You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जीवघेण्या पाण्यामुळे या गावात होत आहेत गावकऱ्यांचे हाल
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी, यवतमाळहून
फ्लोराईडयुक्त पाण्यामुळेयवतमाळ जिल्ह्यातील रुईपेंड या गावातीलमुलांचे दात ठिसूळ झाले आहेत तर स्त्री-पुरुषांना सांधेदुखीचा त्रास होत आहे.
गावामध्ये पाण्याचा इतर दुसरा कुठलाही स्रोत नाही. या हॅंडपंपचं पाणी पिऊ नका असं शासनाने सांगितलेलं असताना गावकऱ्यांना तेच पाणी प्यावं लागतं.
जंगलानं वेढलेलं घाटंजी तालुक्यातील रुईपेंड गाव. या गावची लोकसंख्या जवळपास 300च्या घरात आहे. जंगलाच्या मार्गाने नागमोडी वळण घेत वाटा शोधत गावापर्यंत पोहचता येतं.
सकाळच्या शाळेला नुकतीच सुटी मिळाली आणि ग्रामीण भागातील मुलांच्या खेळांना सुरुवात झाली. 'मामाचं पत्र हारवलं आम्हाला नाही सापडलं' या खेळामध्ये मुलं रमलेली होती. खेळात भान विसरलेली मुलं गावात वेगळंच चैतन्य निर्माण करत होती. पण त्यांच्या या निरागस हास्यामागे एक भीषण वास्तव दडलेलं आहे ही जाणीव मनाला व्यथित करत होती.
पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्यानं सुलोचना आडे यांना 'लाल कलर मारलेल्या' हॅंडपंपचं पाणी प्यावं लागतं. त्या म्हणतात "गावामध्ये ग्रामपंचायतीची अपूर्ण बांधकाम असलेली विहीर आहे. एक हापशी आहे पण तासन्-तास वाट पाहूनही त्या हापशीच पाणी पुरत नाही. घरापासून 500 मीटरवर हापशी आहे. शासनाने या हापशीच पाणी पिण्यायोग्य नाही, म्हणून लाल कलर मारलाय. पण नाईलाजास्तव आम्हाला हेच पाणी प्यावे लागतंय" सुलोचना सांगतात.
या हापशीमधून फ्लोराईडयुक्त पाणी येतं. त्यामुळं सांधेदुखी, डोळ्यांची जळजळ आणि कंबरदुखीचा त्रास वाढलाय. मुलांमध्ये दातांची समस्या जन्मजातच असेल असं सुलोचना यांना वाटलं. पण गावातल्या सर्वच मुलांचे दात अशक्त आणि पिवळट पडल्यानंतर हे गंभीर आजाराचे लक्षण असल्याचं त्यांना कळलं.
त्या म्हणतात, "आर्थिक परिस्थितीमुळे मुलांचा उपचार करणं परवडत नाही. पैसाच नाही तर उपचार करायचा तरी कसा करावा हा प्रश्न आहे. मुलं आमच्याकडे दातांची तक्रार करतात, पण पाण्याचे दुष्परिणाम माहिती असूनही जीवघेणं पाणी त्यांना पाजावं लागतं".
35वर्षीय ग्रामस्थ बंडू आडे यांना काम करतांना थकवा जाणवतो. शेतात राबतांना हातापायांचे सांधे अचानक दुखायला लागतात. अचानक उठलेला त्रास काही केल्या कमी होत नाही, असं ते सांगतात.
बंडू सांगतात, "आम्ही मुळात कष्टकरी शेतकरी आहोत. शेतीमधून उत्पन्न मिळवायचं असेल तर शेतात घाम गाळण्याशिवाय पर्याय नाही. पण आता शेतात काम करणं अवघड झालंय. आमच्याकडं कुणी लक्ष देत नाही. या पाण्याचे वाईट परिणाम आम्हाला माहिती आहेत. पण फ्लोराईडचं पाणी पिल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही."
बंडू आडे यांच्या म्हणण्यानुसार हे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. शुद्ध पाणी मिळावे याकरिता त्यांनी अनेक प्रयत्न केले. शासनाने किमान गावच्या पाण्याची समस्या ताबडतोब सोडवावी अशी त्यांची इच्छा आहे.
हनुमंत मसराम हे शेती करतात. शेतात जात असतांना प्रचंड थकवा जाणवतो. चालतांना गुडघे, पाठीचा कणा, मान, दुखायला लागतात, असं हनुमंत सांगतात.
हनुमंत यांना प्रतीक नावाचा एक मुलगा आहे.
फ्लोराईडच्या पाण्यामुळं प्रतीकच्या दातांवर परिणाम झालाय. "आमच्या सारखीच या मुलांचीही अवस्था होणार आहे. आता परिणाम फक्त दातांवर दिसतात, पण कालांतराने सबंध शरीरावर परिणाम जाणवायला लागतील," असं हनुमंत सांगतात.
मुलांच्या भविष्याकडे पाहून हनुमंत जरा अस्वस्थ होतात. "मुलांच्या योग्य उपचारासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. शेतीमधून मिळालेल्या उत्पन्नावर जगणंच कठीण आहे. तर उपचाराला पैसे कसे शिल्लक पडतील. आमच्यावर ही परिस्थिती आली आहे. हळुहळू आम्ही सगळे मृत्यूच्या दारात जाताना स्वतःला बघत आहोत" असंही त्यांना वाटतं.
भूजल पातळी कमी
किडनी रोग तज्ज्ञ, डॉ अविनाश चौधरी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील किडनी आणि फ्लोराईड मूळ होणाऱ्या आजारांचा अभ्यास केला. त्यांच्यानुसार नागरिकांना आजारी होण्यामागे पाणीच कारणीभूत आहे.
डॉ. चौधरी सांगतात, "सरकारी एजन्सीच्या माध्यमातून आठवड्यातून एखाद्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण परिसरात 90टक्के लोक विहीर आणि हापशीच्या पाण्यावर अवलंबून राहतात. हापशीच्या पाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत."
"अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लोराईड आणि सिरीकाचं प्रमाण आढळून आलंय. पाण्यामध्ये मानवी शरीराला घातक असणारे कॅडमियम, आर्सेनिक आणि आयर्नसारखे केमिकल आढळून येतात. पाण्यांमध्ये 2000 ते 3000 च्या वर TDS काऊंट केला जातो. याला हार्ड वॉटर म्हटलं जातं ते पिण्यासाठी नक्कीच चांगलं नाही," असं डॉ. अविनाश चौधरी सांगतात.
पुढं ते सागंतात, " फ्लोराईडच्या पाण्यामुळे लहान मुलांना फ्लोरोसिसचा आजार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय. अचानक "स्पोडेनिस फ्रॅक्चर" होतात, त्यांची उंची वाढत नाही. मुलांमध्ये हाडांच्या वेदना व्हायला लागतात. लहान मुलांचे दात तुटलेले दिसतात, दात ठिसूळ होतात, दात फ्रॅक्चर होतात आणि तुटायला लागतात.
"हाडांची योग्यरीत्या वाढ होत नसल्यामुळे त्यांच्यात विविध आजारांची लागण व्हायला सुरुवात होते. पिण्यायोग्य नसलेल्या हापशींवर शासनाकडून लाल पट्टे मारण्यात आले. दुसरं पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ते पाणी प्यावं लागतं. स्थानिक ग्रामस्थ आजच मरण उद्यावर ढकलत असल्याचं स्पष्ट चित्र यवतमाळात दिसून येतंय."
इथल्या सर्वच पाण्यामध्ये फ्लोराईडच प्रमाण आहे पण...
रुईपेंड गावामध्ये नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. त्याची निविदा प्रक्रिया इतक्यातच पार पडून गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळेल असं पांढर कवड्याचे उप अभियंता अरविंद पद्मावार यांनी सांगितलं.
"जवळपास इथल्या सर्वच पाण्यामध्ये फ्लोराईडच प्रमाण आहे. पण 1.5 PPMच्या वर असलं तर अनेक पाणी अनेक आजारांना निमंत्रण देत. विहिरीत फ्लोराईडच प्रमाण नसतं. पाण्याच्या पातळीच्या 100 फुटाच्या वर फ्लोराईड आढळत. पाण्याच्या फ्लोराईडच प्रमाण कमी जास्त होत असतं. एकसारखं राहत नाही," असं अरविंद पद्मावार सांगतात.
एका सर्वेनुसार यवतमळातील 493 गावामध्ये फ्लोराईडचं प्रमाण सामान्यप्रमाणापेक्षा चार पटीने अधिक आहे. शासनाकडून काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र रुईपेंडसारखी गावं आजही फ्लोराईडच्या पाण्यावरच अवलंबून राहतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)