JNUचे नजीब अहमद खरंच ISमध्ये गेलेत का? - फॅक्ट चेक

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कथित इस्लामिका स्टेट ( IS किंवा आयसिस) झेंड्याच्या पार्श्वभूमीवर काही शस्त्रास्त्रधारी उभे आहेत.

हा फोटो जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नजीब अहमदचा आहे असा दावा काही उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजवरून करण्यात येत आहे. बीबीसी फॅक्ट चेकच्या टीमने यामागचं सत्य काय आहे याची पडताळणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी #MainBhiChowkidar या नावाने सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं. त्यानंतर नजीब अहमद यांच्या आई फातिमा नसीन यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारला, की 'जर तुम्ही चौकीदार आहात तर माझा मुलगा कुठे गेला आहे त्याचं उत्तर द्या.'

पुढं त्या विचारतात, 'अद्याप आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांना का अटक झाली नाही. माझ्या मुलाचा शोध लावण्यासाठी तीन एजन्सीजला अपयश का आलं.'

त्यांच्या या ट्वीटनंतर उजव्या विचारसरणीच्या फेसबुक ग्रुप्समध्ये व्हॉट्सअॅपवर एक फोटो शेअर केला जात आहे. हाच फोटो 2018मध्ये देखील फिरवला होता. त्यातही हाच दावा केला होता की नजीब हे आयसिसमध्ये सहभागी झाले आहेत.

अनेकांनी हा फोटो बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमला पाठवला आणि या फोटोमागचं सत्य काय आहे असं विचारलं आहे.

बीबीसीच्या असं लक्षात आलं आहे की हा फोटो नजीब यांचा असू शकत नाही. कारण नजीब हे 14 ऑक्टोबर 2016च्या रात्री जेएनयूच्या हॉस्टेलमधून बेपत्ता झाले होते. तर जो फोटो व्हायरल होत आहे तो फोटो 7 मार्च 2015चा आहे.

रॉयटर्सचे प्रतिनिधी ताहिर अल-सूडानी यांनी इराकमधलं शहर अल-अलमजवळ असलेल्या ताल कसीबा या ठिकाणी हा फोटो घेतला होता. या फोटोतले सैनिक हे आयसिसचे लढवय्ये नाहीत तर इराकी सिक्युरिटी फोर्सेसला मदत करणारे शिया लढवय्ये आहेत.

इस्लामिक स्टेटचं नियंत्रण असलेल्या तिकरित शहराचा ताबा इराकी सेक्युरिटी फोर्सकडे आल्यानंतर हा फोटो घेण्यात आला आहे. इराकी सिक्युरिटी फोर्सेसनं 2 एप्रिल 2015 रोजी घोषित केलं होतं की तिकरित शहर हे आयसिसच्या ताब्यातून मुक्त झालं आहे.

नजीब 29 महिन्यांपासून बेपत्ता

नजीब हे बेपत्ता झाल्यानंतर 2 वर्षं विविध तपास संस्थांनी त्यांचा शोध घेतला पण त्यांना अपयश आलं. म्हणून शेवटी सीबीआयने नजीब यांची फाइल 2018 बंद केली.

नजीब यांच्या आईने सीबीआयच्या कार्यप्रणाली टीका केली होती. वेळ पडल्यास सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावू असंही त्या म्हणाल्या होत्या. 14 ऑक्टोबर रोजी जेएनयूच्या माही मांडवी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर नजीब बेपत्ता आहेत. या घटनेची सीबीआयकडून चौकशी व्हावी असे आदेश दिल्ली हायकोर्टानं 2017मध्ये दिले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)