You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गंगा यात्रा: प्रियंका गांधी यांचं इंदिरा गांधींच्या पावलावर पाऊल, प्रयागराजच्या मंदिरातून प्रचाराला सुरुवात
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज आपल्या तीन दिवसांच्या 'गंगा यात्रे'चा शुभारंभ प्रयागराजमधून केला. प्रयागराज अर्थात अलाहाबाद हे गांधी-नेहरू घराण्याचं मूळ गाव आहे.
यात्रेपूर्वी त्यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, जिथे एकेकाळी त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही पूजा केली होती.
त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियंका आणि इंदिरा गांधी यांचे याच मंदिरात काढलेले मिळतेजुळते फोटो ट्वीट केले.
या यात्रेवेळी प्रियंका यांनी बोटीतून प्रवास केला आणि तरुणांबरोबर शिक्षण आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.
"जाती-वर्ण आधारित संकुचित दृष्टी मागे सारत, कुठलाही भेदभाव न करत हे तीर्थ स्थान सर्वांना समानतेद्वारे एकजूट करतात, विश्वधर्म आणि मानवतेचा संदेश देतात," असं नंतर एक ट्वीट काँग्रेसने केलं आहे.
प्रयागराजमध्ये यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम आहे. नेहरू-गांधी कुटुंबाच्या वारशाची गोष्ट हे शहर सांगतं. पण गेल्या काही वर्षांपासून इथे काँग्रेसची पकड कमकुवत झाली आहे.
प्रियंका गांधींनी फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे.
आज गंगा यात्रेची सुरुवात करताना त्यांनी प्रयागराजमधल्या स्वराज भवनालाही भेट दिली, जिथे इंदिरा गांधींचा जन्म झाला होता.
"रात्री मला झोपवताना आजी मला जोन ऑफ आर्कच्या कहाणी ऐकवायची. आजही तिच शब्द माझ्या मनात मला ऐकू येतात. ती म्हणायची - धैर्यवान हो आणि बाकी सर्व चांगलं होईल," असं त्यांनी ट्वीट केलं.
असं सांगितलं जातं की, कुंभमेळ्यात राहुल गांधी आणि प्रियंका संगम स्नानासाठी जाणार होते. पण त्यांचा कार्यक्रम ठरू शकला नाही.
प्रचारासाठी जलमार्गाचा वापर होण्याची ही पाहिलीच वेळ आहे.
प्रियंका गांधीचा हा प्रचार त्यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणेल, असं जाणकारांना वाटतं. नदीच्या काठी स्थायिक असलेल्या काही पांरपरिक समाजघटकांनाही त्या भेटू शकणार आहेत. निषाद आणि मल्लाह अशा मागास जातीजमातींचे लोक मोठ्या संख्येने नदी काठी राहतात.
या तीन दिवसांच्या यात्रेदरम्यान त्या वेगवेगळ्या धर्म आणि समुदायांतील लोकांशी चर्चा करतील, असं काँग्रेस नेते राज बब्बर यांनी आधी ट्वीट केलं होतं.
"ही काही एकाच दिशेने होणारी 'मन की बात' नाही, तर लोकांशी केलेला खराखुरा संवाद असेल," असं ते म्हणाले होते. वाराणसीमध्ये ही यात्रा संपेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)