You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अण्णा हजारे यांच्या वजनात घट, डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
लोकपाल नियुक्तीच्या मागणीवरून समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी इथे बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांचं वजन घटलं असून रक्तदाबात चढउतार होत आहे. तर हजारे यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावं, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
लोकपालची नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी हजारे उपोषण करत आहेत.
उपोषणामुळे त्यांचे वजन तीन किलोनी कमी झालं आहे.
अण्णांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या टीममधील डॉ. भारत साळवे यांनी शनिवारी संध्याकाळी सांगितलं की, "अण्णांची तब्येत खालावली असून त्यांच्या यकृतातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढत आहे."
बिलिरुबिन हे यकृतातील द्रव्य आहे. रक्तातील तांबड्या पेशी मृत झाल्यानं बिलिरुबिन तयार होते. ते पाण्यात विद्राव्य असल्याने यकृतात साठून राहते, याच्या वाढीमुळे कावीळ होते आणि यकृताला सूजही येते.
"गेल्या दोन दिवसातल्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण खूप जास्त आहे. हे असंच वाढत राहिलं तर अण्णांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. बिलिरुबिन किती वेळात कसं वाढेल हे सांगता येत नाही, पण त्याचे प्रमाण दोनच्या वर गेल्यास त्वरित दवाखान्यात दाखल करावं लागेल. पुढील 24 ते 48 तासांत हे प्रमाण दोनच्या वर जाऊ शकते," साळवे यांनी अण्णांच्या तब्येतीबद्दल सांगितलं.
"अण्णांचा रक्तदाब 140/90 असा आहे, तर रक्तातील साखर 110 आहे. यामुळे आम्ही त्याना संपूर्णपणे आराम व अजिबात न बोलण्याचा सल्ला दिला आहे," साळवे यांनी पुढे सांगितलं.
अण्णांची खालावत असलेली प्रकृती हा चिंतेचा विषय आहे , असं त्यांची वैद्यकीय तपासणी करणारे डॉ धनंजय पोटे यांचं म्हणणं आहे.
"तर अण्णांनी असंच त्यांचं उपोषण चालू ठेवलं तर त्यांचं मूत्रपिंड आणि मेंदू यावर वाईट परिणाम होऊ शकतो," असं अण्णांच्या मेडिकल टीमनं म्हटलं आहे.
अण्णा आंदोलनावर ठाम
"आतापर्यंत मी मोदींना 35 पत्रं पाठवलीत, पण एकदाही त्यांचं उत्तर आलं नाही. 28 जानेवारीला मी उपोषणाला बसत असल्याचं पत्रंही त्यांना पाठवलं होतं," असं अण्णा हजारे म्हणतात.
तर एक फेब्रुवारीला अण्णांचं पत्र मिळाल्याचं पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
"मात्र, या पत्रात माझ्या मागण्यांविषयी कुठलाच उल्लेख करण्यात आलेला नाही," असं अण्णांनी सांगितलं आहे. उलटपक्षी या पत्रात त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
"शरीरात प्राण असेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार आणि माझ्या जीवाची जबाबदारी पंतप्रधानांची आहे. सरकार त्यांच्या वाटेनं तर आम्ही आमच्या आंदोलनाच्या वाटेनं जात आहोत," असं अण्णांनी म्हटलं आहे.
गावकऱ्यांचा पाठिंबा
शनिवारी सकाळी 11 वाजता राळेगणसिद्धीतल्या गावकऱ्यांनी रस्ता रोको आणि त्यानंतर जेलभरो आंदोलन केले.
राळेगणसिद्धीमधील तरुणांनी मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या महिला व कार्यकर्त्यांना अटक पोलिसांनी अटक केली आहे.
"अण्णांना ह्या वयात आंदोलन करावे लागतंय. उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकारच्या बाजूने अजून काही हालचाल नाही. केंद्र आणि राज्य सरकारने अण्णांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे," असा आरोप राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी यांनी केला.
"रविवारी आम्ही राष्ट्रीय महामार्ग अडवणार असून सोमवारपर्यंत सरकारने काहीच नाही केले, तर राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेतील," असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.
अण्णांनी उपोषण सोडावं - गिरीश महाजन
अण्णांनी लवकरात उपोषण सोडावं हा सरकारचा प्रयत्न आहे, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बीबीसीला सांगितलं.
अण्णांच्या उपोषणाची मिनिट- टू -मिनिट माहिती आमच्याकडे आहे. मी स्वतः वैद्यकीय चमू आणि तेथील प्रतिनिधींबरोबर संपर्कात आहे. अण्णांचे वय लक्षात घेता त्यांनी लवकरात उपोषण सोडावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकायुक्त नेमण्यासाठी सरकार एक ड्राफ्ट बनवत असून रविवारी मी अण्णांची भेट घेणार आहे आणि हे उपोषण सुटेल अशी मला आशा आहे, असं महाजन म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)