You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काशी-विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पासाठीच्या मोदी सरकारने मुस्लिमांची 80 घरं पाडली? - फॅक्ट चेक
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी काशी-विश्वनाथ कॉरिडॉरसाठी मुस्लिमांची 80 घरं पाडण्यात आली, असा दावा करत जमीनदोस्त केलेल्या प्राचीन इमारतींचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, "काशी विश्वनाथ मंदिरापासून गंगा नदीपर्यंतचा रस्ता रुंद करण्यासाठी मोदींनी या मार्गावरील मुस्लिमांची जवळपास 80 घरं विकत घेतली. जेव्हा ही घरं पाडायला सुरुवात झाली, तेव्हा या घरांमध्ये 45 प्राचीन मंदिरं असल्याचं आढळून आलं."
ट्विटर आणि फेसबुकवर हा व्हीडिओ हजारो लोकांनी शेअर केला आहे.
मोदींचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या काशी-विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्दिष्टं भाविकांसाठी गंगा नदीपासून काशी विश्वनाथाच्या 18 व्या शतकातील जुन्या मंदिरापर्यंत थेट मार्ग उपलब्ध करून देणं हे आहे.
मोदींनी वाराणसीमध्ये 8 मार्च 2019 ला काशी-विश्वनाथ कॉरिडॉरचं भूमिपूजन केलं होतं.
हा व्हीडिओ खरा आहे की फेक, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीच्या वाचकांनीही हा व्हीडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवला आहे.
या व्हीडिओमधील दावे हे दिशाभूल करणारे असल्याचं बीबीसीच्या पडताळणीमध्ये आढळून आलं आहे.
व्हीडिओचं वास्तव
या प्रकल्पासाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार करण्यात आलं आहे. 'श्री काशी विश्वनाथ स्पेशल एरिया डेव्हलपमेंट बोर्ड' काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या कामाचं पर्यवेक्षण करते.
व्हायरल व्हीडिओमधील दाव्याचं तथ्यं जाणून घेण्यासाठी आम्ही या बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिंह यांच्याशी संपर्क साधला.
विशाल सिंह यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "या प्रकल्पासाठी आम्ही एकूण 249 घरं खरेदी केली. ही सर्व घरं हिंदू धर्मियांची आहेत. खरेदी केलेल्या 249 घरांपैकी आतापर्यंत 183 घरं प्रकल्पासाठी पाडण्यात आली आहेत. या घरांमध्ये लहान-मोठी मिळून 23 मंदिरं सापडली होती."
काशी विश्वनाथाचं मंदिरं हे ग्यानवापी मशिदीला लागूनच आहे. मात्र मंदिराचा विस्तार आणि सुशोभीकरणासाठी कोणत्याही मुस्लिम घराला धक्का लावण्यात आला नाहीये.
काशी-विश्वनाथ कॉरिडॉरची वैशिष्ट्यं
काशी या प्राचीन शहराचं रूपच बदलणाऱ्या काशी-विश्वनाथ कॉरिडॉरची अनेक खास वैशिष्ट्यं आहेत.
मंदिराच्या विस्तारासाठी 50 फुटांचा कॉरिडॉर बांधण्यासाठी या मार्गावरील घरं आणि दुकानं हटवली जातील. त्याचबरोबर गंगेच्या घाटांचंही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. काशीला येणाऱ्या भाविकांसाठी प्रतीक्षालयांची उभारणी, संग्रहालयं तसेच प्रेक्षागृहांचं बांधकाम अशा अनेक गोष्टींचा काशी-विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये समावेश आहे.
यात्रेकरूंसाठी फूड स्ट्रीट, पुजारी, स्वयंसेवक आणि भाविकांसाठी निवासस्थानांची उभारणीही केली जाणार आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी समीरात्मज मिश्र यांनी या प्रकल्पावर केलेल्या ग्राउंड रिपोर्टनुसार घरं पाडली जाणार असल्यानं इथले अनेक रहिवासी नाराज आहेत.
एका रहिवाशानं सांगितलं, की पर्यटक वाराणसीमध्ये इथल्या अरुंद गल्ल्या पाहण्यासाठी येतात, मॉल किंवा बगीचे पाहण्यासाठी नाही. जर वाराणसीचं हे वैशिष्ट्यं संपवलं तर वाराणसीही संपून जाईल.
मिश्र यांनी म्हटलं, "जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा आम्हाला लक्षात आलं, की हा भाग मुख्यतः हिंदूबहुल आहे. मुस्लिमांची घरं पाडण्यात आली नाहीयेत."
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार वाराणसीतील अनेक हिंदूंनी सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शनं केली होती. सरकार वाराणसीची तीर्थक्षेत्र ही ओळख पुसून या शहराला पर्यटनस्थळं बनवत असल्याचा इथल्या रहिवाशांचा आक्षेप आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)