‘हेमा मालिनींचा ‘तो’ फोटो म्हणजे आमच्या कष्टाची खिल्ली उडवल्यासारखं’

    • Author, पूनम कौशल
    • Role, मथुराहून बीबीसी हिंदीसाठी

राजेंद्री देवी आपल्या छोट्य़ा-छोट्या नातवांसह गव्हाचं पीक कापतायत. त्यांचं पूर्ण अंग घामानं भिजलंय. गहू कापणं हे सर्वात कठीण काम मानलं जातं. एकतर प्रचंड उकाडा आणि त्यात ही मेहनत.

आणि त्यामुळेच मोठमोठे जमीनदार आपल्या शेतातल्या गव्हाचं पीक काढण्यासाठी राजेंद्री देवींसारख्या भूमीहीन मजुरांची मदत घेतात.

राजेंद्री देवी तीन एकर गव्हाचं पीक कापतायत. पतीसह त्यांच्या नऊ नातीही या कामात त्यांची मदत करतायत.

या कामासाठी राजेंद्री देवींना आठवड्याचा काळ लागेल. आणि त्याबदल्यात मिळतील फक्त 120 किलो गहू.

राजेंद्री देवी सांगतात की, "आम्ही इथं मजुरी करतो. शेता-शेतात जाऊन गहू कापतो. तीन एकर गव्हाचं पीक कापण्याच्या बदल्या 120 किलो गहू मिळतील."

पुढं म्हणतात, "हे काम करणं म्हणजे साधी 200-250 रुपयेसुद्धा मजुरी मिळत नाही. एवढ्याशा पैशात काय होतं? साधं एक किलोभर तेलही मिळत नाही. हे सगळ्यात कठीण काम आहे. कधी कधीतर मजुरीही मिळत नाही. मेहनत मजुरी करूनही पळवून लावलं जातं."

राजेंद्री देवी भूमीहीन मजूर आहेत. सहा वर्षापूर्वी त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा मृत्यू झाला आणि मग त्यांच्यावर नऊ लहान लहान नातींच्या पालणपोषणाची जबाबदारी येऊन पडली.

सरकारी योजनांमुळे काय मिळतं?

गव्हाचं पीक कापण्याचं काम करून त्या वर्षभर पोट कसं भरायचं याची तजवीज करतील. राजेंद्री देवी म्हणतात की सरकारी योजनांचा कसलाही फायदा मिळत नाही.

त्या सांगतात, "कुठल्याही सरकारनं कसलीच मदत केलेली नाही. इतकं दु:ख आहे की सांगू शकत नाही. कुणी काहीही देत नाही. आम्ही म्हटलं पेन्शन द्या. या चिमुरड्यांच्या खाण्यापिण्यचा खर्च तरी भागेल. कपडेसुद्धा आम्ही मागून घालतो."

आपला फाटका शर्ट दाखवत त्या म्हणतात, "आम्ही असे फाटके कपडे परिधान करतो. मजबुरी आहे. जेव्हा आम्ही देवाघरी जाऊ तेव्हाच आमची मजबुरी दूर होईल, त्याआधी काहीही होणार नाही."

हेमा मालिनी हातात गव्हाचं कापलेलं पीक घेऊन उभ्या असलेला फोटो सध्या व्हायरल झालाय. त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. अर्थात ड्रीमगर्ल हेमा मालिनी सत्ताधारी पक्षाच्या पोस्टरगर्लही आहेत.

पण उद्या जर सरकारी योजनांच्या अपयशाचं पोस्टर बनलंच तर त्याच्या पोस्टरगर्ल राजेंद्री देवीच असतील.

विकासाची 'काळी कहाणी'

ज्या शेतात त्या गहू कापतायत, ते यमुना एक्स्प्रेस वेशी जोडलं गेलेलं आहे.

एकीकडे वायुवेगानं धावणारा विकास आहे आणि दुसरीकडे आपलं आयुष्य संपण्याची वाट बघणाऱ्या मजबूर मजूर राजेंद्री देवी.

लहान लहान मुलींकडून गहू कापण्याच्या प्रश्नावर त्या सांगतात, "थोडाफार तरी सहारा मिळेल. एक दोन मण गहू येईल. जेव्हा ही मुलं उपाशी झोपतील तेव्हा कोण विचारेल? कुणी मदत करणार नाही. ना समाज ना सरकार. कुणालाही काहीही देणंघेणं नाहीए."

त्यांच्या नाती सांगतात, आम्ही सकाळी सात वाजता शेतात येतो. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथेच असतो. अख्खा दिवस गव्हाचं पीक कापतो.

शेताचे मालक सत्यपाल सिंग सांगतात की, "हेमा मालिनी यांनी फोटो काढून फक्त दिखावा केलाय. खरंतर गहू कापणं ही सोपी गोष्ट नाहीए. अख्खा दिवस उन्हात घाम गाळावा लागतो. आमच्याकडूनही होत नाही, हेमा मालिनी काय गहू कापणार?"

भूमीहीन शेतकऱ्यांची अवस्था

बहुतेकवेळा भूमीहीन परिवावातील महिलाच गहू कापण्याचं काम करतात. तीन मुलींची आई असलेल्या पिंकी आपल्या कुटुंबासह गहू कापण्याचं काम करतात.

हे काम करून त्यांचे हात कठीण झालेत. हाताला घट्टे पडलेत.

पिंकी सांगतात, "हाताला खूप वेदना होतात. हे खूप कठीण काम आहे. पण कसंबसं पोट भरेल इतकाच मोबदला मिळतो. या कामाच्य बदल्यात आम्हाला पैसे मिळत नाहीत, फक्त गहू मिळतात."

"आम्हा गरीब लोकांसाठी कुठेच काहीही नाहीए. आम्ही फक्त मतं देतो. निवडून येणारे परत कधीच विचारायला येत नाहीत. आम्ही कच्च्या घरात राहतो. आम्हाला कुणी विचारत नाही. निवडणुका आल्या की आणखी एक गोष्ट होते, ती म्हणजे दारू वाटली जाते. प्या मजा करा..पण आमच्यासारख्या महिलांसाठी तर काहीच नाही. कशीबशी वेळ पुढं ढकलतो आहे."

त्या सांगतात, "आम्ही शेतात काम करतो. नंतर घरी जाऊन कुटुंबासाठी जेवण बनवतो. आम्ही पुरूषांपेक्षाही जास्त काम करतो. हाताला वेदना होतात, तरीही काम करत राहतो."

'रडत-रडत रात्र निघून जाते'

सावित्रीदेवीही भूमीहीन मजूर आहेत. त्या सकाळी आधी घरातलं काम करतात. नंतर गहू कापण्यासाठी शेतात येतात. सगळा दिवस काम करून थकून जेव्हा त्या घरी येतात, तेव्हा दोन क्षणही आराम करण्यासाठी वेळ मिळत नाही. मुलांसाठी जेवण बनवावं लागतं. सगळ्या कुटुंबाचं जेवणखाण झाल्यानंतरच त्यांना स्वत:साठी थोडा वेळ मिळतो.

बहुतेकवेळा पती दारूच्या नशेत असतो. काही बोललं तर मारझोडही करतो. त्या सांगतात की, बऱ्याचदा रात्र रडत-रडत निघून जाते.

त्या सांगतात की आतार्यंत कुठल्याही सरकारच्या योजनांचा कसलाही फायदा त्यांना मिळालेला नाही.

पुढं म्हणतात, "आम्हा गरीबांसाठी सरकारही काहीच करत नाही. दारूड्यांचं पिण्याचं काम चालू आहे. पुरूष शिवीगाळ करतात. सकाळ-संध्याकाळ मारझोड होते. पुरूष जंगलात, शेतात छेडछाड करतात. दिवसभर भुकेनं व्याकूळ झालेल्या मुलाबाळांसह जंगलात पडून राहतो."

"अन्नधान्य महाग झालं आहे. तेल महाग झालं आहे. भाजीपाला महाग झाला आहे. मुलाबाळांना कसं जगवतोय कुणालाही कळणार नाही. दारू पिणारे नशेत झोपून जातात. त्यांना काय माहिती की चार मुलं कशी वाढतायत ते?"

फोटो काढणं वेगळं काम आणि गहू कापणं वेगळं

तिकडं देशाची राजधानी दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या दादरी परिसरात कश्मिरी आपल्या दोन तरूण पोरांना घेऊन गव्हाचं पीक कापण्याचं काम करत आहेत.

हेमा मालिनी यांचा 'तो' फोटो बघून त्या सांगतात की, "फोटो काढणं वेगळं काम आहे आणि गहू कापणं वेगळं. हे शेतीतलं सगळ्यात अवघड, कठीण काम आहे. अशा प्रकारे फोटोसेशन करणं आमच्या कष्टाची खिल्ली उडवण्यासारखं आहे."

कश्मिरी पुढं म्हणतात, "डोक्यावरचा घाम निथळून पायावरून ओघळून जातो. मजबुरी आहे म्हणून ही मजुरी करतो आहोत. सगळ्यात कठीण काम आहे. तीन-चार लोक कामाला लागलो आहोत, तरीही दिवसभरात एकरभर गहू कापून होणार नाही. पोरांचं पोट भरायचं आहे, म्हणून करत आहोत."

राजेंद्री यांच्याप्रमाणेच कश्मिरी यांनाही कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा मिळालेला नाही. त्यांनाही गहू कापण्याच्या बदल्यात फक्त गहू मिळतात.

त्या सांगतात, "मातीच्या कच्च्या घरात वेळ काढत आहोत. अख्ख्या गावात आम्हीच अशा कच्च्या घरात राहतो. पण कुणीही आम्हाला घर बांधण्यासाठी मदत केली नाही."

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कश्मिरी यांच्यासारख्या गरीब कुटुंबांना घर बनवण्यासाठी सरकार अडीच लाखाची मदत करतं.

पण आतापर्यंत कश्मिरी यांच्या मदतीला कुणीही धावून आलं नाही. त्या सांगतात की, त्यांच्यासाठी पळापळ करणारं कुणीही नाही.

इथून काहीच अंतरावर जयपाली आपल्या एका शेजारणीला सोबत घेऊन गव्हाचं पीक कापण्याच्या कामात गुंतल्या आहेत.

त्यांचं दु:खही राजेंद्री आणि कश्मिरी यांच्यापेक्षा वेगळं नाही. वर्षभर पोटाची काळजी मिटावी म्हणून त्या हे काम करतायत.

त्या सांगतात, "काम कसलं, उकाड्यात मरण होतंय आमचं. आणि हे काम करणार नाही तर मग मुलांना कसं पोसणार? उकाडा असो की हिवाळा आम्हाला तर मेहनतीशिवाय पर्यायच नाही."

'विजेचं बिल कुठून भरणार'

त्या सांगतात, "पहिल्यांदा विजेचं बिल कमी यायचं. आता महिन्याला हजार रूपयेच येतं. आमच्यासारखा गरीब माणूस एवढं बिल कुठून भरेल? हे बिल वाढून वाढून 35 हजार झालं आहे. आता कुणीतरी आमचं बिल कमी केलं तर मोठी मदत होईल"

कुठल्याही सरकारच्य किंवा पक्षाच्या आश्वासनांवर त्यांचा विश्वास नाहीए. पण जेव्हा त्यांना थेट अकाऊंटमध्ये पैसे जमा होणाऱ्या योजनेविषयी सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या, "असं होत असतं, आमच्या अकाऊंटला थेट पैसे जमा झाले असते तर इथं आम्ही कशाला रक्त जाळत बसलो असतो."

इथून 50 किलोमीटर दूर गंगनहरच्य किनाऱ्यावर असलेल्या मेरठ जिल्ह्यातील भोला झाल गावातील मुन्नीदेवी आपल्या मुलींसह जंगलात चालल्या आहेत.

त्यांच्या हातात कुऱ्हाड आहे. त्या सांगतात की, "लाकूड कापण्यासाठी आम्ही निघालो आहोत. जंगलातून लाकूड कापून आणलं तर संध्याकाळी चूल पेटेल आणि जेवण बनवता येईल."

केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा फायदा मुन्नीदेवींना मिळालेला नाही. त्यांच्यासोबत जंगलात चाललेली त्यांची नाबालिक मुलगी निशाला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, पण लवकरच तिचं लग्न लाऊन दिलं जाणार आहे.

पण इतक्यात लग्न करण्याची निशाची इच्छा नाही.

ती म्हणते, "मम्मी-पप्पा मजबूर आहेत. घरात काहीच नाहीए. कर्ज झालंय. घर गहाण ठेवलंय. माझ्यापुढे दुसरा कुठला रस्ताच नाहीए."

निशा म्हणते, "पैशाच्या तंगीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं. वडिलांनी सावकाराकडून 40 हजाराचं कर्ज घेतलं होतं. ते वाढून आता अडीच लाख झालं आहे. आम्हाला कुठल्याही दिवशी घरातून बाहेर काढलं जाऊ शकतं."

लाकूड कापून आणल्यानंतर मुन्नीदेवी यांना गव्हाचं पीक कापायला जायचं आहे. खाण्यासाठी गव्हाचंच नाही तर त्यांना इंधनासाठी लाकडाचीही तजवीज करावी लागते.

पण या सगळ्यानंतरही मुन्नीदेवी यांना आपल्या मुलीचं शिक्षण अर्धवट राहिल्याचं दु:ख आहे.

त्या सांगतात, "आम्हा गरीबांची कुणीही मदत करत नाही. मुलीचं लग्न झालं तर एक चिंता संपून जाईल."

मुन्नीदेवी यांचे पती मजुरी करतात. आणि नेहमी संध्याकाळी दारू पिऊन घरात भांडणं करतात. निवडणुकीच्या धामधुमीतही त्यांना कुठल्याही नेत्याकडून कसलीही अपेक्षा नाहीए.

"आमच्यासारख्या गरीबांना कुणी काहीच मदत करत नाही. तुम्ही काही मदत केली तर भलं होईल."

गव्हाचं पीक कापण्याचं काम करणाऱ्या जितक्य महिलांना मी भेटले त्या सगळ्या दलित वर्गातील होत्या. हेमा मालिनींचा 'तो' फोटो त्यांना आपल्या कष्ट आणि आयुष्यातील अडचणींची खिल्ली उडवताना दिसतो.

कर्जमाफीची योजना

केंद्र आणि राज्य सरकारांनी नुकतंच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या योजनेची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये थेट दोन हजार रूपये जमा केले.

पण सरकारच्या अशा योजनांचा फायदा राजेंद्री किंवा जयपालीसारख्या महिलांना होत नाही. सरकारच्या योजनांचा फायदा तर दूरच पण भूमीहीन मजूर महिलांना त्यांच्या मेहनतीचा नीट मोबदलाही मिळत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)