लोकसभा 2019 : नितीन गडकरी म्हणतात, लष्कराची कामगिरी हा राजकारणाचा वा श्रेयाचा विषय बनता कामा नये

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

लष्कराच्या कामगिरीचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये, तसं केलं तर ते चूकच आहे या मताचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

"हा राजकारणाचा विषय नाही. देशाची सुरक्षा ही इतर सर्व गोष्टींच्या वर आहे. त्यामुळे हा राजकारणाचा वा श्रेयाचा विषय बनता कामा नये. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सर्वांनी सृजनशील आणि संवेदनशील राहणं हेच जास्त महत्वाचं आहे. कोणत्याही बाजूनं राजकारणात अशा गोष्टी येणं हे देशाच्या हिताचं नाही आहे," असं गडकरी म्हणाले आहेत.

गडकरींची ही भूमिका भाजपालाच आरसा दाखवणारी आहे असं म्हटलं जातं आहे. कारण भाजपाच्या अनेक नेत्यांनी पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाई बद्दल श्रेयवादाची विधानं केली होती.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही बालाकोट हवाई हल्ल्यांमध्ये अडीचशेहून अधिक अतिरेकी मारले गेल्याचं एका भाषणात म्हटलं होतं.

सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून विशेष भाषण करतांना अंतराळातील उपग्रह रोधक मिसाईलच्या 'मिशन शक्ती'ची घोषणा जरी निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात केली असली तरी तिचं टायमिंग राजकीय उद्देशानं नव्हतं, असंही गडकरी म्हणाले.

जर भाजपाला बहुमत मिळालं नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत तर गडकरी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का, या प्रश्नावर मात्र ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. आम्हाला बहुमत मिळेल आणि मोदीच पंतप्रधान होतील असा दावा त्यांनी केला आहे.

बऱ्याच काळापासून गडकरींचं नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे. जर बहुमत आलं नाही आणि आघाडीसाठी सर्वसमावेशक चेहरा पुढे करावा लागला तर रा. स्व. संघातर्फे गडकरींचं नाव पुढे केलं जाईल असा कयास लावला जात आहे.

"संघ कधी कोणाचं नाव पुढे करत नाही. संघाला सगळे स्वयंसेवक सारखेच असतात. तुम्ही आपली ही भांडी इकडं तिकडं करत असता. हे पत्रकारांच्या मनातले मांडे असतात. याला काहीही वस्तुस्थितीचा आधार नाही," असं गडकरी म्हणालेत.

रोजगारनिर्मितीच्या दिलेल्या आश्वासनांवरून आणि वाढत चाललेल्या बेरोजगारीवरून भाजपा सरकारवर होणारी टीका अजिबात मान्य नसल्याचं गडकरी म्हणाले.

'राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थे'नं केलेल्या सर्वेक्षणात भारतात बेरोजगारीचा दर ६.१ एवढा झाल्याचं आणि हा गेल्या ४५ वर्षांतला उच्चांक असल्याचं म्हटलं गेलंय, पण सरकारनं हा अहवाल दाबल्याचा आरोप केला जातो आहे. "हा गेल्या ७० वर्षांपासून असलेला प्रश्न आहे आणि तो पाच वर्षांमध्ये सोडवू असा दावाही आम्ही केला नाही. पण जी आर्थिक धोरणं आम्ही स्वीकारली आहेत त्याच्या आधारानं नक्कीच येत्या १०-१२ वर्षांत हा प्रश्न सुटेल," असं गडकरी म्हणाले.

भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात वाढत गेलेल्या शेतकरी आत्महत्यांबद्दलही गडकरी यांना या मुलाखतीत विचारलं गेलं.

"आपलं सिंचन फक्त १८ टक्के आहे. आत्महत्यांच्या संबंध सिंचनाशी आहे. पहिल्यांदा 'प्रधानमंत्री सिंचाई योजने'तून २८ प्रकल्प मी महाराष्ट्रात पूर्ण केले आहेत. २० हजार कोटी त्यासाठी दिले. १०८ प्रकल्प दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त भागात घेतले आहेत. त्यातून महाराष्ट्राचं सिंचन ४८ टक्क्यांवर जाणार आहे. मग आत्महत्या शेतकरी करणार नाहीत. एवढे पैसे कधी याअगोदर भारत सरकारकडून मिळाले का? तुम्ही एक लक्षात घ्या, लग्न झाल्यावर दुसऱ्या महिन्यात तर लगेच मुलगा होत नाही ना? नऊ महिने थांबावं लागेल ना? शेवटी हे ७० वर्षांपासूनचे प्रश्न आहेत. ५ वर्षांत उत्तरं मिळणार नाहीत," असं गडकरी म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)