Abhinandan: पाकिस्तानात IAF विंग कमांडर अभिनंदन यांचा 'मानसिक छळ झाला' #5मोठ्याबातम्या

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्या अशा:

1. पाकिस्तानात अभिनंदन यांचा 'मानसिक छळ झाला'

"पाकिस्तानात आपल्याला मानसिक त्रास देण्यात आल्याचं" विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि एअर चीफ मार्शल B.S. धानोआ यांना सांगितलं. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने PTI वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे, जी इकॉनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.

वर्तमान सध्या लष्कराच्या रुग्णालयामध्ये आहेत. इथे संरक्षणमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळेस वर्तमान यांची पत्नी स्क्वाड्रन लीडर तन्वी मारवा, त्यांचा सात वर्षांचा मुलगा आणि बहीण उपस्थित होते.

या भेटीत पाकिस्तानातील वास्तव्यात बसलेल्या मानसिक धक्क्याबाबत त्यांनी संरक्षणमंत्र्यांना सांगितल्याचं या सूत्रांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितलं. धानोआ तसंच काही वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा अभिनंदन यांची भेट घेतल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

"पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांचा कुठलाही शारीरिक छळ झाला नसला तरी त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. पण ते मानसिकदृष्ट्या कणखर आहे आणि या छळानंतरही ते बऱ्यापैकी स्थिर मनस्थितीत आहेत आहेत," असं या सूत्रांनी PTIला सांगितलं आहे.

2. बालाकोट हल्ल्यात जैशचे दहशतवादी, ISIचे माजी एजंट ठार - प्रत्यक्षदर्शींचा दावा

भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या हल्ल्याच्या जागेवरून 35 मृतदेह उचलून अॅम्ब्युलन्समधून नेताना प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं, असं वृत्त फर्स्टपोस्टनं प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये पाकिस्तानच्या लष्करात सेवा बजावलेले 12 लोक होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

स्थानिक सरकारातील सूत्रांनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

या हल्ल्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी कर्नल सलीमचा मृत्यू झाला तर कर्नल झरार झकारी नावाचा अधिकारी जखमी झाला आहे. तसेच जैश-ए-मोहम्मदचा पेशावरमधील प्रशिक्षक मुफ्ती मोईन, आणि IED तयार करणारा तज्ज्ञ उस्मान घनी ठार झाल्याचे या वृत्तात म्हटलं आहे.

मात्र, बीबीसी, रॉयटर्स आणि अलजझिरा यांनी केलेल्या स्वतंत्र ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये या घडामोडींविषयी स्पष्टता नाही. त्यामुळे बीबीसीला 'फर्स्टपोस्ट'च्या वृत्ताची पडताळणी करता आली नाही.

3. रफाल असतं तर वेगळा निकाल आला असता - नरेंद्र मोदी

"आज रफाल असतं तर वेगळा निकाल लागला असता. रफालवर झालेल्या राजकारणामुळे देशाचे भरपूर नुकसान झाले आहे," असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये केले.

लोकसत्तानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

"'मोदीविरोध' जरूर करा. आमच्या योजनेत कमतरता शोधा. त्याबद्दल सरकारवर टीका करा. तुमचं स्वागत आहे. पण देशाच्या सुरक्षेच्या हिताला विरोध करू नका. मसूद अझर, हाफिज सईदला मदत होणार नाही, याची काळजी घ्या," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

4. धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना लागू

आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना आता धनगर समाजालाही लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आल्याचं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

तसंच या समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या अहवालावर पुढील कार्यवाही आणि केंद्राकडे करायची शिफारस, यासाठी तो राज्याच्या महाधिवक्त्यांकडे सोपविण्यात येईल.

"ज्या योजनांचा आदिवासींना लाभ मिळतो. तो लाभ धनगर समाजाला मिळेल. यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात येईल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

5. लहान उद्योगांसाठी 3 हजार कोटींचे योगदान

राज्य सरकारने खासगी बँकांच्या सहभागातून पुढील पाच वर्षांसाठी रोजगारनिर्मिती धोरण तयार केलं आहे. त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचे थेट अनुदान देण्यात येणार आहे. लोकसत्तानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 10 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असलेल्या या धोरणाला मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे.

सेवा क्षेत्रातील प्रकल्पांना 10 लाख रुपयांपर्यंत, उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना 50 लाखांपर्यंत ही योजना लागू होईल. राज्य सरकारकडून त्यासाठी गुंतवणुकीच्या 15 ते 35 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

वर्षाला सुमारे 600 कोटी आणि 3 हजार कोटी रुपयांचे अनुदान पॅकेज देण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)