जम्मू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकांत शर्मांची गोळ्या घालून हत्या

    • Author, मोहित कांधारी
    • Role, बीबीसी हिंदी

जम्मूच्या किश्तवाडमध्ये मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि त्यांच्या अंगरक्षकाची रूग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्यारबंद हल्लेखोरांनी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोघांवर अगदी जवळून गोळीबार केला.

या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकांत शर्मा यांचा जम्मूच्या सरकारी मेडिकल कॉलेजात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

चंद्रकांत हे किश्तवाड जिल्हा रूग्णालयात फार्मासिस्ट म्हणून काम करत होते.

या घटनेनंतर परिसरात जोरदार निदर्शनं सुरू झाली. तणाव वाढला. त्यामुळे जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून किश्तवाडमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

तसंच अतिसंवेदनशील भागात लष्करानं फ्लॅग मार्चही केला.

बीबीसीशी बोलताना जिल्हा न्यायदंडाधिकारी अंग्रेज सिंग राणा यांनी सांगितलं की, "किश्तवाड आणि आसपासच्या भागातील कायदा-सुव्यवस्थेचा विचार करूनच कर्फ्यू लागू करण्यात आला आहे."

भाजप प्रवक्ता पारिमोक्ष सेठ यांनी सांगितलं की, चंद्रकांत हे आरएसएसचे वरिष्ठ नेते होते, गेली 30 वर्ष ते किश्तवाडमध्ये सक्रीय होते.

याआधी दोन वेळा चंद्रकांत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं सेठ यांनी सांगितलं. मात्र यावेळी हल्लेखोरांनी अगदी जवळून गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

नोव्हेंबर 2018 मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल परिहार आणि त्यांचे भाऊ अजित परिहार यांचीही गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. ते आपल्या दुकानातून घरी जात असताना हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केलं.

किश्तवाड जिल्हा उधमपूर लोकसभा मतदारसंघात येतो. जिथून पीएमओतील राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)