परीक्षेचं टेन्शन आलंय? चिंता नको, करा हे 6 उपाय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये सोमवारी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तणाव न घेता परीक्षा देण्याच्या काही टिप्स पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
'ही आयुष्याची परीक्षा नाही. या परीक्षेपलीकडेही जगात खूप काही आहे, असा विचार करून परीक्षा दिली तर तुम्हाला कमी ताण येईल,' असं पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
मुलांनी, पालकांनी हे भाषण ऐकलं, पंतप्रधानांना प्रश्न विचारले. पण खरंच यामुळे परीक्षेबद्दलची भीती कमी झाली का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मुळात मुलांमध्ये गेल्या काही वर्षांत दहावी-बारावीच्या परीक्षांचा तणाव का वाढत आहे, हा प्रश्न आहे. पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चाचं हे दुसरं वर्ष. देशाच्या पंतप्रधानांनाही याबतीत मुलांशी संवाद साधायची गरज भासावी इतका हा प्रश्न गंभीर बनला आहे?
मार्कांवर आधारित शिक्षणपद्धतीमुळे तणाव

फोटो स्रोत, Getty Images
मुलांवर निश्चितच परीक्षांचा ताण येत आहे, असं मत बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
"माझ्यामते त्याची तीन मुख्यं कारणं आहेत. एक म्हणजे शिक्षणाच्या चांगल्या संधींच्या प्रमाणात मुलांची संख्या खूप जास्त आहे. Supply खूप अधिक आहे आणि त्याच्या तुलनेत शिक्षणाच्या provisions कमी आहेत. याचाच परिणाम म्हणजे चांगल्या संस्थांमधील संधींसाठी जास्त गुण मिळवण्याचा दबाव वाढत जातो.
दुसरी गोष्ट आपल्याकडे शिक्षणावर आधारित करिअरच्या संधींनाच आजही मोठ्या प्रमाणावर समाजमान्यता आहे. खेळ, संगीत, चित्रकला अशा कलागुणांच्या आधारे निर्माण होणाऱ्या उदरनिर्वाहाच्या संधी या फारशा प्रस्थापित नाहीत. या कलांमधील शिक्षण घेऊन पुढे काय, असा प्रश्न आजही विचारला जातो."
मुलांमध्ये परीक्षेचा तणाव येण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचंही डॉ. आशिष देशपांडे यांनी आवर्जून नमूद केलं.
"माध्यमांमधून यशस्वी मुलांच्या ज्या गोष्टी समोर येतात, त्याचीच अपेक्षा पालक आपल्या मुलांकडून करतात. Excellence या गोष्टीचं प्रचंड आकर्षण पालकांमध्ये दिसून येतंय.
म्हणजे मुलगा क्रिकेट खेळत असेल तर त्यानं सचिन तेंडुलकरच व्हायला हवं असं वाटतं. मार्कांच्या बाबतीतही पालकांचा हाच अट्टाहास दिसून येतो."
अपेक्षांच्या दबावामुळे मुलांचा गोंधळ
फलटणमध्ये शिक्षिका असलेल्या अनुराधा पाटील यांची मुलगी यावर्षी दहावीला आहे. पालक आणि शिक्षक अशा दुहेरी नात्यानं त्या आपल्या मुलीला येणारं टेन्शन हाताळत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसी मराठीशी बोलताना अनुराधा पाटील यांनी सांगितलं, "घरातून, शाळेतून, अगदी नातेवाईक आणि मित्रपरिवारामधूनही मुलांवर सतत आता दहावी आहे, असं बिंबवलं जातं.
त्यामुळे नववीपर्यंत हसतखेळत अभ्यास करून मार्क मिळवणारी मुलंही अचानकपणे तणावाखाली येतात. दहावी म्हणजे काहीतरी वेगळं असल्यासारखं क्लासेस लावणं, त्यांच्या छंद-आवडीनिवडींवर बंधनं घालणं असे प्रकारही केले जातात. मार्कांच्या अपेक्षा वाढतात. त्यामुळं मुलं गोंधळून जातात."
कसा दूर कराल तणाव?
डॉ. आशिष देशपांडेंनीही मुलांमधलं परीक्षांचं दडपण कमी करण्यासाठी काय करता येईल, यासंबंधी काही गोष्टी आवर्जून सांगितल्या.
1. शाळांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करायला हवा. सुदृढ मानसिक आरोग्यासाठी खेळ, कला, वाचन यांचं महत्त्वदेखील शाळांनी ओळखायला हवं. मुलांच्या कलागुणांना वाव देणारा, त्यांच्यामधील pro-social skills चा विकास होईल असा अभ्यासक्रम तयार करणं ही आताची गरज आहे. आम्ही गोरेगाव येथील नंदादीप शाळेत हा उपक्रम राबवत आहोत. इथं पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, भाषा या विषयांप्रमाणेच 'मौजे'चाही क्लास असतो. या वर्गात आम्ही मुलांमधील सामाजिक कौशल्यं कशी वाढीस लागतील याचा विचार करतो.
2. मुलं जे काही करत आहेत, ते त्यांना आवडायला हवं याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर अशा ठराविक क्षेत्रात गेला म्हणजेच त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल हा न्यूनगंड मुळातच पालकांनी मनातून काढायला हवा. तरच मुलांमधली मार्कांची भीती कमी करता येईल.
3. दहावी-बारावीच्या मार्कांचा जो बाऊ केला जातो, तो काही प्रमाणात कमी झाला आहे. पण त्याची जागा आता वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांनी घेतली आहे. या परीक्षांचं प्रस्थ कमी करण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रांची माहिती पालकांनी आणि मुलांनीही करून घ्यायला हवी. मुलांचा कल ओळखून आवडीचं शिक्षण देण्यासाठी Aptitude Test चा पर्याय अवलंबायला हवा.
4. महाराष्ट्रात आठवीपर्यंत कोणालाही नापास न करण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळेही दहावीच्या मुलांना मोठ्या प्रमाणावर परीक्षेचा ताण येताना दिसतो. परीक्षा नसणं एकवेळ समर्थनीय आहे, पण मुलांचं मूल्यमापनच न होणं चुकीचं आहे. आठवीपर्यंत अनुत्तिर्ण न करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचं टेन्शन मॅनेजच करता येत नाही. कोणत्याही सरावाविना ही मुलं नववी-दहावीतच परीक्षांना सामोरं जावं लागतं. हे म्हणजे मुलांना सरावाविना पाण्यात ढकलल्यासारखं आहे.
मुलांना या तणावातून बाहेर काढण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत असं मत अनुराधा पाटील यांनी व्यक्त केलं.
5. "दहावी-बारावी म्हणजे शेवटची परीक्षा नाही. हा एक टप्पा आहे. तो नक्कीच महत्त्वाचा आहेच. पण दहावीतले मार्क सर्वस्व आहेत, असं मुलांच्या मनावर बिंबवणं चुकीचं आहे. त्यांना हसत-खेळत परीक्षेच महत्त्व सांगितलं पाहिजं. घरात दहावीसाठी वेगळी वातावरण निर्मिती करण्यापेक्षा घरातलं वातावरण नेहमीसारखं ठेवलं तरच मुलांच्या मनावरचं दडपण कमी होईल. मुलांना तणावविरहित ठेवण्यासाठी योगा, ध्यानधारणा, छंद जोपासणं या गोष्टींकडेही पालकांनी लक्ष द्यायला हवं," असं अनुराधा पाटील यांनी म्हटलं.
6. अनेक घरात मुलांवर अभ्यासाचं दडपण आणून पालक मात्र निवांत टीव्हीसमोर बसतात असं चित्र दिसत असल्याचं अनुराधा यांनी नमूद केलं. "हे चुकीचं आहे. मुलांच्या अभ्यासात पालकांनीही सहकार्य करायला हवं. अगदी त्यांच्यासोबत अभ्यासाला बसायला हवं असं नाही. पण सहजपणे येता-जाता त्यांच्याशी संवाद साधणं, अभ्यासाच्या नियोजनात त्यांना मदत करणं हेसुद्धा मुलांना रिलॅक्स ठेवायला मदत करू शकतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








