तेज बहादूर यादव: नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून लढणारे माजी BSF जवान आता सपाचे उमेदवार

नरेंद्र मोदी-तेज बहादूर यादव

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी हिंदी, वाराणसीहून

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून अपक्ष निवडणूक लढवत असलेले माजी सैनिक तेज बहादूर यादव यांना समाजवादी पक्षानं आता उमेदवारी दिली आहे.

आधी समाजवादी पक्षानं इथून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र आपला उमेदवार मागे घेत समाजवादी पक्षानं यादव यांना उमेदवारी दिली आहे.

तेज बहादूर यादव हे नाव दोन वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. बीएसएफच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाची तक्रार त्यांनी फेसबुकवर एका व्हीडिओच्या माध्यमातून केली होती. "वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतरही कोणी आमचं गाऱ्हाणं ऐकत नाही. गृह मंत्रालयाला पत्र पाठवूनही काही कारवाई झाली नाही," असं तेज बहादूर यांनी म्हटलं होतं. त्यांचा तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

तेज बहादूर यांच्या या व्हीडिओनं सेना आणि राजकीय वर्तुळात काही काळ चांगलीच खळबळ उडाली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले गेले आणि त्यानंतर तेज बहादूर यांना BSF मधून काढून टाकण्यात आलं.

उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपानं युती केली आहे. वाराणसीची जागा ही समाजवादी पक्षाच्या वाट्याला आली आहे. याखेरीज काँग्रेसकडून अजय राय हे वाराणसीमधून मोदींविरोधात निवडणूक लढवत आहे.

मोदींना विरोध का?

तेज बहादूर हे मूळचे हरियाणाचे आहेत. मग त्यांनी वाराणसीमधून थेट पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला?

लष्कराचं राजकीय भांडवल करणाऱ्यांना मला हरवायचं आहे, असं तेज बहादूर सांगतात.

त्यांनी म्हटलं, "काशी विश्वनाथाच्या आशीर्वादानं मला नकली चौकीदाराला हरवायचं आहे. जे लोक सैन्याचा राजकारणासाठी वापर करत आहेत, त्यांना पराभूत करायचं आहे. त्यांनी आपल्या सैन्याची बदनामी केली. त्यांच्या प्रचारामुळं सैनिकांचं मनोबल कमी झालं."

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुदलानं केलेल्या एअर स्ट्राइकचं श्रेय भाजपचे नेते आणि कार्यकर्ते पंतप्रधान मोदींना देतात.

सैन्याला निर्णय स्वातंत्र्य न दिल्यानं देशात इतके हल्ले झाल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी अनेकदा मागील सरकारांना दोष देतात.

यावर बोलताना तेज बहादूर यादव म्हणतात, "लष्करानं पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइक केलाय अशातला भाग नाहीये. यापूर्वीही लष्कराकडून अशाप्रकारची कारवाई केली जात होती. मात्र त्याचं राजकारण कधी झालं नाही. सध्याचं सरकार लष्कराच्या कारवाईचंही भांडवल करत आहे. त्यामुळं त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मी निवडणूक लढत आहे."

"आजपर्यंत जवानांनी देशाच्या सीमेचं रक्षण केलं होतं. मात्र जोपर्यंत देशाचा जवान संसदेत पोहोचत नाही, तोपर्यंत हा देश वाचणं शक्य नाहीये," असंही तेज बहादूर यांनी म्हटलं.

पुलवामा हल्ला झाला कसा?

मोदींच्या नेतृत्वात भारत अधिक बळकट झाला आहे, असं भाजपचे नेते प्रचारसभांमधून वारंवार सांगत आहेत.

'भारताची स्थिती इतकी मजबूत आहे, तर पुलवामा हल्ला झालाच कसा,' असा प्रश्न तेज बहादूर यादव उपस्थित करतात.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

पुलवामा हल्ला हा एक कट असल्याचा संशय तेज बहादूर यादव यांनी व्यक्त केला. "आपल्या शेजारी देशांना पंतप्रधान मोदींचा एवढाच धाक आहे तर मग पुलवामासारखा मोठा हल्ला झालाच कसा? आजपर्यंत लष्करावर अशाप्रकारचा हल्ला झाला नव्हता. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणीतरी हा हल्ला घडवला तर नाही ना?" असा प्रश्न तेज बहादूर यांनी विचारला.

पुलवामा हल्ल्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तेज बहादूर यादव करत आहेत. पुलवामा प्रकरणी काही त्रुटी राहिल्याचं जर जम्मू-काश्मिरच्या राज्यपालांनीही मान्य केलं आहे तर मग या हल्ल्याची चौकशी का होत नाहीये, असा मुद्दा तेज बहादूर उपस्थित करतात.

कोण आहे खरा चौकीदार?

तेज बहादूर आपल्या प्रचारासाठी पोस्टर्स वाटत आहेत. देशाचे खरे चौकीदार आपणच आहोत, असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे.

तेज बहादूर यादव यांचं प्रचाराचं साहित्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेज बहादूर यादव यांचं प्रचाराचं साहित्य

या 'खऱ्या-खोट्या' चौकीदाराच्या प्रचाराबद्दल बोलताना तेजबहादूर सांगतात, की इतकी वर्षे मी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर राहिलो आहे. त्यामुळं देशाचा खरा चौकीदार मीच आहे.

तेज बहादूर यादव या प्रचारात राफेलच्या मुद्द्यावरही भाष्य करतात. "मोदीजी जर चौकीदार आहेत, तर राफेल प्रकरणाची फाइल चोरीला कशी गेली? नीरव मोदी आणि बाकी लोक देशातून पळून गेले आहेत. मग मोदीजी कसले चौकीदार?"

निवडणुकीचा पर्याय का अवलंबला?

तेज बहादूर यादव यांना समर्थन देण्यासाठी त्यांचे बीएसएफमधील काही मित्रही वाराणसीमध्ये आले आहेत. न्याय मिळवण्यासाठी तेज बहादूर यांनी निवडणुकीचा मार्ग का अवलंबला? ते न्यायालयात का गेले नाहीत?

या प्रश्नाला उत्तर देताना तेज बहादूर यादव म्हणतात, "सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीच पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मग आमचा निभाव काय लागणार होता?"

तेज बहादूर यादव

तेज बहादूर सांगतात, "सर्व गरीब, शेतकरी, मजूर माझ्यासोबत आहेत. मी प्रचाराला बाहेर पडतो, तेव्हा हे लोक मला भेटून त्यांचं समर्थन देतात."

मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणारे श्रीमंत लोक मला मत देणार नाहीत, असंही तेज बहादूर म्हणतात.

तेज बहादूर यांनी मंगल पांडेंच्या आठवणींना उजाळा देऊन सांगितलं, की त्यांनी स्वातंत्र्याची जी ठिणगी पेटवली, त्याचंच रुपांतर स्वातंत्र्य लढ्यात झालं.

"गेल्या 70 वर्षांत पहिल्यांदाच सेनेचा एक जवान पंतप्रधानांविरोधात निवडणुकीला उभा आहे. आता या ठिणगीचा वणवा कसा होतो, हे तुम्ही पाहालच," असं तेज बहादूर म्हणतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)