You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तृणमूलच्या महिला खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांच्यावर संसदेत फोटो काढण्यावरून टीका
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 78 महिला खासदार निवडून आल्या आहेत. या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांचाही समावेश आहे. परंतु संसदेतल्या फोटोंवरून त्यांना सध्या ट्रोल केलं जात आहे.
मंगळवारी अनेक खासदारांची परिचय पत्राची प्रक्रिया पूर्ण झाली. नुसरत आणि मिमी यांनी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संसदेच्या आवारात फोटो काढले. हे फोटो त्यांनी स्वत:च्या सोशल हँडल्सवरून शेअर केले. या फोटोंवरून या दोघींना ट्रोल केलं जात आहे.
नुसरत यांनी लिहिलं- नवी सुरुवात! माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ममता बॅनर्जी आणि बशीरहाट मतदारसंघातील नागरिकांचे आभार.
जाधवपूर मतदारसंघातून निवडून आलेल्या मिमी यांनी लिहिलं की- संसदेतला पहिला दिवस.
या फोटोंमध्ये नुसरत आणि मिमी यांच्या कपड्यांवरून त्यांना ट्रोल केलं जात आहे.
'दोन्हीतला फरक'
नुसरत आणि मिमी यांच्यावर टीका प्रतिस्पर्धी भाजपशी संबंधित व्यक्तींकडून तसंच सर्वसामान्य माणसांकडूनही होत आहेत.
आशिष मार्खेड यांनी म्हटलं आहे, "भाजपचे तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांना बघा. तृणमूलच्या नुसरत आणि मिमी या खासदारांना बघा. दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात येईल."
नुसरत यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही त्यांना ट्रोल केलं जात आहे.
सयानी मुखर्जी म्हणतात," बशीरहाटच्या मतदारांनो, काहीतरी लाज बाळगा. अशा बाईला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं आहे".
वैशाली म्हणतात की, संसद आहे की फॅशन शो?
हिमांशू यांनी शशी थरूर यांचा फोटो जोडत लिहिलं आहे की संसदेतली खासदारांची उपस्थिती शंभर टक्के असेल.
अर्पण म्हणतात, संसद म्हणजे फोटो स्टुडिओ नाही. फॉर्मल कपडे परिधान करायला सुरुवात करा.
प्रियांका नावाच्या युजर म्हणतात, तुम्ही भारतीय कपडे घालणं आवश्यक आहे. तुम्ही संसदेत जात आहात, चित्रपटाच्या प्रमोशनला नाही.
अशाच प्रतिक्रिया मिमी चक्रवर्ती यांच्या फोटोलाही आल्या आहेत.
श्रेष्ठ शर्मा यांनी टीका करताना म्हटलं आहे की संसदेच्या प्रांगणात कसे कपडे घालावेत याचं भान तुम्हाला हवं. ही शूटिंगची जागा आहे.
काही लोकांनी मात्र या दोघींना पाठिंबा देताना ट्रोल्सला प्रत्युत्तर दिलं आहे. "कमेंट लिहिणाऱ्यांनो, महिला खासदारांना त्यांना जे कपडे परिधान करायचे आहेत ते करू द्या. तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासंदर्भात जागरूक राहा. त्यांचे कपडे हा चर्चेचा विषय असायला नको."
संसदेत महिला खासदार
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने सर्वाधिक म्हणजे 41 टक्के महिलांना तिकीट दिलं होतं. यामध्ये अनेक महिला अभिनेत्रींचा समावेश होता.
नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
तृणमूलच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या 17 पैकी 9 महिलांनी विजय मिळवला आहे.
ओडिशात नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाने 7 महिला उमेदवारांना तिकीट दिलं होतं. यापैकी 5 महिला उमेदवार निवडून आल्या.
या पक्षांनी खासदारांचं स्त्री-पुरुष प्रमाण उत्तम राखलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)