You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बजेट: आयकरात आणि शेतकऱ्यांना सवलती, विरोधक म्हणतात हा तर 'जुमला'
प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मध्यमवर्ग, शेतकरी आणि मजुरांसाठी सवलतींच्या घोषणा करण्यात आल्या. निवडणुकीआधी होणाऱ्या या बजेटमध्ये केलेल्या या घोषणा ही जुमलेबाजी (भूल-थापा) असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
यात आहेत तीन मोठ्या घोषणा -
- पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर लागणार नाही
- अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळणार
- बचत ठेवींवरील 40,000 पर्यंतच्या व्याजावर TDS लागणार नाही
लोकसभा निवडणुकांपूर्वीच्या या अंतरिम अर्थसंकल्पनांमधल्या "पोकळ घोषणांनी अपेक्षाभंग केला", अशी प्रतिक्रिया काँग्रसने दिली आहे.
हंगामी अर्थसंकल्पाद्वारे आर्थिक वर्षाच्या चार महिन्यांच्या खर्चाची संसदेची मंजुरी मिळवली जाते. सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवे सरकार सामान्य अर्थसंकल्प सादर करते.
पाहा संपूर्ण भाषण:
पाहूया दिवसभरात काय काय झालं...
दुपारी 1.30 वाजता - योगी म्हणतात..
या अर्थसंकल्पात शेतकरी, मध्यमवर्ग, गरीब, महिला अशा सर्व घटकांचा विचार करण्यात आला. नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी या अर्थसंकल्पाचा उपयोग होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
"करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवल्याने मध्यमवर्गाचे उत्पन्न आणखी वाढेल. देशातील प्रमुख नद्या येत्या दहा वर्षांमध्ये पुनरुज्जीवित करण्याचं उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी ठेवलं आहे. या निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्याचा आम्हाला विश्वास आहे," असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते, जहाजबांधणी आणि जलसंसाधन, नदीविकास मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
"शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय यांचा तसेच डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, संरक्षण या सर्वांचा समावेश करून राष्ट्राला एक संपूर्ण अर्थसंकल्प दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री पीयूष गोयल यांचे अभिनंदन करते," असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या.
दुपारी 1.20 वाजता - 'हा तर अपेक्षाभंग'
पण काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "या अर्थसंकल्पाने अपेक्षाभंग केला. मध्यमवर्गीयांना करामध्ये मोठी सूट दिली. मात्र शेतकऱ्यांना दरमहा केवळ 500 रुपयांची मदत केली जाणार आहे. यामुळे सन्मान आणि प्रतिष्ठेसह त्यांना जगता येईल का?"
दुपारी 12.45 वाजता - "नीयत साफ है, नीति स्पष्ट और निष्ठा अटल."
- आमच्या सरकारच्या काळात विकास एक जनआंदोलन झाले, हेच या सरकारचं यश आहे.
- आम्ही एक पाऊल टाकतोय तर शेकडो नवे मार्ग खुले होत आहेत. आम्ही एका सशक्त भारतासाठी पाऊल टाकतोय. या देशाच्या नागरिकांना एकत्र घेऊनच आम्ही भारताला पुढे नेऊ.
- "नीयत साफ है, नीति स्पष्ट और निष्ठा अटल." म्हणत पीयूष गोयल यांनी आपलं अर्थसंकल्पीय भाषण संपवलं.
दुपारी 12.44 वाजता - सेन्सेक्सची 400 अंकांनी मुसंडी
बजेटमधल्या घोषणांमुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे.
दुपारी 12.30 वाजता - मध्यमवर्गीयांना दिलासा
- पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकरमध्ये सूट. एकूण उत्पन्न 6.5 लाखांपर्यंत असलेल्यांनी प्रॉव्हिडंट फंड तसंच प्रिस्क्राइब्ड इक्विटींमध्ये दीड लाखापर्यंतची गुंतवणूक केल्यास आयकर भरावा लागणार नाही.
- तीन कोटी मध्यमवर्गीय करदात्यांना याचा फायदा होणार
- निर्गुंतवणुकीतून 1 लाख कोटी रुपये मिळाले
- 40 हजारांपर्यंत मिळणाऱ्या व्याजावर कर नाही
- कुठल्याही बचत ठेवींवर मिळणाऱ्या 40 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजांवर आता कोणताही कर नाही. सध्या ही करमुक्त मर्यादा 10,000 रुपये आहे.
दुपारी 12.15 वाजता - महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल?
- गेल्या चार वर्षात 30 लाख 38 हजार खोट्या कंपन्यांवर सरकारनं कारवाई केली.
- त्यामुळे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने देश वाटचाल करतो आहे. पुढच्या 8 वर्षांमध्ये भारत 10 ट्रिलयन डॉलरची अर्थव्यवस्था होणार
दुपारी 12.05 - कर भरणारे वाढले
- गेल्या आर्थिक वर्षांत कर आकारणीतून 12 लाख कोटी जमा झाले
- नोटाबंदीनंतर इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणाऱ्यांची संख्या वाढली, एकूण टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या 6.85 कोटी
- टॅक्स भरण्यामध्ये पारदर्शकता आणणार, 24 तासात रिटर्न्सवर प्रक्रिया होईल, यासाठी तंत्रज्ञान विकसीत केलं जाईल.
- 40 लाख टर्नओवर असणाऱ्यांना GST नाही
12.00 वाजता - ईशान्य भारताला 21 टक्के अधिक निधी
ईशान्य भारताला पायाभूत विकासात मोठा फायदा झाला आणि तो मिळत राहणार. पुढच्या आर्थिक वर्षात ईशान्य भारतासाठी निधी 21 टक्क्यांनी वाढवणार, म्हणजेच एकूण गुंतवणूक Rs 58,166 रुपयांची.
सकाळी 11.55 - नवं तंत्रज्ञान
- सौरऊर्जा वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे, हे क्षेत्र नवे रोजगार तयार करत आहे.
- पाच वर्षात मोबाइल डेटा वापरण्यात 50 पटीने वाढ झाली आहे.
- 'मेक इन इंडिया' अंतर्गत मोबाइल निर्मिती आणि मोबाइलचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांची वाढ झाली आहे
- एक लाख डिजिटल व्हीलेज तयार करणार
- 2022 पर्यंत भारतीय अंतराळवीर भारतातूनच अंतराळात जाण्याचा दिशेने वाटचाल
सकाळी 11.50 - रनवे ते रेल्वे ट्रॅकपर्यंत
- देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या प्रवांशांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
- ब्रॉडगेजवरील सर्व मनुष्यविरहित क्रॉसिंग्ज बंद करण्यात आली आहेत.
- अरुणाचल प्रदेश प्रथमच रेल्वेच्या नकाशावर आले
सकाळी 11.50 - संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक
- संरक्षण बजेट तीन लाख कोटींच्यावर गेलं आहे - पीयूष गोयल
सकाळी 11.40 - मजुरांसाठी...
- प्रधानमंत्री श्रमयोगी अनुदान या नवीन योजनेची घोषणा. त्यानुसार EPF जाणाऱ्या कामगारांना 6 लाखांचा विमा.
- तर 60 वर्ष पूर्ण झालेल्या मजुरांना 3,000 रुपयांची पेंशन
- 21 हजारांपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना 7,000 बोनस देण्याची घोषणा
सकाळी 11.35 - 'गोमाता' आणि मत्स्य उद्योग
- गोमातेचा सन्मान करण्यासाठी हे सरकार मागे पडणार नाही. त्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करणार.
- राष्ट्रीय कामधेनू योजनेअंतर्गत गोवंश सुधारणा, विकासासाठी काम करण्यात येईल.
- मत्स्यपालनासाठी नवा आयोग स्थापन करणार तर किसान क्रेडिट कार्ड आता पशुपालनासाठीही वापरता येणार
दरम्यान, यावर आपली बिनधास्त बानू बोलली...
सकाळी 11.25 - शेतकऱ्यांना मदत
- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये आमच्या सरकारने वाढ केली.
- 'पीएम शेतकरी सन्मान निधी' नावाच्या योजनेची घोषणा
- दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6 हजार रुपये जमा करणार. यासाठी लागणारे 75 हजार कोटी सरकार देणार.
- याचा 12 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होणार.
सकाळी 11:20 - आरोग्यावर बोलताना...
- जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना आमच्या सरकारने आणली.
- या योजनेमुळ गरीब आणि मध्यमवग्रियांचे 3000 कोटी रूपये वाचले आहेत. लाखो-कोट्यवधी लोकांना या योजनेचा फायदा झाला आहे.
- हरियाणामध्ये 22वे AIIMS सुरू होणार आहे.
सकाळी 11.15 वाजता - बुडीत कर्जांबाबत बोलताना...
- बँकांची कर्ज प्रकरणांची आणि कर्ज बुडण्याची खरी स्थिती समोर आणा, हे रिझर्व्ह बँकेला सांगण्याची आमच्या सरकारमध्ये हिंमत होती.
- तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज बँकांनी वसूल केले आहे.
- आम्ही भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवले. RERA (Real Estate (Regulation and Development) Act, 2016) आणि बेनामी संपत्तीविरोधी कायदा आणल्याने बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आली
- कोळसा आणि स्पेक्ट्रम अशा नैसर्गिक साधनसंपत्ती वाटपात पारदर्शकता आणली.
सकाळी 11.00 - प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांचं भाषण सुरू
अरुण जेटली लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत पीयूष गोयल यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले.
पाहूया त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे -
- 2020 पर्यंत सर्वांना घर, शौचालय, शिक्षण मिळावे, तरुणांना रोजगारांना संधी, दहशतवाद आणि घराणेशाहीचा शेवट होण्यासाठी प्रयत्न करणार
- आमच्या सरकारने कंबर मोडणाऱ्या महागाईचीच कंबर मोडली. आमच्या सरकारने महागाई, चलनवाढ, वित्तिय तूट कमी केली
- वित्तीय तूट आता GDPच्या 2.5 ट्कके
- राज्यांना अधिकाधिक वाटा देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले
- आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं
सकाळी 10.15 - बेरोजगारीचा प्रश्न कायम
"2017-18 या वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर होता आणि हा आकडा गेल्या 45 वर्षांतला सर्वाधिक आहे," हे सांगणारा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा (NSSO) एक अहवाल बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राने गुरुवारी प्रसिद्ध केला.
त्यामुळे ऐन अर्थसंकल्पाच्या दिवशी या बातमीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. तुम्हीही त्या बातमीविषयी इथे वाचू शकता.
त्यामुळे आपल्या बजेटमध्ये गोयल काय घोषणा करतात, यावर सर्वांचे लक्ष असेल.
दरम्यान, आम्हीही वाचकांना आज हा प्रश्न विचारला आहे. तुम्ही यावर आपली मतं आम्हाला फेसबुक किंवा ट्विटरवर सांगू शकता.
सकाळी 9.45 वाजता - अर्थमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन चर्चा केली. गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारच्या गेल्या 4.5 वर्षांच्या कामकाजाचा उल्लेख करत या सरकारने नव्या भारतासाठी काम केले असून 2014 पूर्वी देश अस्थिर पर्वात होता, असं अभिभाषणात सांगितलं आहे.
सकाळी 9.20 वाजता - शेअर मार्केट्स सुरू
मुंबई स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेन्सेक्स 36,311.74 वर राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांक 10,851.35 वर उघडला.
बजेटच्या दिवशी काय नवीन घोषणा होतात, यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असतेच. पण याचे तत्काळ परिणाम शेअर मार्केट्सवर पाहायला मिळतात. त्यामुळे या आकड्यांवर दिवसभर सर्वांची नजर राहील.
सकाळी 9.15 वाजता - अर्थमंत्री पोहोचले
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री पीयूष गोयल संसदेत पोहोचले.
पूर्णवेळ अर्थमंत्री अरुण जेटली हे उपचारासाठी परदेशी गेल्यामुळे अर्थ मंत्रालयाचा पदभार पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे.
सकाळी 9.00 वाजता - अर्थसंकल्पाचं साहित्य दाखल
अर्थसंकल्प समजावून घेताना लक्षात ठेवायचे 5 मुद्दे
1. वित्तीय तूट
जेव्हा वार्षिक कमाईपेक्षा सरकारचा खर्च जास्त होतो, तेव्हा त्याला वित्तीय तूट असे म्हणतात. यामध्ये कर्जाचा समावेश नसतो. 2017 साली अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 या वर्षासाठी वित्तीय तूट GDPच्या 3.2 टक्के असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
तज्ज्ञांनी येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. लोकानुनयी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार या अर्थसंकल्पात अधिक खर्चाची घोषणा करेल आणि कररचनेत बदल करेल अशी शक्यता आहे.
2. आयकरासाठी उत्पन्न मर्यादा
सध्या वार्षिक अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही. ही मर्यादा 5 लाख होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आयकरामध्ये 80 C अधिनियमांतर्गत मिळणारी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 1.5 लाखांवरून 3 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
3. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर
जो कर नागरिक सरकारला थेट स्वरूपात देतात त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. हा कर उत्पन्नावर लागतो, तो कोणत्याही इतर व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. प्रत्यक्ष करामध्ये आयकर, संपत्ती कर आणि कार्पोरेट कर यांचा समावेश होतो.
जो कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येतो त्यास अप्रत्यक्ष कर असं म्हणतात. यामध्ये सेवा उपलब्ध करून देणारे, उत्पादनांवर लागणारे कर यांचा समावेश होतो. वॅट, सेल्स टॅक्स, लक्झरी टॅक्ससारख्या करांऐवजी आता GST आकारला जातो. GST अप्रत्यक्ष कर आहे.
4. आर्थिक वर्ष
भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून होते. हे वर्ष पुढील कँलेंडर वर्षाच्या 31 मार्चपर्यंत सुरू राहाते. आर्थिक वर्षामध्ये बदल करण्याची चर्चा या सरकारने केली आहे.
आर्थिक वर्ष कॅलेंडर वर्षाप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर व्हावे अशी सरकारची इच्छा आहे. मात्र त्यामध्ये अजून कोणताही बदल झालेला नाही.
5. शॉर्ट टर्म गेन, लाँग टर्म गेन
सध्या एखाद्या व्यक्तीला शेअरबाजारामध्ये एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळामध्ये पैसे गुंतवून लाभ मिळाला तर त्याला अल्पकालीन भांडवली लाभ किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. त्यावर सध्या 15 ट्कके कर लावण्यात आला आहे.
शेअर्समधून एका वर्षाहून अधिक काळामध्ये मिळवल्या जाणाऱ्या लाभाला दीर्घकालीन भांडवली नफा (लाँग टर्म कॅपिटल गेन) असं म्हटलं जातं. या नफ्यावर कोणताही कर लागायचा नाही. मात्र 2018-19 या अर्थसंकल्पामध्ये 10 ट्कके कराची तरतूद करण्यात आली. अर्थात हा कर एक लाखांहून अधिकच्या नफ्यावरच लागू झाला आहे. एक लाखांपेक्षा कमी लाभावर कोणताही कर लावला जात नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)