लालकृष्ण अडवाणी यांचा ब्लॉग: जे भाजपशी सहमत नाही, त्यांना कधी 'राष्ट्रविरोधी' म्हटलं नाही

फोटो स्रोत, Getty Images
माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर निवडणुकीच्या अगदी आठवडाभरापूर्वी त्यांचं मौन सोडलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या दोन दिवस आधी व्यक्त होण्यासाठी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केलं नाही तर एका ब्लॉगमधून स्वतःची भूमिका मांडली आहे.
पाचशेहून अधिक शब्दांच्या इंग्रजीत लिहिलेल्या या ब्लॉगचं शीर्षक आहे 'नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट' म्हणजे आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः.
अडवाणी यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या गांधीनगरमधून यावेळी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारीनंतर अडवाणी यांनी पहिल्यांदा सार्वजनिक भाष्य केलं आहे.
पक्ष कार्यकर्त्यांना संबोधून त्यांनी हा ब्लॉग लिहिला आहे. विशेष म्हणजे 6 एप्रिलला भाजपचा पक्ष स्थापना दिवस असतो, त्यापूर्वी हा लेख लिहिलेला आहे.
अडवाणी लिहितात...
भाजपमध्ये आपल्या सर्वांसाठी मागे वळून पाहण्याची, पुढे पाहण्याची आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची ही एक संधी आहे. भाजप संस्थापकांपैकी एक या नात्याने मी मानतो की माझं प्रतिबिंब भारतीयांपुढे विशेषतः माझ्या पक्ष कार्यकर्त्यांसमोर सादर करावं, हे माझं कर्तव्य आहे.
माझे विचार मांडण्यापूर्वी मी गांधीनगरच्या जनतेप्रति आभार व्यक्त करतो, ज्यांनी 1991 नंतर सहा वेळा मला लोकसभेसाठी निवडून दिलं. त्यांचं प्रेम आणि पाठिंब्याने मी नेहमीच भारावलो आहे.
वयाच्या चौदाव्या वर्षी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला गेलो. तेव्हापासून मातृभूमीची सेवा करणं, हेच माझे ध्येय आणि मिशन राहिलं आहे.

फोटो स्रोत, PTI
माझं राजकीय जीवन गेल्या सात दशकांपासून माझ्या पक्षाशी अविभाज्यपणे जोडून आहे. आधी भारतीय जनसंघासोबत आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाशी.
मी दोन्ही पक्षांच्या संस्थापक सदस्यांमध्ये होतो. पंडित दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि इतर अनेक महान, निस्वार्थी आणि प्रेरणादायी नेत्यांसोबत काम करणं, हे माझं भाग्य होतं.
माझ्या जीवनाचा मार्गदर्शक सिद्धांत 'आधी देश, मग पक्ष आणि शेवटी मी' हा राहिला आहे आणि परिस्थिती कशीही असली तरी मी या सिद्धांताचं पालन करण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही करेन.
भारतीय लोकशाहीचं सार अभिव्यक्तीचा आदर आणि यातील विविधता आहे. स्थापनेनंतर भाजपने कधीही त्यांना आपला 'शत्रू' मानले नाही जे राजकीय पातळीवर आमच्या विचारांशी असहमत होते. उलट आम्ही त्यांना आमचे सल्लागारच मानले.
तसंच भारतीय राष्ट्रवादाच्या आमच्या व्याख्येत आम्ही कधीही त्यांना 'राष्ट्रविरोधी' म्हटलं नाही, जे राजकीय स्तरावर आमच्याशी सहमत नव्हते.

फोटो स्रोत, Getty Images
पक्ष वैयक्तिक आणि राजकीय स्तरावर प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रती प्रतिबद्ध आहे.
देशात आणि पक्षात भारतीय लोकशाही आणि लोकशाहीच्या परंपरांचं रक्षण भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
त्यामुळेच भाजप नेहमीच मीडियासह लोकशाहीतील आपल्या सर्व संस्थांचे स्वातंत्र्य, अखंडता, निष्पक्षता राखणे आणि त्यांना मजबूत करण्याची मागणी करण्यात सर्वांत पुढे राहिला आहे.
भ्रष्टाचारमुक्त राजकारणासाठी निवडणूक सुधारणा, राजकीय आणि निवडणुकीतील फंडिंगमध्ये पारदर्शकतेवर विशेष लक्ष देणं, याला पक्षाने प्राधान्य दिलं आहे.
थोडक्यात, सत्य, राष्ट्रनिष्ठा आणि लोकशाहीने माझ्या पक्षाच्या संघर्षाच्या विकासाला अधोरेखित केलं आहे. ही सर्व मूल्यं मिळून सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि सुराज्य (गुड गवर्नंस) घडतो, ज्यावर माझा पक्ष नेहमीच आधारला आहे. आणीबाणीविरोधातील ऐतिहासिक संघर्षदेखील हीच मूल्ये टिकवण्यासाठी होता.
आपल्या सर्वांनाच एकत्रितपणे भारताच्या लोकशाही धोरणाला मजबूत करण्याचा प्रयत्न करायला हवा, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. निवडणूक लोकशाहीचा उत्सव आहे, हे खरंच आहे. मात्र ते भारतीय लोकशाहीच्या सर्व हितचिंतकांना - राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमं, निवडणूक प्रक्रियेशी निगडित अधिकारी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मतदारांसाठी प्रामाणिकपणे आत्मपरीक्षणाची एक संधी आहे.
सर्वांना माझ्या शुभेच्छा!

लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये भाजपचा सार सांगितला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. विशेषतः त्यांचा मंत्र 'पहले देश, मग पक्ष आणि शेवटी स्वतः'.

फोटो स्रोत, Twiter / narendramodi
"एक भाजप कार्यकर्ता असण्याचा अभिमान आहे आणि अडवाणी यांच्यासारख्या महान व्यक्तींनी त्याला मजबूत केल्याचादेखील अभिमान आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








