You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिलांना बेशुद्ध करून बलात्कार करणारा विकृत सीरियल किलर अटकेत
तेलंगणात गाजलेल्या 14 वर्षांच्या सरिताच्या (नाव बदललेलं आहे) हत्येचं गूढ अखेर उकललं आहे. याप्रकरणी पोलिसांनी यदाद्री जिल्ह्यातल्या श्रीनिवास या तरुणाला अटक केली आहे.
व्यवसायाने लिफ्ट मेकॅनिक असलेला 28 वर्षांचा मारी श्रीनिवास रेड्डी यदाद्री जिल्ह्यातल्या बोम्मलारामाराममधल्या हाजीपूर गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर आतापर्यंत चार खून केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
14 वर्षांची पीडिता एकेदिवशी शाळेतून घरी आलीच नाही. काळजीत पडलेल्या आईवडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा गुन्हेगारीच्या चिखलानं माखलेलं श्रीनिवासचं सबंध आयुष्यच त्यांच्या समोर उघड झालं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल रोजी पीडित किसारा गावातल्या शाळेतून निघाली आणि बोम्मालारामारामला पोहोचली. हाजीपूरला जाण्यासाठी ती रस्त्यात उभी होती. त्याचवेळी श्रीनिवास तिथे पोहोचला आणि त्याने तिला त्याच्या मोटरसायकलवर लिफ्ट दिली. तिथून तो तिला त्याच्या शेतात घेऊन गेला.
हाजीपूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच हे शेत होतं. शेतात गेल्यावर त्याने तिचा गळा दाबला. ती बेशुद्ध झाली. तशाच बेशुद्धाअवस्थेत त्याने तिला शेतातल्या विहिरीत फेकलं. त्यानंतर तो विहिरीत उतरला. तिच्यावर बलात्कार केला, तिची हत्या केली आणि तिथे विहिरीतच तिचा मृतदेह पुरला. त्यानंतर तो विहिरीतून बाहेर आला. मुलीचं दप्तर शेजारच्या शेतातल्या विहिरीत फेकलं.
श्रीनिवासची गुन्हेगारी पार्श्वभूमी
2015 सालची घटना. 11 वर्षांची मालती (नाव बदललं आहे) हाजीपूरला आपल्या आजोळी गेली होती. श्रीनिवासने तिच्यावरही बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने तिचाही खून करून तिचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि शेजारच्या शेतातल्या विहिरीत फेकला होता.
मालतीच्या पालकांनी तब्बल चार वर्षं पोलिसांचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यांचा मुलीचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले होते.
मुलगी बेपत्ता होण्यामागे शेजाऱ्यांचा हात असल्याच्या संशयावरून त्यांचं शेजाऱ्यांशीही अनेकदा भांडणं झाली. मात्र, आपल्या मुलीचा खून झाल्याचं त्यांना आता कळतंय.
मालतीचा 23 एप्रिल 2015 रोजी खून करण्यात आला होता. या मंगळवारी तिची हाडं पोलिसांना विहिरीतून सापडली. घटनास्थळावर अजूनही खोदकाम सुरू आहे.
2015 साली सप्टेंबरमध्ये एका महिलेने श्रीनिवासविरोधात तक्रार दाखल केली होती. गुरं चरवत असताना त्याने आपल्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचं तिचं म्हणणं होतं.
आरडाओरड केल्यानं आपली सुटका झाल्याचं तिने तक्रारीत म्हटलं होतं. ती आणि तिचे पती दोघांनी ही तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आरोपपत्रदेखील तयार करण्यात आलं होतं.
2017 साली श्रीनिवास लिफ्ट दुरुस्तीच्या कामासाठी कर्नूलला गेला होता. त्यावेळी त्याने आणि त्याच्या मित्रांनी एका स्त्रिला त्यांच्या खोलीवर आणलं. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता. याप्रकरणात पोलिसांनी श्रीनिवासला अटकही केली होती. तो तुरुंगातून कसा सुटला, याचा तपास अजून सुरू आहे.
यावर्षी 9 मार्चला त्याने गावातल्याच लक्ष्मीला (नाव बदललं आहे) आपल्या मोटरसायकलवर लिफ्ट दिली होती. त्यानंतर तिला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावरही बलात्कार करून तिला ठार केलं. त्यानंतर तिचाही मृतदेह त्याच शेतातल्या विहिरीत फेकला होता. आपली मुलगी कुणाबरोबर तरी पळून गेली असावी, असं वाटल्याने तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. मात्र, आता त्या घटनेमागचं सत्यही आता समोर आलं आहे.
वेगवेगळे खुलासे
सरिताच्या प्रकरणात तिच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांच्या कुत्र्यांनी श्रीनिवासच्या विहिरीला ओळखलं. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच पुरावे नव्हते.
मात्र, शेतात उन्मळून पडलेलं पीक आणि झाडांच्या तुटलेल्या फांद्या दिसल्यावर तपासाची चक्र वेगाने फिरू लागली आणि लवकरच पोलिसांना सरिताचा मृतदेह सापडला.
अधिक पुराव्यांसाठी घटनास्थळाची बारकाईने तपासणी करत असताना त्यांना लक्ष्मीचा मृतदेहही सापडला. त्यानंतर श्रीनिवासने स्वतःच मालतीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी श्रीनिवासने सांगितलेल्या विहिरीत तपास केला. तेव्हा त्यांना मालतीच्या शरीराचे अवेशेष सापडले.
गावातली परिस्थिती
हैदराबादच्या बाहेर पडल्यावर किसारा सोडलं की बोम्मालारामाराम लागतं. बोम्मालारामारामपासून हाजीपूरचा हा कच्चारस्ता आहे. त्यामुळे तिथे बरेचदा ओळखीची माणसं गावातल्या लोकांना गाडीवर लिफ्ट देतात आणि याचाच फायदा श्रीनिवासने उचलला.
पोलिसांच्या अहवालानुसार तो त्याच भागात मोटरसायकलवरून फिरत असायचा. एखादी मुलगी दिसली की तिला लिफ्ट द्यायचा आणि आपण कामानिमित्त त्याच भागात जात असल्याचं मुलींना सांगायचा.
त्यानंतर मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार करायचा आणि त्यांचे मृतदेह शंभर फूट खोल विहिरीत फेकायचा. शिवाय, या विहिरी झाडांनी झाकल्या असायच्या. त्यामुळे विहिरीत मृतदेह फेकले तरी त्याची कल्पना कुणालाच यायची नाही.
या घटनेने हादरून गेलेल्या हाजीपूरमधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येतेय. सरिताच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवल्यापासून गावातली परिस्थिती चिघळली होती.
पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात गावकऱ्यांनी आंदोलनही केलं. दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस उपायुक्तांविरोधातही गावकऱ्यांनी घोषणाबाजी केली.
बीबीसीशी बोलताना गावकऱ्यांनी सांगितलं की मुली बेपत्ता झाल्याच्या यापूर्वीच्या तक्रारींवर पोलिसांनी योग्य कारवाई केली असती तर आज ही घटना घडलीच नसती. श्रीनिवास रेड्डीला अटक झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या घरालाही आग लावली.
श्रीनिवासने नवं घर बांधलं होतं. ते घर आता पूर्णपणे बेचिराख झालंय. घर पेटवण्याच्या आदल्या दिवशीच श्रीनिवासचं कुटुंब गाव सोडून गेलं होतं. शेजारच्या गावांतूनही आता लोक श्रीनिवासचं घर बघण्यासाठी गर्दी करत आहेत.
तर या घटनेनंतर संपूर्ण गावाचीच बदनामी करणारा मजकूर दाखवल्याबद्दल गावकऱ्यांनी काही मीडिया हाऊसेसवरही संताप व्यक्त केलाय. घटनेनंतर गुन्हेगाराच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नका, असं म्हणतं गावकऱ्यांनी काही माध्यम प्रतिनिधींशी वादही घातला.
पोलिसांची प्रतिक्रिया
आरोपीकडून एक मोटरसायकल, दोन मोबाईल फोन आणि लिफ्ट दुरुस्तीची अवजारं जप्त करण्यात आली आहेत. पीडितेचे कपडे, दप्तर, शालेय पुस्तकं आणि तिचं शाळेचं ओळखपत्रही पोलिसांनी जप्त केलंय.
"तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही वैज्ञानिक पुरावे गोळा करत आहोत. निष्काळजीपणा करणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आलंय. मालतीचे अवशेष फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पुढच्या तपासासाठी पाठवले जातील. आरोपीची मानसिक आरोग्य चाचणीही घेण्यात येणार आहे," अशी माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिलीय.
"गावातली दारुची दुकानंही आम्ही बंद केली आहेत. गावात गांजा पुरवला जातो का, याचाही तपास सुरू आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे या गावासाठी बससेवा सुरू करण्याची मागणीही केली आहे. इतर कुठल्या प्रकरणात श्रीनिवासचा हात आहे का, याचाही तपास करतोय," असंही ते पुढे म्हणाले.
"यापूर्वी त्याने वेमुलवाडा आणि अदिलाबादमध्येही काही दिवस काम केलं आहे. त्यामुळे तिथे कुणी महिला किंवा मुली बेपत्ता आहेत का, याचीही आम्ही चौकशी करतोय. तो विकृत मनोवृत्तीचा आहे. तो आधी मुलींचा गळा दाबून त्यांना बेशुद्ध करायचा किंवा ठार करायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर इतर अनेक बाबी स्पष्ट होतील. गुन्हा करण्याआधी तो आधी रेकी करायचा आणि त्यानंतरच जाळं टाकायचा", अशी माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिलीय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)