अमित शाह यांनी खरंच लालकृष्ण अडवाणी यांना भाजपचं व्यासपीठ सोडून जायला सांगितलं होतं का? - फॅक्ट चेक

अमित शाह आणि लालकृष्ण अडवाणी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लालकृष्ण अडवाणी यांचा अपमान केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'जाहीर अपमान! अपमानाची परिसीमा. तोही अशा नेत्याचा ज्यानं पक्ष उभारणीत मोलाचं योगदान दिलंय,' अशा कॅप्शनसहित हा व्हीडिओ शेअर केला जातोय.

एका सभेदरम्यान लालकृष्ण अडवाणी यांना व्यासपीठ सोडण्याचा आदेश अमित शाह देत आहेत, असं या व्हीडिओत दिसून येतं.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नरेंद्र मोदींच्या सभेदरम्यान हाकलवून लावण्यात आलं, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटल्यानंतर हा व्हीडिओ चर्चेत आला.

गांधी म्हणाले होते की, "हिंदू धर्मात गुरू सर्वोच्च स्थानी असतात. गुरू आणि शिष्य यांच्या नात्याचं ते प्रतीक असतं. नरेंद्र मोदींचे गुरू कोण आहेत तर लालकृष्ण अडवाणी. शिष्य मात्र गुरूसमोर हातही जोडत नाही, तर गुरूलाच व्यासपीठावरून हाकलवून लावत आहे. आणि हेच हिंदू धर्माविषयी बोलतात."

23 सेकंदाची ही क्लिप फेसबुक आणि ट्विटरवर हजारो वेळा शेअर करण्यात आली आहे. बीबीसीच्या पडताळणीत असं लक्षात आलं की हा व्हीडिओ चुकीच्या तथ्यांसहित शेअर केला जात आहे.

व्हीडिओची सत्यता

व्हायरल व्हीडिओ हा एका मोठ्या व्हीडिओला एडिट करून पसरवण्यात आलेला भाग आहे. 9 ऑगस्ट 2014ला जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यानच्या व्हीडिओतून काही भाग काढून घेऊन हा व्हीडिओ तयार करण्यात आला आहे.

दीड तासाच्या मूळ व्हीडिओत दिसतं की अमित शाह हे अडवाणी यांना व्यासपीठावर भाषण देण्यासाठी उभं राहण्याकरता मदत करत आहेत. पण 23 सेकंदाच्या व्हायरल व्हीडिओमध्ये दोन भाग आहेत.

पहिल्या भागात नरेंद्र मोदी काहीतरी वाचत आहे, असं दाखवणारा फोटो आहे. तर अमित शहा सभेदरम्यान अडवाणींना बाहेर जाण्याचा सल्ला देताना दिसून येत आहेत.

दुसऱ्या भागात शाह आणि अडवाणी एकमेकांशी बोलताना दिसून येत आहेत. यानंतर शाह एका ठिकाणाकडे निर्देश करतात आणि त्यानंतर अडवाणी व्यासपीठ सोडून त्या दिशेला जाऊ लागतात.

शाह यांनी सांगितल्यानंतर अडवाणी यांनी व्यासपीठ सोडलं, असं त्यावरून दिसतं. पण शाह हे अडवाणी यांचा अपमान करत आहेत, असा दावा या व्हीडिओत जो केला जातोय, तो खोटा आहे.

अमित शाह आणि लालकृष्ण अडवाणी

फोटो स्रोत, SM VIRAL POST

मूळ व्हीडिओत अडवाणी यांचं नाव भाषणासाठी घोषित केल्यानंतर अमित शाह त्यांच्यासाठी माईक अॅडजस्ट करताना दिसून येतात.

असं असतानाही अडवाणी हे व्यासपीठाच्या मागच्या बाजूनं असलेल्या पोडियममधून भाषण द्यायचं ठरवतात. त्यानंतर अडवाणी यांना पोडियमपर्यंत पोहोचवण्यासाठी अमित शाह कार्यकर्त्यांना आदेश देतात.

या प्रसंगाचा संपूर्ण व्हीडिओ भाजपच्या अधिकृत यूट्यूब पेजवर उपलब्ध आहे. यात अडवाणी हे अमित शाह यांच्यापुढे बसून संपूर्ण कार्यक्रम पाहत असल्याचं या दिसून येतं.

1991पासून अडवाणी गांधीनगर मतदारसंघात निवडणूक लढवत आले आहेत. पण यंदा मात्र भाजपनं तिथून अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे. 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही, असं पक्षाचं धोरण आहे, असं भाजप नेत्यांनी अनेकदा म्हटल्याचं अनेक बातम्यांमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)