तेजबहादूर यादव: मी मोदींसमोर उभा राहून त्यांना पुलवामावर प्रश्न विचारेन

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आदर्श राठोड
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
BSFचे माजी जवान तेजबहादूर यादव यांना समाजवादी पार्टीने वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. आधीच अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे तेज बहादूर आता सपा-बसपाच्या महाआघाडीचे उमेदवार असतील.
बीबीसीशी बोलताना तेजबहादूर यांनी सांगितलं की, त्यांनी उमेदवारीसाठी सगळ्या राजकीय पक्षांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर समाजवादी पार्टीकडून त्यांना फोन आला.
ते म्हणाले, "मी वाराणसीला पोहोचल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षांना पत्र लिहिलं होतं. शिक्षक, सैन्याचे जवान आणि बेरोजगारांच्या हिताची भाषा करणाऱ्या पक्षांना माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा मला आम आदमी पक्षानं पाठिंबा दिला होता. दोन दिवसांपूर्वी मला समाजवादी पार्टीकडून फोन आला आणि लखनौला येण्यासाठी सांगितलं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्यांनी पुढं सांगितलं, "माझी आणि अखिलेश यादव यांची भेट झाली. मला समाजवादी पक्षाचं तिकीट देताना ते म्हणाले की तुम्ही मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांशी समाजवादी पार्टी सहमत आहे."
तुम्हाला जर समाजवादी पार्टीसोबत काँग्रेसनंही त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्याचं आवाहन केलं असतं तर तुम्ही काँग्रेसकडून लढला असता का, या प्रश्नाचं उत्तर देताना तेजबहादूर म्हणाले, "माझ्या मुद्द्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ते प्रश्न पुढे सातत्यानं मांडणाऱ्याच पक्षाकडून मी लढलो असतो. जर काँग्रेस माझ्या मुद्द्यांशी सहमत असती तर मी काँग्रेसकडून लढलो असतो. पण काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात माझ्या मुद्द्यांचा समावेश केलेला नाही."
शालिनीसुद्धा साथ देणार
एका पक्षाकडून लढल्यामुळे तुमच्या स्वत:च्या मुद्द्यांचं महत्त्व कमी होईल आणि पक्षाची विचारधारा वरचढ ठरेल, असं वाटतं का? या प्रश्नावर तेजबहादूर सांगतात, "मी मांडलेले मुद्दे समाजवादी पार्टीचेही मुद्दे आहेत. आपला लढा हा शेतकरी, जवान, बेरोजगार आणि मजुरांसाठी आहे, हे पक्षानं आधीच स्पष्ट केलं आहे. पार्टीनं जवानांच्या पेन्शनचा आणि त्यांना शहिदाचा दर्जा देण्याचा प्रश्नही उचलून धरला आहे."

फोटो स्रोत, TEJ BAHADUR YADAV FB
समाजवादी पार्टीनं सुरुवातीला शालिनी यादव यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता त्यांच्याजागी तेजबहादूर समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार असतील, मग अशात शालिनी यादव त्यांना प्रचारात मदत करतील का?
या प्रश्नावर तेजबहादूर म्हणतात, "महिलांच्या प्रतिनिधी म्हणून त्या मला पाठिंबा देतील आणि प्रचारही करतील, असं त्यांनी मला सांगितलंय. त्यांनीही उमदेवारी अर्ज भरलेला आहे.
"भाजपचे लोक खूपच चतुर आहेत. कुठल्यातरी छोट्या मुद्द्याचं भांडवल करून ते माझा अर्जही बाद ठरवण्याचा प्रयत्न करतील. माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या अध्यक्षांनी घेतला आहे. काहीतरी विचार करूनच त्यांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला असेल," असं ते म्हणाले.
"पक्षाच्या वतीनं उमेदवारी मिळाल्यानं आता प्रचार उत्साहानं आणि जोरदारपणे सुरू झालाय. कारण महाआघाडीच्या वतीनं तगड्या निवडणूक चिन्हावर आता मी निवडणुकीला सामोरं जात आहे," असं तेजबहादूर यांनी सांगितलं.
काँग्रेसकडून अजय रायसुद्धा वाराणसीच्या रिंगणात आहेत. पण तेजबहादूर यांनी काँग्रेसला पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. ते सांगतात, "जर त्यांना गोष्टी नीट समजल्या तर तेही आमच्या सोबत येतील. आणि तसं झालं तर ती खूपच चांगली गोष्ट असेल."
मोदींचे प्रश्न
तेजबहादूर मूळचे हरियाणाचे आहेत. 2017 मध्ये त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्यांनी जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न निर्माण केले होते आणि त्याची तक्रारही केली होती.
वाराणसीत येऊन निवडणूक लढवण्याचा हेतू काय, या प्रश्नावर ते सांगतात, "काशी हे काळभैरवाचं स्थान आहे. जर मोदी इथून जिंकू शकतात तर मला विश्वास आहे की वाराणसीची जनता मलाही आशीर्वाद देईल. मीसुद्धा इथं पहिल्यांदाच आलो आहे."
ते सांगतात, "मोदींनी जी आश्वासनं दिली होती, तीसुद्धा त्यांनी पूर्ण केली नाहीत. त्याच भावनेतून मी सैन्यात असताना जेवणाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्याबदल्यात मला नोकरीवरून बाजूला करण्यात आलं. त्यानंतर माझ्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यांनी देशाला दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. आता मी त्यांना सरळ प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. त्यांनी 2014 मध्ये जी आश्वासनं दिली होती, त्यातलं एकतरी पूर्ण केलं का?"

फोटो स्रोत, Getty Images
तेजबहादूर सांगतात, "वाराणसीत येण्याचा माझा पहिला हेतू आहे देशाची सुरक्षा. वाराणसीचे प्रश्नही माझ्या रडारवर असतील, पण मी देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बोलेन. रोजगार, सुरक्षेच्या मुद्द्यावरही बोलेन."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारात सातत्यानं दावा करतात की, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे. त्यावर प्रश्न उपस्थित करत तेजबहादूर विचारतात की, "जर देशाची सुरक्षा मजबूत झाली असेल तर पुलवामात हल्ला कसा झाला? आणि त्याची चौकशी का केली नाही?"
'जेवणाखाण्यासाठीही आम्ही महाग झालो'
तेजबहादूर सांगतात, "जर देशाची सुरक्षा मजबूत आहे, तर मग इतके जवान माझ्या पाठिंब्यासाठी का उभे आहेत? 997 जवानांना आजवर आत्महत्या केली आहे. पण हे कुणीही सांगत नाही. 775 जवान शहीद झाले आहेत. आमच्यापाशी पूर्ण आकडेवारी आहे. दरदिवशी तिकडून पाकिस्तान शाब्दिक आणि सीमेवरही आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतं, पण हे महाशय फक्त निवडणुकीच्या काळातच बोलतात."
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
तेजबहादूर व्हीडिओ जारी केल्यामुळे चर्चेत आले होते. त्यांनी जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता.
सीमेवर असताना व्हीडिओ का शेअर केला? यावर बोलताना तेजबहादूर सांगतात, "मला विश्वास होता. फक्त मलाच नाही तर अख्ख्या देशाला विश्वास होता. आम्हाला वाटत होतं की देशाचा एक चांगला पंतप्रधान मिळाला आहे. ते वारंवार आपल्याला मदत करा असं आवाहन करत होते.
"नोटाबंदीच्या दरम्यान त्यांनी गोव्यातील सभेत छाती बडवून आपल्याला मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं आवाहन देशाला केलं. त्यांनीच म्हटलं होतं ना की 'ना खाऊंगा ना खाने दूँगा? प्रत्येक भारतीयानं मला मदत करावी.'
"त्यामुळे एका सच्च्या नागरिकाच्या नात्यानं मला वाटलं की आपणही आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. त्या विश्वासापोटीच मी जेवणाच्या गुणवत्तेचा मुद्दा मांडला होता. पण बदल्यात काय मिळालं? बरखास्ती. माझं कुटुंब दोन वेळच्या जेवणासाठी महाग झालं होतं. जानेवारीत माझा मुलगा गेला."
तेजबहादूर यांच्यावर शिस्तभंग केल्याचा आरोप ठेवत त्यांना बरखास्त करण्यात आलं होतं.
ते सांगतात की, "मला मान्य आहे मी शिस्त मोडली आहे. पण माझा फंड तरी मला परत द्या. मी 21 वर्ष नोकरी केली आहे त्याची पेन्शन तर मला द्या. जर मला तेही पैसे द्यायचे नसतील तर किमान भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना तरी निलंबित करा. पण त्यांनी तेसुद्धा केलं नाही. जो भ्रष्टाचाराविरोधात लढतायत त्यांना संपवून टाका आणि जे भ्रष्टाचार करतात त्यांना संरक्षण द्या, अशी त्यांची रणनीती आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








