You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रॉबर्ट वाड्रांचं ईडीच्या ‘मॅरेथॉन’ चौकशीवर काय म्हणणं आहे?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यामागचा सक्तवसुली संचलनालयाचा (ED) ससेमिरा कायम आहे. शनिवारीदेखील ईडीने रॉबर्ट वाड्रा यांची कसून चौकशी केली. त्यापूर्वीही तीन दिवस वाड्रांची चौकशी सुरू होती.
ईडी वाड्रांकडून नेमकी काय माहिती घेत आहे, वाड्रा या प्रकरणातून सुटणार का, याबद्दल माध्यमांमधून अनेक तर्क मांडले जात आहेत. रॉबर्ट वाड्रा मात्र या चौकशीसंबंधी काहीच बोलले नव्हते. रविवारी मात्र वाड्रांनी आपलं मौन सोडलं.
रविवारी वाड्रांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी म्हटलं,"मी ठीक आहे. नीट आहे. येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. नेहमी सत्याचा विजय होतो."
"देशभरातून ज्या मित्र आणि सहकाऱ्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे," असंही वाड्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स
ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वाड्रा यांना समन्स बजावलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी वाड्रा यांना अंतरिम जामीन मिळाला असून चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी न्यायालयाला दिलं आहे.
बुधवारी वाड्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांना नेमकं काय विचारलं या प्रश्नाचं उत्तर देताना वाड्रांचे वकील सुमन ज्योती खेतान यांनी सांगितलं, "तपास सुरू असल्यामुळे याबद्दल काही जास्त बोलता येणार नाही."
यानंतरही ईडीकडून बोलावणं आल्यास आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू, असंही रॉबर्ट वाड्रा यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं.
प्रियंका गांधींची खंबीर साथ
बुधवारी रॉबर्ट वाड्रा जेव्हा चौकशीसाठी ईडीच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी आणि काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधीही होत्या. रॉबर्ट यांना ईडीच्या ऑफिसमध्ये सोडून त्या काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्या होत्या.
2019च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रियंका यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्त केलं आहे. त्यासोबत त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशचं प्रभारीपदही सोपविण्यात आलं आहे.
पत्रकारांनी प्रियंकांना नवीन जबाबदारीबद्दल विचारल्यावर त्यांनी म्हटलं, "राहुल यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवल्यामुळं मी खूप खूश आहे." वाड्रा यांच्या चौकशीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, की काय चाललंय हे सगळ्या जगाला माहितीये.
लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्तांचा आरोप
लंडनमधील घराच्या खरेदीप्रकरणी वाड्रा यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. वाड्रांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
भाजप सरकारच्या दबावाखाली येऊन ईडीनं चौकशी सुरू केल्याचा आरोप वाड्रांनी केला आहे. लंडनमध्ये वाड्रांच्या अनेक मालमत्ता आहेत, असं ईडीनं न्यायालयात सांगितलं आहे. दोन घरांव्यतिरिक्त वाड्रांचे सहा फ्लॅट्सही लंडनमध्ये असल्याचा ईडीचा दावा आहे.
याप्रकरणी ईडीनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वाड्रांशी संबंधित कंपनी स्कायलाइट्स हॉस्पिटॅलिटी एलएलपीवर छापा घातला होता.
वाड्रा आणि त्यांचे सहकारी मनोज अरोरांची चौकशी करण्यात आली होती. वाड्रा यांना राजस्थान हायकोर्टानेही ईडीसमोर उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)