नरेंद्र मोदींच्या वाराणसीतल्या शक्तिप्रदर्शनाचा नेमका अर्थ काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीमधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे सहकारी पक्ष (NDA) चे अनेक नेते वाराणसीमध्ये दाखल झाले होते.

पंतप्रधान नेरेंद्र मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी हे संकेत दिले की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडे प्रचाराला वेळ नसेल.

मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काल भैरव मंदिरामध्ये पूजा केली. एक दिवसआधी त्यांनी वाराणसीमध्ये रोड शो करून शक्तिप्रदर्शन देखील केलं.

सुषमा स्वराज, अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ हे भाजपचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल, बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू अध्यक्ष नीतीश कुमार, लोजपा नेते रामविलास पासवान आणि अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल या ठिकाणी उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार शंकर अय्यर सांगतात की पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी शक्तिप्रदर्शन होणं हा काही निव्वळ योगायोग नाही.

अय्यर सांगतात, "पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2014ला जेव्हा मोदींनी वाराणसीला उमेदवारी अर्ज भरला तेव्हा ते पंतप्रधान पदाचे दावेदार आणि एका बाहेरील राज्यातील व्यक्ती होते, पण आता ते पंतप्रधान आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामाच्या आधारावरच ते लोकांना मतं मागत आहेत.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजुटता

2014 च्या आणि आताच्या स्थितीत फरक आहे. शंकर अय्यर सांगतात, बरेच विश्लेषक हा प्रयत्न करत आहेत की जर भाजपला बहुमत कमी पडलं तर त्यांना जवळच्या सहकाऱ्यांची गरज पडणार.

"तीन टप्प्यानंतर भाजप असा संदेश देत आहे की आमची निवडणुका जिंकण्याची शक्यता तर आहेच पण जर वेळ आलीच तर भाजपच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन होईल.

निवडणुका होण्यापूर्वीच भाजपनं सर्व मित्र पक्षांना एकत्र करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. शिवसेना नेत्यांनी भाजपवर वेळोवेळी निशाणा साधला. पण अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर त्यांच्यात दिलजमाई झाली."

तामिळनाडू, बिहारमध्ये भाजपला साथीदार मिळाले. उत्तर प्रदेशात अनुप्रिया पटेल भाजपबरोबर आल्या. भाजपनं आपल्या समोर असलेले सर्व पर्याय वापरले आहेत.

"भाजपच्या विरोधकांनाही हा एक प्रकारे दिलेला इशारा आहे असं अय्यर यांना वाटतं. भाजप विरोधकांच्या आघाडीला भाजप नेते महामिलावट असं म्हणतात. सर्व भाजप विरोधक एकत्र येऊ शकले नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियंका गांधी या मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवणार होत्या अशी चर्चा होती पण ती केवळ चर्चाच ठरली.

"आतापर्यंत गांधी घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने फक्त टक्कर द्यावी किंवा स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून कधी निवडणूक लढवली नाही. पहिल्यांदा निवडणूक लढवून हार पत्करण्यात काय हाशील आहे? दुसरी गोष्ट म्हणजे भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र देखील येऊ शकले नाहीत. जर संदेशच द्यायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांचा मिळून एक उमेदवार त्यांनी देता आला असता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)