धुम्रपान विरोधी दिन : चेन स्मोकर ते हौशी मॅराथॉन रनर - मी अशी सोडली सिगरेट

    • Author, पंकज कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

(31 मे हा जागतिक धुम्रपान विरोधी दिन. या निमित्त हा ब्लॉग पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)

जर पहिल्या सिगरेटची किंमत 10 लाख रुपये मोजावी लागणार आहे हे कळलं असतं तर मी सिगरेट हातात घेतली असती का?

हा प्रश्न माझ्या मनात अनेकदा येतो. मार्क ट्वेनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, 'धुम्रपान सोडणं खूप सोपं आहे मी शंभरदा सोडलं आहे.'

मार्क ट्वेन सिगारेट ओढत नव्हता पण तो पाइप पीत असे. अमेरिकन साहित्य रसिकांना भुरळ घालणाऱ्या मार्क ट्वेनचं हे वाक्य गमतीशीर आहे, पण ते गांभीर्याने घेण्यासारखं आहे. या वाक्याचा एक असाही अर्थ आहे की, तुम्ही कितीही प्रयत्न करा पण सिगरेट ही गोष्ट कधीच सुटू शकणार नाही.

पण मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो की हो सिगारेट सुटते. सिगरेट पिण्याची अनेक कारणं तुम्ही ऐकली असतील बऱ्याचदा लोक सांगतात की टेंशनमुळे मी ओढायला सुरुवात केली किंवा 'पीअर प्रेशर'मुळे मी सिगरेट पिऊ लागलो. पण माझ्याबाबतीत असं काही घडलं नाही. मी स्वतः जाऊन सिगरेट विकत घेतली आणि प्यायला लागलो. इतकं ते सहज होतं.

सिगारेट पिण्याच्या आधीच आतून इच्छा जागी झाली होती. आपले ओठ आणि बोट फक्त त्याच कारणासाठी आहेत असं वाटत असे. टीव्ही किंवा अॅडमध्ये हिरोला पाहिलं तर सिगरेटचं आणखी आकर्षण वाटायचं. हॉलिवूडच्या वॉर मूव्हीजमध्ये सिगरेट तर पटकथेचा अविभाज्य भाग आहे असं वाटतं. त्यातून सिगरेट म्हणजे एखादी कूल गोष्ट आहे असं मला वाटू लागलं आणि मग काय मी टपरीवर गेलो आणि सिगरेट घेतली.

सिगारेट पेटवण्याचा देखील अनुभव नव्हता. उदबत्ती पेटवावी तशी तर सिगरेट नसती ना पेटवता आली… पण मी कशीबशी ती पेटवली आणि झुरका मारून पाहिला. तेव्हा माहितही नव्हतं की इन करणं काय भानगड आहे. बस्स, पेटवायची आहे आणि धूर काढायचा इतकंच. मग हळूहळू जाणकारांच्या ओळखी झाल्या. गुरू शोधावा लागत नाही तर तो येऊन तुम्हाला शोधतो असंच झालं. आणि सिगरेट कशी प्यावी हे त्याने शिकवलं.

पहिले पाच सहा महिने मी पंधरा दिवसाला किंवा महिन्याला एक सिगरेट पीत होतो. मग असं झालं की काही काम केलं की स्वतःला 'रिवॉर्ड' म्हणून मी सिगरेट पिऊ लागलो. तेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो. मग परीक्षा किंवा असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी जागरण करू लागलो. असं म्हणतात जागायचं असेल तर सिगरेट प्यावी. पण माझं असं होत असे की सिगरेट प्यायची म्हणून मी जागरण करत असे.

डिग्री पूर्ण झाली आणि मी एमबीएला अॅडमिशन घेतलं. दोनच दिवसांत असं जाणवलं की सिगरेट पिणारे वर्गात अनेक जण आहेत. सिगरेटमुळे आमची मैत्री चटकन बनली. मग कधी ते म्हणायचे, चल चहा सिगरेट मारू तर कधी मी. सिगरेट आमच्या मैत्रीतला पूल बनली. डिग्रीला असताना मी दिवसातून एखादी सिगरेट मारत असे आता मात्र दोन-तीन होऊ लागल्या होत्या.

आणखी काही काळ गेला. मी नोकरीला लागलो आणि दिवसाच्या दोन ऐवजी आता प्रमाण पाच-सहा सिगरेटवर गेलं होतं. दिवसभर सिगरेटचाच विचार माझ्या मनात घोळत असे. कामाची सुरुवात करण्याआधी एक सिगरेट, मग काम संपल्यावर एक सिगरेट असं करत करत प्रमाण वाढत गेलं.

या पाच वर्षांत सिगरेट सोडावी वाटली नाही असं नाही. बऱ्याचदा वाटलं, पण वाटायचं आणखी एक मारू आणि उद्यापासून 'कंप्लीट' बंद. पण तसं काही झालं नाही. या काळात एक गोष्ट मात्र जाणवली की सिगरेट ही माझ्या डेली रूटीनचं सेंटर बनली. सर्व गोष्ट त्या सिगरेटच्याच अवतीभोवती असायच्या. मला त्याची गिल्टही वाटायची. पण गिल्ट वाटली आणि चार पाच तास सिगरेट प्यायली नाही तर पुन्हा तलफ लागायची. आणि पाय बरोबर पानटपरीकडे वळायचे.

सिगरेटवर मी खूप अवलंबून झालो. नेमकं मी सिगरेट ओढतोय की सिगरेट मला तिच्याकडे ओढतेय हेच मला कळत नसे. सकाळी उठण्यासाठी एक सिगरेट, मग चहा पिताना एखादी मग पुन्हा लंचनंतर एक असं ते चक्र सुरूच झालं होतं.

मला माझ्या भावंडांमध्ये रमायला फार आवडतं. आम्ही कितीही बिझी असलो तर वर्षातून निदान एक दोन वेळा तरी सर्वजण एकत्र जमतो. असेच सर्व बहीण-भाऊ आम्ही जमलो आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या, पण मला सिगरेटची तलफ लागली. बाहेर जावं की नाही हा विचार मी करत होतो शेवटो मी जागेवरून उठलो आणि जवळच्या टपरीवर जाऊन सिगरेट फुंकू लागलो. तेव्हा मनात विचार आला की खरंच सिगरेट इतकी वर्थ आहे का? हा माझ्यासाठी पहिला धक्का होता, पण त्यामुळे माझ्या आयुष्यावर काही परिणाम झाला नाही.

पाच वर्षांची सिगरेटची सवय असल्यामुळे मला शारीरिक त्रास व्हायला सुरुवात झाली होती. खोकला येणं, घसा सदैव खरखरणं, कधी डोकं दुखणं तर कधी काही या गोष्टी नित्याच्या झाल्या होत्या. सर्वांत अवघड तर तेव्हा व्हायचं जेव्हा मी माझ्या घरी येत असे. सिगरेटशिवाय टॉयलेटलासुद्धा जाता येत नसे. मग काहीही कारण काढून मी घराबाहेर जात असे, सिगरेट ओढून बडिशेप किंवा च्युईंगमने सिगरेटचा उग्र वास लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असे.

चमत्कार व्हावा तसा एक मित्र मला भेटला. तो माझा कधीकाळचा 'सिगरेट पार्टनर' होता. मी सहज त्याला विचारलं, 'चल सिगरेट मारू'. तर तो म्हणाला मी दोन वर्षांपासून सिगरेटला हात लावला नाही.

पहिल्यांदा मी काहीतरी असं ऐकलं होतं. नाहीतर कुणालाही विचारा की सिगरेट सोडली का तो म्हणतो हो सोडली ना. कधी सोडली तर त्याचं उत्तर असतं परवाचं सोडली किंवा काल सोडली पण हा पठ्ठ्या म्हणाला मी सिगरेट सोडली आणि आता दोन वर्षं झाली आहेत. त्याला विचारलं हे कसं घडलं तर त्याने सांगितलं 'Easy way to quit smoking' या नावाचं Allen Carr या लेखकाचं पुस्तक मी वाचलं.

सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचून कुणी यशस्वी होत नसतो किंवा मिलेनिअरही होत नाही हे माहीत होतं पण माझ्या मनात पहिल्यांदा आशा निर्माण झाली, 'येस! आपल्यालाही स्मोकिंग सोडता येईल.'

जसं ते पुस्तक माझ्या हाती पडलं त्या क्षणाला मी सिगरेट सोडेन असं मला वाटलं, पण तसं झालं नाही. पुस्तक हाती आलं. त्यातून एक गोष्ट समजली की 'स्मोकिंग इज नॉट अ हॅबिट इट इज ए डिसीज.' ही सवय नाही तर रोग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सिगरेटच्या सवयीबद्दल आपलं इतकं मत ठाम झालं आहे की आपल्याला वाटतं की काहीही केलं तरी ही सवय सुटूच शकत नाही.

सिगरेटबद्दल ब्रेनवॉशिंग करण्यात आलं आहे असंच वाटतं. कारण कुणीपण हेच सांगतं की सिगारेट सोडणं खूप अवघड आहे. पहिली सिगरेट टाळा इतकंच लोक सांगतात. पण सिगरेट सोडायची म्हटली की अनेकांना वाटतं हे होणार नाही. सिगरेट आता आपल्या आयुष्याचा भाग आहे हे गृहीत धरूनच लोक वागतात आणि त्या लोकांपैकी मी पण एक होतो. पण हा केवळ एक समज आहे असं मला हे पुस्तक वाचून कळलं.

समोर एखादा मोठा राक्षस आहे आणि आपल्याला त्याला ठार करायचं आहे असं वाटू लागलं होतं. मी रोज प्रयत्न करत असे पण माझ्या हातात सिगरेट पुन्हा पुन्हा यायची. पुस्तक वाचूनही काही परिणाम होत नाही असं वाटायला लागलं होतं. मी पुस्तक वाचणं थांबवलं आणि माझं जे स्वतःशी द्वंद होतं ते देखील थांबवलं.

पण धाप लागणं, घसा खवखवणं या गोष्टी थांबत नव्हत्या. आता हळूहळू माझी भूक देखील कमी व्हायला लागली. मला खाण्यापिण्याची आवड आहे. मी सेल्फ प्रोक्लेम्ड फु़डी आहे. पण जेवण मला गोड लागत नसे. माझ्या आवडीचा पदार्थ देखील मला कापसासारखा लागू लागला होता. वाटलं पुन्हा एकदा ट्राय करावं आणि पुस्तक वाचावं. पुन्हा पुस्तक हाती घेतलं.

नव्याने वाचताना कळलं की सिगरेटची सवय लागते ती निकोटिनमुळे. सिगारेट ओढल्यानंतर निकोटिनचं प्रमाण वाढतं आणि नंतर ते कमी कमी झालं की तलफ लागते. मग पुन्हा सिगारेटची इच्छा होते. मग आपण इम्यून होतो. जर आधी दिवसाला एका सिगारेटने किक बसत असेल तर नंतर दोन लागतात. मग तीन असं ते प्रमाण वाढत जातं.

याच पुस्तकात एक उदाहरण दिलं होतं. की जर तुमच्या शरीरावर फोड आले आणि ते जाण्यासाठी तुम्ही मलम लावता. पण आणखी फोड आले तर तुम्ही काय कराल? बरेच जण पुन्हा ते मलम लावतात. पण बऱ्याच जणांना माहीत नसतं तो मलमच तुमच्या आजाराचं कारण आहे. फक्त तुम्हाला तो मलम लावणं बंद करायचं आहे, बाकी तुमचा आजार नैसर्गिकरीत्या बरा होणार आहे.

या काळात सिगरेट सोडण्याची इच्छा प्रबळ होत गेली. पण तितकीच संकटं आली. पुन्हा पुन्हा सिगरेटकडे वळत असे. असं वाटतं होतं की सिगरेट सोडणं हे आपलं आयुष्यातलं सर्वांत मोठं ध्येय बनलं आहे, पण आपण मात्र काहीच करू शकत नाहीये.

मग मी ठरवलं की आता प्यायची सिगरेट पण अट एकच आहे की सिगरेट पिताना दुसरं काहीच काम करायचं नाही. जसं की चहा पिणं किंवा टीव्ही पाहणं किंवा आणखी काही. सिगरेट पिताना फक्त आपण काय करतोय याचं निरीक्षण करायचं. मग कळू लागलं की सिगरेटचा वास खूप उग्र आहे. धूर डोळ्यांत जातो आणि हृदयाचे ठोके वाढतात. ते स्थिर होण्यासाठी बराच वेळ जातो. हा उपाय थोडा कामाचा वाटला.

मग मी एक छोटंसं गणित मनातल्या मनात केलं. की जर दिवसाला सिगरेटचा खर्च 100 रुपये इतका धरला तर महिन्याला तीन हजार आणि वर्षांला 36 हजार रुपये लागतील. दहा वर्षं सिगरेट ओढली तर साडेतीन लाख खर्च होतील आणि तीस वर्षं ही सवय राहिली तर 10 लाख रुपये त्यावर खर्च होतील.

इंफ्लेशन रेट आणि त्यातून निर्माण होणारे आजार यांच्यावरचा खर्च तर मी मोजलेला नाही. दरवर्षी सरकार सिगरेटवरचा टॅक्स वाढवतं, पाकिटावरच्या वॉर्निंगचा टाइप मोठा केला जातो. कॅन्सरचं चित्र त्यावर असतं पण काहीच परिणाम होत नाही. पण जर असा विचार केला तर समजा ही सिगरेट दहा लाख रुपयांना पडणार असेल तर तुम्ही ओढाल का? याचं उत्तर तुमचं तुम्ही द्या. मी मात्र ठरवलं की नाही मी ते देऊ शकत नाही. म्हणून मी सिगरेट सोडली. काही परिणाम लगेच जाणवले.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझी चव पुन्हा मला मिळाली. आत्मविश्वास वाढला. मला घरी जाता येऊ लागलं. कुणामध्येही मिसळता येऊ लागलं. एक फ्रेशनेस मला जाणवू लागला, मध्ये पुन्हा एकदा विचार आला होता की आता घ्यावी का पुन्हा? एका सिगरेटने काय फरक पडणार आहे, पण 10 लाख रुपयांचा विचार मनात आला आणि तो नाद सोडला.

पण मी पुन्हा सिगरेटच्या नादी लागू नये यासाठी मी स्वतःला जपतो. सिगरेट सुटल्यानंतर पहिला विचार आला तो स्वतःच्या तब्येतीचा. आपण सिगरेटवर इतका खर्च केला, पण स्वतःसाठी काहीच केलं नाही असं मला वाटू लागलं. मी बाजारातून स्पोर्ट्स शूज आणले आणि धावायला सुरुवात केली. सुरुवातीला 10 किमी मॅराथॉनमध्ये मी भाग घेतला. मग हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ लागलो. आता मी वीसपेक्षा जास्त हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.

जर मी सिगरेट सोडली नसती तर कधीच स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊ शकलो नसतो. आज ते करू शकतो तर त्याचा मला आनंदही आहे आणि अभिमानही.

कधीकधी मनात विचार येतो की बेडमधून उठण्यासाठीही सिगरेटचा आधार लागणं आणि सकाळी 10 किमी पळण्यातून काय निवडणं अधिक योग्य आहे. मला चॉइस मिळाला तर मी 10 किमी पळणं निवडेन आणि वारंवार निवडेन. आधीचा ऑप्शन मी जगलोय आणि नंतरचा ऑप्शन मी जगतोय त्या आधारावर सांगू शकतो की मी दुसरा ऑप्शन निवडेन.

देवानंदच्या त्या गाण्याचे सूर कानी पडताच हसू येतं. हर फिक्र को धुए में उडाता चला गया…प्रत्येक काळजी आणि चिंता सिगरेटच्याच धुरात विरून जाऊ शकली असती तर जग काही वेगळं असलं असतं, पण वास्तव हे आहे की हा धूर चिंता जाण्याचं नाही तर चिंतेचं कारण आहे.

आता चार वर्षं झाली आहेत मी सिगारेटला हात लावला नाही. कधी कधी वाटतं ही गतजन्माची गोष्ट होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)