You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ए.आर. रहमानच्या मुलीने बुरखा घातला आणि टीका झाल्यानंतर हे उत्तर दिलं....
आपल्या मुलींचे फोटो ट्वीटर अकाऊंटवर शेअर केल्यापासून संगीतकार ए.आर.रहमान चर्चेत आणि काही प्रमाणात वादात अडकले आहेत.
या फोटोमध्ये ए.आर.रहमान यांच्या तीन मुली रिलायन्सच्या सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता यांच्यासोबत उभ्या आहेत. पण या फोटोत रहमान यांची मुलगी खतिजा चक्क बुरख्यात दिसून येत आहे. आणि इतर दोन मुली बुरख्याशिवाय उभ्या आहेत.
या ट्वीटमध्ये रहमान यांनी लिहिलंय की, "माझ्या परिवारातील या अनमोल महिला आहेत, खतीजा, रहीमा आणि सायरा चक्क नीता अंबानींसोबत" यासोबत त्यांनी हॅशटॅग #freedomtochoose म्हणजे निवडण्याचा अधिकार असं कॅप्शनही दिलं आहे.
हा फोटो '10 इयर्स ऑफ स्लमडॉग मिलेनियर' या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात घेण्यात आला होता. ज्यात खतीजाला तिच्या वडिलांविषयी आणि त्यांच्या यशाबद्दल बोलण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात खतीजा साडी नेसून आली होती, पण तिने आपला चेहरा झाकलेला होता. रहमान यांनी जसा हा फोटो ट्विटरवर शेअर केला, तसा प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काही लोकांनी त्यांना ट्रोलही केलं.
काहींनी #choosetofreedom असं म्हणण्यावर आक्षेप घेतला, काहींनी टर उडवली तर काहींनी त्यांचं समर्थनही केलं.
एक ट्विटर युजर स्वामीनाथन यांनी लिहिलं की, "त्यांना निवडण्याचं स्वातंत्र्य आहे यात काही वाद नाही. पण महिलांनी, तरुणांनी आपला चेहरा झाकलेला पाहणं दु:खदायक आहे. कदाचित त्यांना त्यांच्या धर्मानं दाखवलेला हा रस्ता असेल."
एक ट्विटर युजर चाणक्य यांनी लिहिलं की, "काहीही कपडे परिधान करण्याचा उद्देशच काय जर तुम्हाला चेहरा लपवायचा आहे? पुन्हा एक सांगतो.. स्वातंत्र्य तेव्हा असतं जेव्हा तुमच्याकडे काही निवडण्याचा पर्याय असतो, तेव्हा नाही जेव्हा तुमच्याकडे काही पर्यायच नसतो."
आणखी एक यूजर ट्रूथ प्रिव्हेल्सनं रेहमानसाठी एक कमेंट केली आहे, "गुलामीतून बाहेर पड माझ्या मित्रा, स्वातंत्र्य आयुष्याचं अंतिम ध्येय आहे, गुलामी नव्हे"
यात काही लोक रहमानच्या बाजूनंही उभे राहिलेले पाहायला मिळाले.
युजर उसम मुबारक यांनी लिहिलं की, "माझ्या बहिणीनं दाखवलेल्या या धाडसाबद्दल मी तिचं कौतुक करतो. धर्माला मानणं ही पूर्णपणे व्यक्तीगत बाब असायला हवी."
युजर इकरा रिजवी यांनी लिहिलं की, "ही त्यांची पसंती आहे. मला त्या मुलींबद्दल खूप वाईट वाटतं ज्या दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भडक कपडे परिधान करतात. पण आपण भारतात राहतो. त्यामुळे काय परिधान करायचं आणि काय नाही, हे निवडण्याचा आपल्याला अधिकार आहे. मी त्यावर बोलणारा कोण?"
आणखी एक युजर महाभारतनं कमेंट करताना म्हटलंय की, "खतीजा यांना जेवणाचा आनंद घेताना अडचण येईल. त्यांनी आपल्याऐवजी कुणालातरी दुसऱ्याला पाठवायला हवं होतं. तसंही कुणाला काही कळालं नसतं."
लोकांनी ट्रोल केल्यानंतर खतीजा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपलाच एक व्हॉट्सअप मेसेज शेअर केला.
त्यांनी श्रीनिवास नावाच्या एका युजरला आणि त्यांच्या काकांना हा मेसेज केला होता.
या मेसेजमध्ये खतीजा लिहितात की, "माझ्यामुळे माझ्या वडिलांबद्दल जरा जास्तच चर्चा सुरु आहे. जेव्हा की मी एवढ्या सगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षाही केली नव्हती. काही कमेंटमध्ये चक्क माझ्या कपड्यांवरुन माझ्या वडिलांना टार्गेट करण्यात आलंय. त्यांनीच मला असे कपडे परिधान करणं बंधनकारक केलंय आणि ते दुटप्पी असल्याचं म्हटलंय. मला एवढंच सांगायचंय की मी जे कपडे परिधान करते किंवा निवडते त्याचा माझ्या आई-वडिलांशी काडीचाही संबंध नाही. प्रत्येकाला आपले कपडे निवडण्याचा आपल्या मनाप्रमाणे राहण्याचा अधिकार आहे. आणि मी तेच करत आहे. त्यामुळे कृपया परिस्थिती जाणून घेण्याआधीच आपले निष्कर्ष काढू नका"
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)