भाजप नेत्याने दलित तरुणाला खरंच झोडपलं का? बीबीसी फॅक्ट चेक

सोशल मीडियावर सध्या एका तरुणाला मारहाण करतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. एका भाजप नेत्याने दलित तरुणाला खुलेआम मारहाण केल्याचा दावा या व्हीडियोसोबत करण्यात येतोय.

काही जण एका तरुणाला पकडून त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत असल्याचं या व्हीडिओत दिसतं.

बीबीसीच्या अनेक वाचकांनी हा व्हीडिओ व्हॉट्सअप करून सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जवळपास दीड मिनिटाच्या या व्हीडिओसोबत एक मेसेज आहे, "भाजप आमदार अनिल उपाध्याय यांच्या या कृतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतील? दलित, मागास महागड्या गाडीतून फिरूही शकत नाहीत का?"

हा व्हीडिओ 29 एप्रिलनंतर फेसबुकवरच्या काही मोठ्या ग्रुप्समध्येही शेअर झाल्याचं आम्हाला आढळलं.

ज्यांनी हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केलाय, त्यांनीही दावा केलाय की हा दलित तरुण महागड्या गाडीतून फिरत असल्याने भाजप नेते अनिल उपाध्याय यांनी आपल्या गुंडांसह त्याला मारहाण केली.

मात्र, हा दावा साफ चुकीचा असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झालं.

व्हीडिओमागचं सत्य

हा व्हीडिओ दोन वर्षं जुना असल्याचं आम्हाला रिव्हर्स इमेज सर्चमध्ये आढळलं.

4 एप्रिल 2017 रोजी काही प्रसार माध्यमांनी आपल्या बातमीत हा व्हीडिओ दाखवला आहे. या बातम्यांनुसार व्हीडिओत ज्या तरुणाला मारहाण होतेय तो गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहणारा हार्दिक भरवाड आहे.

काही कौटुंबिक वादातून त्याला त्याच्या सासरच्या मंडळींनी मारहाण केली होती. त्याच्या गाडीचंही नुकसान केलं होतं.

या घटनेचा सर्व तपशील जाणून घेण्यासाठी आम्ही गुजरात पोलिसांशी संपर्क साधला.

गुजरात पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की हा व्हिडियो गांधीनगरमधल्या सेक्टर 7चा आहे.

त्यांनी सांगितलं, "हे संपूर्ण प्रकरण घरगुती हिंसाचाराचं आहे. एका मुलीने तिचा पती हार्दिक भरवाड याच्यावर घरगुती हिंसाचार आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला होता."

मुलीने माहेरी जाऊन तिला मारझोड होत असल्याच सांगितलं तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी हार्दिक भरवाडला मारहाण केली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात पोलीस तक्रार केली होती. हे प्रकरण अजूनही कोर्टात आहे.

पोलिसांनी स्पष्ट केलंय की तरुणाला घरगुती कारणांवरून मारहाण करण्यात आली होती आणि याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)