You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'साध्वी प्रज्ञासिंह यांना शिक्षा व्हायला हवी, पण भाजपनं त्यांना तिकीट दिलं
प्रज्ञासिंह ठाकूर मालेगाव स्फोटातील आरोपी आहेत आणि सध्या जामिनावर बाहेर आहेत.
तारीख होती 29 सप्टेबर 2008. वेळ रात्री 9.35 ची. मालेगावच्या अंजुमन चौक आणि भीकू चौकच्या मधोमध गुड्स ट्रान्सपोर्टसमोर स्फोट झाला. ज्यात सहा लोकांचा मृत्यू झाला आणि 101 लोक जखमी झाले.
या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसनं 23 ऑक्टोबर 2008 ला साध्वी प्रज्ञासंह ठाकूर, कर्नल पुरोहित, अजय राहीरकर, राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रेला अटक केली होती.
आता भारतीय जनता पार्टीनं भोपाळ लोकसभा मतदारसंघातून त्याच साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिलीय.
या स्फोटात लियाकत अली शेख यांची 10 वर्षाची मुलगी फरीनचाही मृत्यू झाला होता. ते सांगतात, "ती पाचवीत शिकत होती. 10 वर्षांची होती. साबण आणण्यासाठी गेली होती. जोरात स्फोटाचा आवाज झाला. मला पत्नी म्हणाली आपली मुलगीही बाहेर गेली आहे. पण मी म्हणालो की ती येईल थोड्या वेळात."
"पण नंतर भीती वाटली. मी बाहेर गेलो. मला सांगण्यात आलं की माझी मुलगी जखमी झाली आहे. मी वाडिया रूग्णालयात गेलो. पण त्या लोकांनी मला माझ्या मुलीला बघूही दिलं नाही."
ते पुढे सांगतात, "असे स्फोट घडवणाऱ्या साध्वीला खरंतर फाशी झाली पाहिजे, पण तुम्ही तिला निवडणुकीचं तिकीट देताय."
पण लियाकत यांना या प्रकरणी न्याय होईल असा विश्वास आहे. ते सांगतात, "आम्हाला भारताच्या कायद्यावर विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल. आम्हाला विश्वास आहे."
या स्फोटात 20 वर्षाच्या अझहर बिलालचाही मृत्यू झाला होता.
अझहरचे 59 वर्षाचे वडील निसार अहमद सय्यर बिलाल सांगतात, "त्या दिवशी बिलाल भिकू चौकात गेला होता. आणि स्फोटात त्याचाही मृत्यू झाला. आज तो जिवंत असता तर माझा आधार असता."
"खरंतर आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे, पण त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जातंय. हे म्हणजे आमच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं आहे."
अझहरनंतर कुटुंबाला सरकारनं मदत देण्याबद्दलही ते नाराज आहेत. ते म्हणतात, "कुटुंबाला कुठलाही फायदा मिळालेला नाही. सरकारी नोकरीचं आश्वासन मिळालं होतं. पण ना नोकरी मिळाली ना कुठला मोबदला."
निसार अहमद सय्यद बिलाल या प्रकरणावर बोलताना म्हणतात, "या स्फोटाचा तपास हेमंत करकरे यांनी केला होता. त्यांनी जमा केलेले सगळे कागदोपत्री पुरावे आता गायब झालेत, असं सरकार सांगत आहे. मग जर सरकार स्वत:ला चौकीदार म्हणत असेल तर चौकीदार असतानाही पुरावे गायब कसे झाले?"
बिलाल यांनी NIA कोर्टात अर्ज करून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये असं म्हटलंय.
त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय, "साध्वीच्या वकिलांनी त्या खूप आजारी असल्याचा दावा करून जामीन मिळवला आहे. कुणाच्यातरी आधाराशिवाय चालू शकत नाही, असंही त्यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे त्या कोर्टाच्या सुनावणीलाही हजेरी लावत नाहीत आणि दुसरीकडे निवडणूक लढवत आहेत. याचा अर्थ त्या एकदम नीट आहेत. तंदुरूस्त आहेत. कोर्टाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, कारण त्यांना केवळ आजारी असल्याच्या आधारावर जामीन मिळाला आहे.
डॉक्टर अखलाक मालेगाव स्फोटातील पीडितांना कायदेशीर मदत करतात. ते पीडितांना भेटून NIA कोर्टात साक्ष देण्यासाठी ते हजर राहतील याचीही काळजी घेतात.
त्यांनी सांगितलं, "कुठल्याही स्थितीत साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. त्यांनी आजाराचं कारण देऊन जामीन घेतला आहे. कोर्टाच्या तारखांना त्या येत नाही. पण निवडणुकीसाठी त्या तयार आहेत. हे अत्यंत चूक आहे."
स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता असिफ सांगतात की, "आज भाजपनं साध्वी प्रज्ञासिंह यांना तिकीट दिलंय, उद्या ते छोटा राजन, दाऊद इब्राहीम, रवि पुजारी कुणालाही तिकीट देऊ शकतात. म्हणजे कुठल्याही स्थितीत निवडणूक जिंकली जाऊ शकते. नथुराम गोडसे यांचे विचार गांधींच्या विचारांवर भारी पडतायत हे स्पष्ट दिसतंय."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)