You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर लोकसभा निवडणूक: अनंतनागमध्ये भाजप नेत्याची हत्या, नरेंद्र मोदी यांनी निषेध केला
- Author, माजिद जहांगिर
- Role, श्रीनगरहून बीबीसी हिंदीसाठी
काश्मीरमधील अनंतनागमध्ये शनिवारी अनंतनाग जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष गुलाम मोहम्मद मीर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अनंतनाग लोकसभा मतदारसंघाच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या केवळ दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीर यांच्यावर त्यांच्या नौगामस्थित घरातच हल्ला झाला. गंभीर जखमी झालेल्या मीर यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे त्यांचं निधन झालं. या घटनेचा तपास सुरू आहे. अजूनही कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हत्येचा निषेध केला आहे. "गुलाम मोहम्मद मीर यांनी काश्मीरमध्ये पक्षबांधणीसाठी केलेलं काम सदैव लक्षात राहील. अशा हल्ल्यांना भारतात जागा नाही. मी त्यांच्या परिवाराचं सांत्वन करतो."
अनंतनागमध्ये मतदारसंघात तीन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे, आणि अंतिम टप्पा सोमवारी 6 मे रोजी आहे.
2019च्या निवडणुकांदरम्यान झालेली ही पहिली राजकीय हत्या असल्याचं सांगण्यात येत आहे. या हत्येची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी भाजपने केली आहे.
सीबीआय तपासाची मागणी
भाजपाने मीर यांची हत्या हा भ्याड प्रकार असल्याचं सांगत घटनेचा निषेध केला आहे. भाजपचे जम्मू आणि काश्मीरचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर म्हणाले, "गुलाम मोहम्मद मीर दीर्घकाळ भाजपाशी संबंधित होते".
मीर सरंपच होते. त्यांनी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांची मोहीम दोन्ही वेळेस अपयशी ठरली होती.
अनंतनाग लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे निवडणूक लढवणारे आणि प्रदेश उपाध्यक्ष सोफी युसुफ यांनी या हल्ल्याचा CBIतर्फे तपास व्हावा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)