Avengers Endgame: भारतीय कॉमिक्सवर आधारित एकही चित्रपट आजवर का बनला नाही?

डोगा

फोटो स्रोत, Raj comics

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अव्हेंजर्स एंडगेमने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट मार्व्हल कॉमिक्सवर, त्यातली डझनभर पात्रांवर आधारित आहे, जे जगापुढे आधी कॉमिक्सच्या माध्यमातून आले होते. पण जगातली सर्वांत मोठी सिने इंडस्ट्री असलेल्या भारतात आजपर्यंत कॉमिक्सवर आधारित चित्रपट का कधी बनला नाही?

"मी जेव्हा लहानपणी हॉस्टेलला राहत होतो तेव्हा कुटुंबीयांपासून दूर राहिलेला एकटेपणा घालवण्यासाठी मी कॉमिक्स वाचू लागलो... आणि बघता बघता नागराज, डोगा, चाचा चौधरी, परमाणू, तिरंगा हेच माझे मित्र आणि कुटुंब दोन्ही बनले," बाबासाहेब म्हस्के सांगतात.

33 वर्षांचे बाबासाहेब व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत, पण मनाने भारतीय कॉमिक्स विश्वाचे अस्सल चाहते. ते सांगतात की त्यांच्याकडे अक्षरशः शेकडो कॉमिक्सचा संग्रह होता. "कॉमिक्स वाचत-वाचत बालपण कसं गेलं हे कळलं देखील नाही."

"कॉमिक्स वाचणाऱ्यांमध्ये मी एकटाच नव्हतो तर सर्व मुलांना ती वाचायला आवडायची. आमच्या हॉस्टेलला तर कॉमिक्स म्हणजे 'करन्सी'प्रमाणे होतं. 'तू मला कॉमिक्स दे, मी तुला क्रिकेटरचं पोस्टर देतो' किंवा 'आधी तू बॅटिंग घे, पण मला कॉमिक्स दे' असे आमचे व्यवहार चालायचे," म्हस्के सांगतात.

म्हस्केंप्रमाणेच कॉमिक्सच्या विश्वात लहानपणापासूनच रमलेले हजारो लोक आपल्याला भेटतील. कदाचित तुमच्याही आसपास कुणी असं असेल?

पण या तमाम चाहत्यांची एक दुखरी नस आहे - अद्याप कॉमिक्समधल्या त्यांच्या आवडत्या पात्रांवर एकही भारतीय चित्रपट का आला नाही?

थानोस

फोटो स्रोत, disney

फोटो कॅप्शन, अव्हेंजर्सने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले.

26 एप्रिल रोजी आलेला 'अव्हेंजर्स एंडगेम' हा सिनेमा 22 मार्व्हल सिनेमांच्या एका महामालिकेचा शेवटचा भाग होता. त्यामुळे मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधले बहुतांश सुपरहिरोज दिसले, त्यामुळे या सिनेमाने जगाच्या पाठीवरील सर्वाधिक कमाईचे सर्व विक्रम मोडले. भारतातच या सिनेमाने अवघ्या 10 दिवसांत 300 कोटींचा गल्ला जमवला आहे.

2017 मध्ये आलेल्या यापूर्वीच्या भागाने - 'अव्हेंजर्सः इनफिनिटी वॉर'ने - सुद्धा भारतात 200 कोटींचा व्यवसाय केला होताच. म्हणजे भारतात सुपरहिरो सिनेमांची मागणी आणि खप प्रचंड आहे. मग असं असतानादेखील भारतीय कॉमिक्सवर आधारित एकही चित्रपट अद्याप आलेला नाही, ही सल भारतीय कॉमिक्स चाहत्यांच्या मनात कायम असते.

भारतीय कॉमिक्सचा इतिहास

भारतात सध्या ज्या स्वरूपात कॉमिक्स दिसतात तसं या कॉमिक्सचं स्वरूप सुरुवातीला नव्हतं. चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आलोक शर्मा सांगतात, "भारतात कॉमिक्सची सुरुवात 60च्या दशकापासून झाली. बेनेट कोलमन अॅंड कंपनीने (टाइम्स ऑफ इंडिया याच कंपनीच्या मालकीचा आहे.) इंद्रजाल कॉमिक्स नावाची एक सीरिज सुरू केली. वर्तमानपत्राबरोबरच हे कॉमिक्स फुकट दिलं जायचं."

राज कॉमिक्स

फोटो स्रोत, @facebook raj comics

"परशातले कॉमिक पात्र जसे की फॅंटम, मॅंडरेक्स यांच्या कथा इंद्रजालमध्ये दिल्या जायच्या. मग भारतीय पात्र इंद्रजालमध्ये आणण्याचा विचार संपादकांनी केला आणि पहिलं पात्र या कॉमिक्समध्ये झळकलं ते म्हणजे 'बहादूर' या लढवय्याचं. बहादूर हा चंबळच्या खोऱ्यातील डाकूंशी दोन हात करायचा आणि लोकांचं रक्षण करायचा," शर्मा सांगतात.

"70च्या दशकात भारतात चित्रकथा सुरू झाल्या. अनंत पै किंवा अंकल पै यांनी अमर चित्र कथा सुरू केल्या. भारतीय मुलांना त्यांच्या संस्कृतीतल्या कथा सांगण्याच्या हेतूने पै यांनी चित्रकथा सुरू केल्या. रामायण, महाभारत, वीर योद्धे, राजे महाराजे यांच्या कथा चित्ररूपाने मुलांच्या हाती पडू लागल्या आणि बघता बघता त्या लोकप्रिय झाल्या," शर्मा सांगतात.

चाचा चौधरी आणि साबू या जोडीला घराघरात पोहोचवणाऱ्या 'डायमंड कॉमिक्स'ची स्थापना 1978मध्ये झाली. ही कंपनी चाचा चौधरीव्यतिरिक्त पिंकी, बिल्लू, मोटू-पतलू हे लोकप्रिय कॉमिक्स प्रकाशित करते.

80च्या दशकात डायमंड कॉमिक्स आणि राज कॉमिक्स यांनी हिंदी भाषिक राज्यांमध्ये अक्षरक्षः लोकांना वेड लावलं. आजही या दोन कंपन्यांशिवय तुलसी कॉमिक्स, ग्राफिक इंडिया, विमानिका कॉमिक्स, फेनिल कॉमिक्स अशा अनेक कंपन्या आहेत. भारतीय पुराणकथांपासून ते सायबॉर्गपर्यंत सगळे विषय या कॉमिक्समध्ये हाताळले जातात.

भारतीय कॉमिक्स उद्योगाची उलाढाल

स्मार्टफोन आणि टीव्हीच्या जगात आजही भारतात कॉमिक्सचा खप चांगलाच आहे. 'चाचा चौधरी' प्रसिद्ध करणाऱ्या डायमंड कॉमिक्सच्या महिन्याला चार लाख प्रती जातात तर राज कॉमिक्सच्या महिन्याला साधारणतः अडीच ते तीन लाख प्रती जातात, असं या कंपन्यांचे पदाधिकारी सांगतात.

वित्त क्षेत्राशी निगडित बातम्या देणाऱ्या 'सिफी.कॉम'नुसार भारतीय कॉमिक्स उद्योग हा सध्या 100 कोटी रुपयांच्या घरात आहे. पुढच्या 10 वर्षांमध्ये हा उद्योग अंदाजे 300-400 कोटींच्या घरात जाऊ शकतो.

ऑनलाईन विक्रीमुळे व्यवसायातही भर पडली आहे, असं देखील सांगितलं जातं.

रणवीर सिंहच्या सिंबा सिनेमाच्या प्रमोशनवेळी टिंकलचा एक विशेष अंक आला होता.

फोटो स्रोत, Instagram / RanveerSingh

फोटो कॅप्शन, रणवीर सिंहच्या सिंबा सिनेमाच्या प्रमोशनवेळी टिंकलचा एक विशेष अंक आला होता.

एवढंच नव्हे तर 'अमर चित्र कथा'च्याच निर्मात्यांकडून येणाऱ्या 'टिंकल'मधील काही पात्र लोकांना आता ओळखीचे झाले आहेत. शंभू शिकारी, सपँडी, रामू आणि शामू, तंत्री द मंत्री ही नावं मुलांमध्ये अशी लोकप्रिय आहेत की नुकत्याच आलेल्या एका सिनेमाचं प्रमोशन रणवीर सिंहने या कॉमिक्समधूनही केलं होतं. म्हणजे हिंदी सिनेमाचं पात्र कॉमिक्समध्ये आलं, पण कॉमिक्समधलं पात्र सिनेमात कधी गेलं नाही.

कॉमिक्सचा वेड कमी झालं आहे का?

एकेकाळी लहान मुलं कॉमिक्स खूप आवडीनं वाचायची, पण आता त्याचं वेड कमी झालंय का?

डायमंड कॉमिक्सचे संस्थापक गुलशन राय सांगतात, "अजूनही मुलांना कॉमिक्स आवडतात, पण आता कॉमिक्सबरोबरच अॅनिमेशन चित्रपट आणि कार्टूनचा पर्याय मुलांजवळ उपलब्ध आहे. पण याचा अर्थ कॉमिक्सची विक्री कमी झालीये, असं नाही. आजही आमच्या विविध कॉमिक्सच्या महिन्याला चार लाख प्रती विकल्या जातात. आम्ही आमच्या प्रकाशनांची जाहिरातबाजी करत नाही."

साबू आणि चाचा चौधरी

फोटो स्रोत, @Twitter diamond comics

डोगा, नागराज, भेडिया, सुपर कमांडो ध्रुव अशा कॉमिक्सची निर्मिती करणारी संस्था राज कॉमिक्सनेही सांगितलं की त्यांच्या कॉमिक्सची विक्री चांगली होतेय.

नव्या माध्यमांचं आव्हान आम्हाला देखील आहे, पण मुलांनी कॉमिक्स वाचणं बंद केले नाहीत, असं 'राज कॉमिक्स'चे स्टुडियो हेड संजय गुप्ता सांगतात. "युट्युब, टीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आमच्यासमोर आव्हान उभं केलं आहे, पण आम्हाला संधी देखील तितक्याच प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत."

"90च्या दशकातला आमचा वाचक आता मोठा झालाय. काही काळासाठी तो दुरावला होता, पण आता ही मुलं मोठी झाली असली तरी कॉमिक्स वाचतात. ऑनलाईन विक्रीचं प्रमाण वाढलं आहे.

गुप्ता सांगतात की राज कॉमिक्सने आजवर एकूण 3,500 हजार पुस्तकं (टायटल्स) प्रकाशित केली आहेत. एका पुस्तकाच्या किमान अडीच लाख प्रती काढल्या जातात.

जर भारतीय कॉमिक्स इतकी लोकप्रिय आहेत, त्यांची विक्री होते तर भारतात अद्याप कॉमिक्स कॅरेक्टरवर आधारित एकही चित्रपट का आला नाही? हा प्रश्न एक असला तरी त्याची कारणं वेगवेळी आहेत.

'सुवर्णकाळ आला आणि गेला'

चित्रपट दिग्दर्शक आणि कॉमिक्स संस्कृतीचे अभ्यासक आलोक शर्मा सांगतात की पहिलं सुपरमॅन कॉमिक्स 1938 मध्ये आलं, त्यानंतर त्यावर आधारित चित्रपट हॉलिवुडमध्ये येण्यासाठी किमान 40 वर्षं लागली. आपली कॉमिक्स इंडस्ट्री ही 35-40 वर्षांपेक्षा जास्त जुनी नाही. 1980-90च्या आधी कॉमिक्स प्रकाशित झाली होती, पण ती जनमानसात रुजली नव्हती. म्हणजे 80-90ला त्यांचा सुवर्णकाळ आला आणि त्यानंतर आलेल्या व्हीडिओ गेम, कार्टुन्स सारख्या गोष्टींमुळे त्या युगाचा ऱ्हास झाला.

अव्हेंजर्स

फोटो स्रोत, disney

"हॉलिवुडमध्ये कॉमिक्स आणि चित्रपट निर्माते एकत्र काम करतात. जेव्हा तिथं फक्त एखाद्या पात्रावरच सिनेमा काढायचा करार केला जात नाही तर कॉमिक्स कंपनीसोबत करार केला जातो म्हणजे निर्मात्याला त्या कॉमिक्स विश्वातील कोणत्याही पात्रावर चित्रपट काढण्याची मुभा असते. त्यामुळे त्यांना सीरिजमध्ये चित्रपट काढणं सोपं असतं. भारतात अजून मात्र तशी परिस्थिती नाही," असं शर्मा सांगतात.

'भारतीय सिनेमा स्टारडम भोवतीच घुटमळला'

कॉमिक्सवर चित्रपट न निघण्याचं एक कारण म्हणजे भारतीय सिनेमा 'स्टारडम'भोवतीच फिरत असल्याचं चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सांगतात.

"भारतात हिरो किंवा स्टार सिस्टम डॉमिनंट आहे. भारतात सुपरहिरो सिनेमा बनवण्याचे प्रयत्न झाले, पण ते अगदी अलीकडच्या काळात. क्रिश किंवा रा-वन ही त्याची उदाहरणं. पण त्यातही तो अभिनेता हाच केंद्रबिंदू असल्यामुळे भारतीय सुपरहिरो चित्रपट क्रिशच्या पलीकडे गेलेच नाहीत."

"70 ते 90 या काळातला सिनेमा व्यक्तीकेंद्रित राहिला. जागतिकीकरणानंतर हळुहळू सिनेमा चाकोरीच्या बाहेर येऊ लागला. जसा काळ पुढे सरकला तसा प्रेक्षकही बदलत गेला. त्यामुळे बॉलिवुडमध्ये एका बाजूला सिंघम किंवा सिंबा सारखे चित्रपट दिसतील तर दुसऱ्या बाजूला न्यूटनसारखे चित्रपट दिसतात. कॉमिक्सवर चित्रपट काढायचे म्हणजे ते चित्रपट बॉलिवुडच्या साच्यात बसले नसते, म्हणून आपल्याला सुपरहिरोवर चित्रपट बनलेले दिसत नाहीत," असं ठाकूर सांगतात.

एक प्रयत्न झाला पण...

चित्रपट निर्मितीमध्ये बजेट ही तर समस्या आहेच, पण त्याबरोबर बॉलिवूड निर्मात्यांबरोबर करार करणं आणि तो प्रत्यक्षात उतरवणं, हे कठीण काम असल्याचं राज कॉमिक्सचे संजय गुप्ता म्हणतात.

राज कॉमिक्स

फोटो स्रोत, @Raj comics.com/screengrab

"आम्ही मुंबईतल्या प्रत्येक निर्मात्याचं दार ठोठावलंय, पण करार होऊ शकला नाही. कॉपीराइट कायदे हे गुंतागुंतीचे आहेत. तो देखील एक अडसर ठरतो. राज कॉमिक्सने अनुराग कश्यप यांच्यासोबत करार केला होता. ते 'डोगा' या पात्रावर चित्रपट काढणार होते, पण बॉम्बे व्हेलवेट फ्लॉप झाल्यानंतर ते काम रखडलं," गुप्ता सांगतात.

एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यप यांनी सांगितलं, "मला डोगा चित्रपट बनवायचा होता, पण ती योजना मी निकाली काढली."

सध्या राज कॉमिक्स एका वेबसिरीजवर काम करत आहे, अशी माहिती गुप्ता देतात. आम्ही त्या सीरिजचं ट्रेलर लाँच केलं. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचं ते सांगतात.

भविष्यात असा चित्रपट पाहायला मिळेल का?

भविष्यात कॉमिक्सवर आधारित चित्रपट पाहायला मिळू शकतो का, असं विचारलं असता डायमंड कॉमिक्सचे संस्थापक गुलशन राय सांगतात, "भविष्यात तुम्हाला नक्कीच सुपरहिरो चित्रपट पाहायला मिळू शकतो. आमचे प्रयत्न त्या दिशेनी सुरू आहेत. 'फौलादी सिंह' आणि 'अग्निपुत्र' या पात्रांवर चित्रपट काढण्याचा आमचा विचार आहे."

"सध्या निक या चॅनेलवर सुरू असलेली मोटू-पतलू ही मालिका आमच्याच कॉमिक्स कॅरेक्टरवर आधारित आहे. वेबसिरीजवरही आमचं काम सुरू आहे आणि त्यात आम्हाला यश मिळेल, असं आम्हाला वाटतं," असं राय सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)