लोकसभा 2019: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या माफूजा खातून काँग्रेसला आव्हान देत आहेत

    • Author, प्रभाकर एम.
    • Role, बीबीसी हिंदीसाठी कोलकात्याहून

माफूजा खातून पश्चिम बंगालमधून भाजपच्या पहिल्या अल्पसंख्यक महिला उमेदवार आहेत. भाजपविषयी लोकांची धारणा त्यांना बदलायची आहे.

खातून मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या आहेत. विजय आपलाच होईल, याची खात्री त्यांना वाटते.

यावेळी लोकांचे भरपूर समर्थन मिळत असल्याचा दावा त्या करतात. त्या म्हणतात की यावेळी या मतदारसंघातून काँग्रेसऐवजी भाजपला जिंकून आणायचं, अशी चर्चा लोकांमध्ये आहे.

खातून आपल्या प्रचारादरम्यान स्थानिक बिडी कामगारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जिंकल्यानंतर हा प्रश्न त्यांना संसदेत लावून धरायचा आहे.

काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या जंगीपूर मतदारसंघातून अल्पसंख्यक समाजातील महिलेला पहिल्यांदाच उमेदवारी दिल्याने त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचे आभार मानतात.

खातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यतील कुमारगंज या विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा (2001 आणि 2006) आमदार होत्या. मात्र 2016च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर वर्षभराने त्यांनी भाजपची प्राथमिक सदस्यता स्वीकारली होती.

मात्र गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत निवडणुकीतील त्यांच्या भाषणांमुळे त्या प्रकाशझोतात आल्या. याच कारणामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी यावेळी खातून यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली होती.

उमेदवारी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या जंगीपूरमध्ये दाखल झाल्या आणि प्रचार मोहिमेला सुरुवातही केली. आता त्या रोज सकाळी आठ वाजेपासून प्रचाराला निघतात.

कडक उन्हात पायी प्रचार करणे, छोट्या-छोट्या सभा घेणे आणि त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बसून दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आखणे, हा त्यांचा दिनक्रम झाला आहे.

माफूजा खातून म्हणतात, "भाजप आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही. बंद दाराआड होणाऱ्या बैठकांमध्येदेखील पक्षाचा कुठलाच नेता अल्पसंख्यकांविरोधात बोलत नाही. मात्र बाहेर राहून हा बदल समजून घेणं अवघड आहे. मी पक्षाबद्दल मतदारांची मतं बदलू इच्छिते. भाजप अल्पसंख्यकविरोधी पक्ष आहे, अशी प्रतिमा तयार करण्यात आली होती."

माकपमधून भाजपमध्ये आल्या कारण...

अनेक स्थानिक अल्पसंख्यक संघटनादेखील भाजपला समर्थन देत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्या म्हणतात मोदींच्या 'सबका साथ सबका विकास' या घोषणेवर लोकांचा विश्वास वाढत चालला आहे.

मात्र दीर्घकाळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात राहिल्यानंतर आणि दोन-दोन वेळा आमदार होऊनदेखील तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? यावर त्या म्हणतात, "नरेंद्र मोदी मुस्लीम महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देणारे आणि ते दूर करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी उचललेली पावलं आणि विकासाच्या एजेंड्याने प्रभावित होऊनच मी भाजपची कास धरण्याचा निर्णय घेतला."

माफूजा खातून सांगतात की जंगीपूर भागातील जवळपास 24 लाख लोकसंख्येपैकी 60 टक्के जनता ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या बिडी उद्योगाशी जोडली आहे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र आजवर कुठल्याच राज्य सरकार किंवा खासदाराने त्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्या आता या प्रश्नांचा अभ्यास करत आहेत, जेणेकरून त्यांना या समस्या दिल्लीत मांडता येतील.

प्रणव मुखर्जींचा मतदारसंघ

पक्षाने खातून यांना गेल्या वर्षी मुर्शिदाबाद जिल्हा मुख्यालय बहरमपूरच्या निरीक्षकपदी नेमलं होतं. जंगीपूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत भाजपचा प्रभाव वाढतो आहे. विशेष म्हणजे 2009च्या लोकसभा निवडणुकीनंतर दरवेळी काँग्रेस आणि CPMची मतं कमी होऊन भाजपची वाढली आहेत.

2009 साली प्रणव मुखर्जी 1.28 लाख मतांच्या फरकाने इथून निवडून आले. मात्र 2012 साली राष्ट्रपती झाल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यावर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी विजयी झाले. मात्र ते केवळ अडीच हजार मतांच्या फरकाने निवडून आले. केवळ तीन वर्षात काँग्रेसच्या मतांमध्ये 15 टक्क्यांची घट झाली. हा काँग्रेसचा मतदारसंघ समजला जातो. मात्र इथे काँग्रेस आता दुबळी होत चालली आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये 20 टक्क्यांची घट झाली आणि अभिजीत मुखर्जी केवळ आठ हजार मतांनी निवडणूक जिंकले.

तृणमूल काँग्रेसने 2009 आणि 2012 दोन्हीवेळी इथून उमेदवार दिला नाही. मात्र 2014 साली तिसरे स्थान पटकावले. तृणमूल काँग्रेसला 18.54% मतं मिळाली.

CPMच्या मतांमध्ये जवळपास 7.45 टक्के घट झाली. 2009 साली 2.33 टक्के मतं मिळवणाऱ्या भाजपची मतं 8.65 टक्क्यांवर पोहोचली. यावेळी डाव्यांनी इथून उमेदवार दिलेला नाही. तरीदेखील तृणमूल काँग्रेस आणि भाजपमुळे अभिजीत मुखर्जी यांना इथून त्रिशंकू लढत लढावी लागणार आहे.

79 टक्के साक्षरता असणाऱ्या जंगीपूर क्षेत्रात शेती आणि बिडी उद्योग, हीच उपजीविकेची मुख्य साधनं आहेत. 2011च्या जणनगणेनुसार जंगीपूरमध्ये 67% अल्पसंख्यक आहेत. हेच जातीय समीकरण लक्षात घेत काँग्रेसव्यतिरिक्त इतर सर्व पक्षांनीही अल्पसंख्यक उमेदवार दिला आहे.

भाजप उमेदवार खातून यांनी स्थानिक अल्पसंख्यक महिलांची दुखरी नस पकडली आहे. त्या म्हणतात, "तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांचं जीवन नरक बनलंय. मुशिर्दाबादमध्ये अशा महिलांची संख्या जवळपास दोन लाख एवढी आहे."

माफूजा खातून काँग्रेसच्या या गढाला सुरुंग लावू शकतील का? राजकीय विश्लेषक अभिजीत घोषाल म्हणतात, "खातून यांना ऐकण्यासाठी गर्दी तर होते. विशेषतः महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. मात्र या गर्दीचे रूपांतर मतात करण्याचे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. यात यश मिळालं तरच त्या इतिहास रचू शकतील."

कदाचित हाच इतिहास रचण्यासाठी माफूजा उन्हातान्हात या भाग पिंजून काढत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)