You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे: पुन्हा पुलवामासारखा हल्ला निवडणुकीच्या तोंडावर घडवला जाईल
भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रभक्ती शिकवणारे कोण? जर मोदी राष्ट्रभक्त असते तर नवाज शरीफ यांना केक भरवण्यासाठी गेले नसते, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांचे आरोप म्हणजे वैफल्यग्रस्त व्यक्तीची बडबड, अशी टीका भाजपने केली आहे.
हवाईहल्ल्यात 10 माणसंही पाकिस्तानात मारली गेली असती तर अभिनंदन यांना पाकिस्तानने परत केलंच नसतं, असंही ते म्हणाले. निवडणूक जिंकण्यासाठी खोटा प्रचार केला जात आहे. लष्कराच्या जिवावर त्यांना निवडणूक जिंकायची आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा निर्णय झाला की जाहीर करू, असं ते यावेळी म्हणाले.
राज ठाकरे यांच्या आरोपांवर बीबीसी मराठीने भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, "राज ठाकरे जे काही बोलताहेत ते वैफल्यग्रस्त व्यक्तीची बेताल बडबड आहे. यापेक्षा त्याला किंमत द्यायची गरज नाहीये. मला जेवढी प्रतिक्रिया द्यायची तेवढी मी दिलीय. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा प्रतिवाद करायची मला गरज नाही."
राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर चौफेर टीका केली.
ते म्हणाले, "राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, असं मी म्हटल्यानंतर भाजपच्या फुलबाज्या वाजल्या. त्यावर 'धुरळा बसल्या'वर उत्तर देऊ, असं ठरवलं. एका मासिकाने अजित डोवाल यांच्या मुलाचा एक भागीदार पाकिस्तानी आणि एक अरब आहे. हे प्रश्न विचारायचे नाहीत का? जर दुसऱ्या कुणाचा भागीदार पाकिस्तानी असता तर भाजपने थयथयाट केला असता."
"पुलवामा हल्ल्यात प्राण गमावलेल्या CRPFच्या जवानांना हवाई मार्गाने नेण्याची मागणी असताना ती का पूर्ण झाली नाही? डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये भेट झाल्याचंही वृत्त आलं होतं, त्यात काही चर्चा झाली? हे प्रश्न आहेत. हे या देशाचे प्रश्न आहेत, ते आम्ही विचारणार," असं ते म्हणाले.
अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्यानंतर अमित शाह यांनी हवाईहल्ल्यात 250 ठार झाल्याचं म्हटलं, ते काय को-पायलट होते का? असा सवालही त्यांनी केला.
भारतीय वायुसेनेला चुकीची माहिती पुरवल्याने जंगलात बाँब टाकले, असं ते म्हणाले.
रफाल प्रश्नावर ते म्हणाले, "अनिल अंबानी यांना कंत्राट देण्याचा मूळ मुद्दा आहे. यावर दिशाभूल केली जात आहे."
सरकारची सर्व आश्वासनं 'फेल' ठरली आहेत, असं ते म्हणाले. जवानांबद्दल असणाऱ्या प्रेमाचे फायदे घेतले जात आहेत, असं ते म्हणाले.
भाजपच्या ट्रोलना मी घाबरत नाहीत, असं म्हणत त्यांनी ट्रोलच्या उल्लेख त्यांनी 'भाजपची लावारीस पोरं' असा केला. पुरावे असतील तर भाजपच्या ट्रोलला चोख उत्तर द्या असं ते म्हणाले.
'हे कसले फकीर हे तर बेफिकीर'
पंतप्रधान मोदी हे स्वतःला फकीर म्हणवून घेतात पण ते फकीर नाहीत तर बेफिकीर आहेत असं राज ठाकरे म्हणाले. पुलवामा हल्ल्याच्या काही दिवसानंतरच ते सेऊलला शांतता पुरस्कार घेण्यासाठी गेले. पुलवामा हल्ल्यात आमचे 40 जवान शहीद झाले पण पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर काही दुःख दिसत नाही. पुलवामा हल्ल्यानंतरचे मोदी यांचे फोटो राज ठाकरेंनी सभेत दाखवले आणि लोकांना विचारलं यापैकी कोणता चेहरा दुःखी वाटतो.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)