तेज बहादूर यादव यांच्या याचिकेवर पुनर्विचार करा- सुप्रीम कोर्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून समाजवादी पक्षाकडून अर्ज दाखल केलेले माजी सैनिक तेजबहादूर यादव यांच्या उमेदवारी दिली होती. मात्र ही उमेदवारी निवडणूक आयोगाने बरखास्त केली.

त्याला तेज बहादूर यादव यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. तेज बहादूर यांच्या याचिकेवर पुनर्विचार करून उद्यापर्यंत न्यायालयात उत्तर द्या असा आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिला आहे. यादव यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होईल असं इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं आहे.

तेजबहादूर यांनी दोन वेळा उमेदवारी अर्ज भरला. 24 एप्रिलला त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला. 29 एप्रिलला समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही अर्ज रद्दबातल ठरवले आहेत. त्यांचे अर्ज बाद केल्यानंतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीचे विद्यमान खासदार आहेत. यंदाच्या निवडणुकीतही ते वाराणसीतून उमेदवार आहेत. 26 एप्रिलला मोदी यांनी नामांकन अर्ज भरला.

मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय तर समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांनी अर्ज भरले आहेत.

30 एप्रिल रोजी तेज बहादूर यांना निवडणूक आयोगाची नोटीस मिळाली. सीमा सुरक्षा दलातून तुम्हाला निलंबित का करण्यात आलं? यासंदर्भात पत्र देण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला. आयोगाने त्यांना 1 मे 2109 रोजी म्हणजेच 90 वर्षांनंतर कार्यालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला.

दरम्यान त्यांना दुसरी नोटीस बजावण्यात आली. पहिल्या नोटिशीतील वर्ष ही तांत्रिक चूक असल्याचं स्पष्टीकरण आयोगानं दिलं. सुधारित नोटिशीनुसार 1 मे 2019 रोजी अकरा वाजता सीमा सुरक्षा दलाकडून निलंबनासंदर्भात पत्र घेऊन येण्याचा आदेश देण्यात आला.

जिल्हा निवडणूक अधिकारी आणि वाराणसीचे रिटर्निंग अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी ही नोटीस पाठवली. तेजबहादूर यादव यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला तेव्हा सरकारी सेवेतून भ्रष्टाचार किंवा देशद्रोहाच्या आरोपांसाठी सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर सुरेंद्र यांनी हो असं लिहिलं होतं.

तेजबहादूर यांनी 29 एप्रिलला भरलेल्या दुसऱ्या अर्जासोबत एक शपथपत्र जोडलं. 24 एप्रिलला भरलेल्या अर्जात चुकून हो असं लिहिल्याचं म्हटलं होतं.

निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला पाच वर्षं निवडणूक लढवता येत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे.

वाराणसी मतदारसंघासाठी एकूण 101 अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी 71 अर्ज रद्दबातल ठरवण्यात आले.

समाजवादी पक्षानं इथून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र आपला उमेदवार मागे घेत समाजवादी पक्षानं यादव यांना उमेदवारी दिली आहे.

कोण आहेत तेजबहादूर?

तेजबहादूर यादव हे नाव दोन वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. बीएसएफच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाची तक्रार त्यांनी फेसबुकवर एका व्हीडिओच्या माध्यमातून केली होती.

"वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतरही कोणी आमचं गाऱ्हाणं ऐकत नाही. गृह मंत्रालयाला पत्र पाठवूनही काही कारवाई झाली नाही," असं तेजबहादूर यांनी म्हटलं होतं. त्यांचा तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

तेजबहादूर यांच्या या व्हीडिओनं लष्कर आणि राजकीय वर्तुळात काही काळ चांगलीच खळबळ उडाली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले गेले आणि त्यानंतर तेजबहादूर यांना BSF मधून काढून टाकण्यात आलं.

उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपानं युती केली आहे. वाराणसीची जागा ही समाजवादी पक्षाच्या वाट्याला आली आहे. याखेरीज काँग्रेसकडून अजय राय हे वाराणसीमधून मोदींविरोधात निवडणूक लढवत आहे.

मोदींना विरोध का?

तेजबहादूर हे मूळचे हरियाणाचे आहेत. मग त्यांनी वाराणसीमधून थेट पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला?

लष्कराचं राजकीय भांडवल करणाऱ्यांना मला हरवायचं आहे, असं तेजबहादूर सांगतात.

त्यांनी म्हटलं, "काशी विश्वनाथाच्या आशीर्वादानं मला नकली चौकीदाराला हरवायचं आहे. जे लोक सैन्याचा राजकारणासाठी वापर करत आहेत, त्यांना पराभूत करायचं आहे. त्यांनी आपल्या सैन्याची बदनामी केली. त्यांच्या प्रचारामुळे सैनिकांचं मनोबल कमी झालं."

कोण आहे खरा चौकीदार?

तेजबहादूर आपल्या प्रचारासाठी पोस्टर्स वाटत आहेत. देशाचे खरे चौकीदार आपणच आहोत, असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे.

या 'खऱ्या-खोट्या' चौकीदाराच्या प्रचाराबद्दल बोलताना तेजबहादूर सांगतात, की इतकी वर्षें मी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर राहिलो आहे. त्यामुळे देशाचा खरा चौकीदार मीच आहे.

तेजबहादूर यादव या प्रचारात राफेलच्या मुद्द्यावरही भाष्य करतात. "मोदीजी जर चौकीदार आहेत, तर राफेल प्रकरणाची फाइल चोरीला कशी गेली? नीरव मोदी आणि बाकी लोक देशातून पळून गेले आहेत. मग मोदीजी कसले चौकीदार?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)