You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निवडणूक 2019: यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी पाचव्यांदा लोकसभेत जाणार का?
लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
वर्ध्यामध्ये रामदास तडस आणि चारुलता टोकस यांच्यामध्ये लढत होत आहे. रामटेक मतदारसंघात कृपाल तुमाणे यांच्याविरोधात काँग्रेसचे किशोर गजभिये, नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले, भंडारा-गोंदियामध्ये सुनील मेंढे आणि नाना पंचबुद्धे, गडचिरोली-चिमूरमध्ये अशोक नेते आणि नामदेव मुसंडी, चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर यांच्याविरोधात सुरेश धानोरकर आणि यवतमाळ-वाशिममध्ये भावना गवळी यांच्याविरोधात माणिकराव ठाकरे असे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
शिवसेनेच्या भावना गवळी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शिवसेनेच्या भावना गवळी यांनी 1999 साली झालेल्या निवडणुकीत विजय मिळवून लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2004मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये यवतमाळ-वाशिम मतदारसंघ तयार झाला. त्या निवडणुकीतही विजय मिळाल्यावर भावना गवळी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2014 साली त्या पुन्हा विजयी झाल्या. आता त्या पाचव्यांदा निवडणुकांना सामोरे जात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना तिकीट दिले आहे.
'दोन्ही नेत्यांना पक्षांतर्गत विरोध'
वाशिम-यवतमाळ मतदारसंघाबाबत बोलताना नागपूर तरूण भारतचे पत्रकार विवेक कवठेकर म्हणाले, "भावना गवळी आणि माणिकराव ठाकरे या दोन्ही नेत्यांना पक्षांतर्गत विरोध होतो आहे. शिवसेनेत संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यामधील मतभेद गेल्या दोन वर्षांमध्ये अधूनमधून दिसले आहेत. तसेच सलग चारवेळा निवडून गेल्यामुळे त्यांच्याविरोधात प्रस्थापितांविरोधात असलेल्या जनमताचेही आव्हान त्यांच्यासमोर आहे.
तर माणिकराव ठाकरे यांच्याबाबतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. त्यांचं प्रदेशाध्यक्षपदी काम केलेलं असणं, विधानपरिषदेत जाणं या जमेच्या बाबी असल्या तरी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवाजीराव मोघे आणि वसंतराव पुरके यांचे पक्षांतर्गत आव्हान त्यांच्यासमोर आहेच. भावना गवळी आणि माणिकराव ठाकरे हे दोघेही कुणबी समाजाचे आहेत. कदाचित एखाद्या पक्षाने बंजारा समाजाला उमेदवारी दिली असती जातीय समीकरणांचाही मतदानावर प्रभाव दिसला असता."
माणिकराव ठाकरे यांना होणाऱ्या पक्षांतर्गत विरोधाबाबत लोकमतचे औरंगाबाद आवृत्तीचे निवासी संपादक प्रेमदास राठोड यांनी सांगितले, "काँग्रेसमधील अंतर्गत विरोधाचा फायदा भावना गवळी यांना होईल असे दिसते. प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना गवळी यांना करायचा असला तरी काँग्रेसमधील वादाचा त्यांना फायदा होईल असे दिसते. माणिकराव ठाकरे जवळपास 15 वर्षांनी लोकसभेची निवडणूक आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देशातील इतर निकालांपेक्षा वेगळे निकाल लागू शकतात असंही राठोड यांचं निरीक्षण आहे. ते म्हणतात 1977 साली संपूर्ण देशभरात काँग्रेसविरोधात निकाल लागत असताना येथे मात्र काँग्रेसला यश मिळालं होतं. त्यामुळे यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचा निकालाबद्दल भाकीत करता येत नाही."
"यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न यवतमाळ-वाशिम मतदारसंघात महत्त्वाचे आहेत. भर उन्हाळ्यात मतदान होणार असल्यामुळं त्याचाही निवडणुकीवर कसा परिणाम होतो हे पाहाणं ही महत्त्वाचं आहे", असंही राठोड यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)