विषारी दारूने घेतले 60हून अधिक बळी, 2 डझन अधिकाऱ्यांचं निलंबन

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशमधल्या दोन जिल्ह्यात आणि उत्तराखंडच्या रुडकी जिल्ह्यात विषारी दारूने पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान घातलं आहे.

विषारी दारुनं आतापर्यंत याठिकाणी 60 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. तर अनेकजण हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.

उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये विषारी गावठी दारू पिऊन मृत्यू पावलेल्या लोकांचा आकडा 46वर पोहोचला आहे. सहारनपूरचे जिल्हाधिकारी आलोक पांडे आणि पोलीस अधीक्षक दिनेश कुमार पी. यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

यामध्ये सहारनपूरमधल्या नागल, गागलहेडी आणि देवबंद या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या लोकांचा समावेश आहे. हा आकडा याहून अधिक असल्याचं बोललं जात आहे.

तर उत्तराखंडमधल्या रुडकी जिल्ह्यात याच विषारी दारूनं 14 लोकांचा बळी घेतला आहे. आणखी 50 लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

जबाबदार कोण?

विषारी गावठी दारू ही शेजारच्या उत्तराखंड राज्यातून आली असल्याचं उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ. पी. सिंह यांनी सांगितलं. याआधी उत्तराखंडमध्ये विषारी दारू पिऊन अनेकजणांचा मृत्यू झाला आहे.

गुरूवारी आणि शुक्रवारी उत्तराखंडमधल्या कुशीनगरमध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सरकारने काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.

शुक्रवारी उशीरा यूपीचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांनी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी व्हीडिओ कान्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि बेकायदेशीर दारू विक्रिविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

सहारनपूर मधल्या नागल पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहित 10 पोलीस कर्मचारी आणि महसूल खात्यातील 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कुशीनगरमध्ये जिल्हा महसूल अधिकाऱ्यंसह महसूल विभागाच्या 10 कर्मचाऱ्यांचं निलंबिन झालं आहे.

शुक्रवार सकाळपासून सहारनपूरमध्ये विषारी दारू पिऊन मृत्यू होत असल्याचे प्रकार सुरू झालं. नागल पोलीस स्टेशन हद्दीतल्या उमाही, सलेमपूर या गावात तर गागलहेडी पोलीस स्टेशन हद्दीतल्या शरबतपूर आणि माळीगाव या गावांत ही दारू पिलेल्या लोकांची तब्येत ढासळू लागली.

आधी 10 लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा 2 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यूचा आकडा वाढतच गेला.

गेल्यावर्षी मे महिन्यात कानपूरमधल्या सचंडी आणि देहात याठिकाणी विषारी दारून पिऊन एक डझनहून अधिक लोक मृत्यू पावले होते. तसंच जुलै 2017मध्ये आझमगढमध्ये विषारी दारूनं 25 लोकांचा बळी घेतला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)