लिखाणानं मला अचंबित केलं आणि कायम प्रेरणाही दिली.
लेखक आणि विचारवंत रामचंद्र गुहा यांनीही कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)