लोकसभा 2019 : 'पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना लोक आता प्रश्न विचारू लागले आहेत'

मराठवाड्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून बीड लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. 2009 साली बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना भाजपाचे लोकसभेतील उपनेते होण्याची संधी मिळाली होती.

2014 साली झालेल्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे मोठ्या फरकाने विजयी झाले होते. या निवडणुकीमध्ये त्यांना 6 लाख 35 हजार 995 मते मिळाली होती. मात्र केंद्रामध्ये नवे सरकार आल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांचं अपघाती निधन झालं.

2014 साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. प्रीतम यांना 9 लाख 22 हजार 416 मते मिळाली आणि त्यांनी एक विक्रमच प्रस्थापित केला.

त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या अशोक पाटील यांना 2 लाख 26 हजार 95मते मिळाली होते. पोटनिवडणुकीतील या निकालामुळे बीड मतदारसंघाकडे देशातील सर्वच राजकीय विश्लेषकांचे लक्ष गेले.

यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र तशी स्थिती नसल्याचे संकेत मिळू लागले आहेत. प्रीतम मुंडे यांनी खासदार निधी पूर्ण खर्च न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्याचे पडसाद सर्वच राजकारणावर उमटू लागले.

प्रीतम मुंडे यांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्नही केला. बीड जिल्ह्याच्या वेशीवर रेल्वे आणल्याचा उच्चारही केला.

'आता भावनेची लाट नाही'

2014 साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या. आता मात्र अशी लाट नाही, असं बीडमधील ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "2014 च्या पोटनिवडणुकीमध्ये जशी लाट होती तशी आता नाही. यावेळेस प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आपण केलेल्या कामाच्या बळावर लोकांसमोर जायचं आहे. गोपीनाथ मुंडे यांची मुलगी हे स्थान डोळ्यांमध्ये असलं तरी लोक आता प्रश्न विचारू लागले आहेत. त्याची उत्तरे त्यांना प्रचारामध्ये द्यायची आहेत."

लोकसभेत अनुपस्थिती आणि खासदार निधीचा पूर्ण वापर न केल्याचा मुद्दा आता विरोधकांनी उपस्थित केला आहे.

त्याबद्दल वसंत मुंडे म्हणतात, "खासदार निधीचा वापर पूर्णपणे न केल्याची माहिती प्रसिद्ध झाल्यावर गेल्या सहा सात महिन्यांमध्ये अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे. आता ही कामं सर्व प्रशासकीय मंजुरी मिळून प्रत्यक्षात यायला काही कालावधी लागेल. तसंच जिल्ह्यामध्ये लोकांशी संपर्क कमी असणं हासुद्धा प्रीतम यांच्यादृष्टीने अडथळा आहे. बीडच्या जिल्हास्तरावर त्यांचं कार्यालय नाही. सर्व कामकाज परळीमधून चालवलं जातं."

2014 साली पोटनिवडणुकीमध्ये अशोक पाटील यांना सव्वा दोन लाख मतं मिळाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हा आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला नव्हता याचीही आठवण वसंत मुंडे करून देतात.

अशोक पाटील यांनी फारसा प्रचार केला नव्हता तरीही त्यांना इतकी मतं मिळाली होती याचाच अर्थ प्रीतम यांच्याविरोधात तेव्हाही मतदान झाले होतं, असं ते सांगतात.

बजरंग सोनवणे कोण आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये उमेदवारी दिलेले बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. सोनवणे आणि त्यांची पत्नी जिल्हापरिषदेचे सदस्य आहेत.

त्यामुळे जिल्हयाच्या राजकारणात त्यांचं सर्वत्र नाव आहे. अशी माहिती स्थानिक पत्रकार संजय मालानी यांनी बीबीसी मराठीला दिली.

मालानी म्हणाले, "सोनवणे यांना पक्षांतर्गत विरोधक नाहीत. लोकसभेसाठी ते नवखे असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते नवखे नाहीत.

येडेश्वरी हा साखर कारखाना ते चालवतात. या कारखान्यामुळे केज आणि परळी दोन तालुक्यांवर त्यांचा प्रभाव आहे. प्रस्थापित नेत्यांविरोधात लोकांमध्ये असंतोष असतो. सोनवणे यांचा चेहरा त्या अर्थाने प्रस्थापित नाही. ही निवडणूक अटीतटीची होईल असं वाटतं."

बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असली तरी राष्ट्रवादीच्या अंतर्गत असंतोषाचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल असं वसंत मुंडे यांना वाटतं.

अमरसिंह पंडित यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. तसंच मुंदडा कुटुंब कसंबसं राष्ट्रवादीला मदत करण्यास राजी झालं आहे. जयदत्त क्षीरसागर हेसुद्धा राजकारणापासून लांब गेले आहेत, असं मुंडे सांगतात.

वंचित बहुजन आघाडी आणि इतर उमेदवार

वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रा. विष्णू जाधव ही निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या मतांमुळे राष्ट्रवादीला फटका बसेल असे स्थानिक पत्रकार नितिन जोगदंड यांचं मत आहे.

तसंच निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण 36 उमेदवार आहेत. त्यामुळेही मताचं विभाजन होईल आणि भाजपाला मदत होऊ शकते, असं जोगदंड सांगतात.

बीडची रेल्वे येणार तरी कधी?

बीड जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीमध्ये पुन्हा डोके वर काढतो. बीडमध्ये रेल्वे येणार, आणली जाणार अशी आश्वासनं आणि घोषणा दर पाच वर्षांनी केल्या जातात.

आता "जिल्ह्याच्या वेशीवर आपण रेल्वे आणली की नाही?" असा प्रश्न प्रीतम मुंडे यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये लोकांना विचारला.

"परंतु रेल्वेचा मुद्दा केवळ निवडणुकांमध्ये येतो. लोकांचे प्रश्न सुटले तर मतं कशी मिळतील असा प्रश्न सर्वपक्षीय राजकारण्यांना पडत असावा, त्यामुळेच रेल्वे येण्यास विलंब होत असावा", असं वसंत मुंडे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)