विद्यार्थ्यांनो, परीक्षेचं टेन्शन नाही, पुरेशी झोप घ्या, कारण...

झोप

फोटो स्रोत, Getty Images / HT

    • Author, ख्रिस्तिन रो
    • Role, बीबीसी फ्युचर

जसजशी परीक्षेची तारीख जवळ येते, तसतसा अभ्यासाचा ताण आणि तो पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचं जागरण वाढू लागतं. अगदी पेपरच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत अनेक विद्यार्थी रट्टा मारत बसतात. आदल्या दिवशी केलेला अभ्यास लक्षात राहतो, त्याचा फायदा होतो, असा समज यामागे असतो. पण हे कितपत खरंय?

मानवी मेंदूत साठवल्या जाणाऱ्या स्मृती आणि रात्रीची झोप यांच्यात काय संबंध आहे, याचा अभ्यास संशोधक करत आहेत. संशोधक जॅक टॅमिनेन यांच्यानुसार शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत बसणं चुकीचं आहे. ते युनायडेट किंगडमच्या रॉयल हॉलोवे युनिर्व्हसिटीत मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

झोप आणि स्मृती ही सांगड विशेषतः भाषेच्या अभ्यासासंदर्भात कशी असते, याबद्दल टम्मिनेन यांचा सखोल अभ्यास आहे. विद्यार्थ्यांना झोप किती, कशी आणि कुठे मदत करू शकते, ही संकल्पना ते मांडतात.

स्लीप लर्निंग, म्हणजे एखादी भाषा शिकायची असेल तर झोपताना त्याचं रेकॉर्डिंग कानाजवळ लावून ठेवलं की अबोधपणे मेंदूवर त्याचा ठसा उमटतो आणि जागे झाल्यावर विद्यार्थी लॅटिन बोलू शकतात, असा एक समज आहे. पण हा समज चुकीचा आहे.

पण त्यामुळे झोपेचा आपल्या स्मृतीशी संबंध नाही, असं नाही. मेंदूत माहिती साठवण्यासाठी झोप अत्यावश्यक आहे आणि टॅमिनेन यांसह इतर काहींनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे.

टॅमिनेन यांच्या सध्या सुरू असणाऱ्या संशोधनात सहभागींना नवीन शब्द सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना रात्रभर जागं ठेवण्यात आलं. त्यानंतर टॅमिनेन यांनी या शब्दांची स्मृती काही रात्रींनंतर किती राहते आणि त्याच्या आठवड्याभरानंतर किती राहते, याची तुलना केली.

काही रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतर सहभागींचा मिळालेला प्रतिसाद आणि कंट्रोल ग्रुपमधल्या रात्रभर न झोपलेल्या सहभागींचा यात लक्षणीय बदल दिसून आला.

ते म्हणतात की, "या भाषा-शब्द शिकण्याच्या प्रयोगाचा केंद्रबिंदू झोप हा होता. आपण झोपलेले असताना अर्थातच अभ्यास करत नसतो. तरीही आपल्या मेंदूचा अभ्यास चालूच असतो. एका अर्थी आपल्यावतीनं तो काम करत असतो. अर्थात या काळात पुरेशी झोप मिळाली तर त्याचा योग्य तो परिणाम साध्य होतो."

झोपलेल्याच्या मेंदूत दडलंय काय?

आम्ही टॅमिनेन यांच्या स्लीप लॅब क्रमांक 1 मध्ये गेलो. फारसं सामान नसलेल्या एखाद्या खोलीसारखा ती दिसते आहे. त्यात एक बेड, रंगीत रग, कागदी फुलपाखराची फ्रेम आहे. बेडच्या वरच्या बाजूला छोटेखानी EEG मशीन ठेवलेलं आहे.

सहभागींच्या मेंदूंच्या अॅक्टिव्हिटी टिपण्यासाठी डोक्यावर इलेक्ट्रोडस् लावलेले आहेत. केवळ मेंदूचे विभिन्न भागच नव्हे तर चेहऱ्याचे स्नायू आणि डोळ्यांच्या हालचाली टिपल्या जातात.

या कंट्रोल रूममधल्या हॉलमध्ये संशोधकांना प्रत्येक सहभागींच्या मेंदूच्या प्रतिमांचं निरीक्षण करता येतं. त्यामुळं सहभागींच्या रॅपिड आय मुव्हमेंटची नोंद अगदी दोन्ही डोळ्यांची वेगवेगळी घेता येते.

झोप

या सगळ्या यंत्रणेमुळं संशोधकांना वेळोवेळी सहभागींच्या मेंदूतल्या घडामोडींची माहिती दीर्घकाल आणि अचूकरीत्या टिपता येते. त्यामुळं सहभागींची रॅपिड आय मूव्हमेंट (REM) कधी होत होती, हे E-1 आणि E-2 हे दोन्ही डोळ्यांच्या आलेखांवरून सांगता येत होतं.

पण टॅमिनेन यांच्या या सध्याच्या संशोधनातलं निर्णायक ठरणारं संशोधन होतं ते म्हणजे भाषिक क्षमतेवर होणारा परिणाम. सर्वसाधारणपणे सहभागी रॅपिड आय मूव्हमेंटच्या (REM) टप्प्यावर गाढ झोपेत असतानाची अवस्था स्लो वेव्ह स्लीप (SWS).

हे SWS फॉर्मिग आणि रिटेनिंग अर्थात स्मृतींचं साठवण आणि जतन करण्याच्या कामात महत्त्वाचे ठरते. मग ती शब्दसंपत्ती असो, व्याकरण असो किंवा अन्य माहितीचा साठा असो, SWS महत्त्वाची भूमिका बजावतं. मेंदूच्या विविध भागांतल्या देवाणघेवाणीची ही जणू एखादी किल्लीच ठरते.

SWSच्या दरम्यान hippocampus हा भाग चटकन शिकण्यात माहीर असून neocortex निओकोर्टेक्ससोबत सतत संपर्क साधून दीर्घकाळासाठी स्मृतींची एकत्रित साठवण करण्याचं काम करतो. म्हणूनच hippocampus कदाचित सुरुवातीला काही नवीन शब्द लक्षात ठेवताना काहीशा सांकेतिक भाषेत लक्षात ठेवतो, पण या संशोधनात सापडलेले पॅटर्न्स आणि त्यांचं कनेक्शन लक्षात घेतलं तर प्रत्यक्षात अनेक गुंतागुंतीची प्रक्रिया होतहोत त्या त्या संकल्पना साठवल्या जातात आणि क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग creative problem-solvingची प्रक्रिया घडते. म्हणजे एक प्रकारे झोप हा hippocampus आणि neocortex या दोन्हींना सांधणारा पूल ठरते. सांगायची गोष्ट म्हणजे तीन सेकंदांहून अधिक काळ घडणारी गोष्ट मेंदूत नोंदवली जाते.

टॅमिनेन म्हणतात की, "झोपेशी संबंधित असणारा भाग सतत येणारा नवीन माहितीची ओघ आणि आधीच्या माहिती यांचा योग्या तो मेळ साधतो. त्यांच्या संशोधनातील सहभागींकडून गोळा केलेल्या माहितीनुसार झोपेदरम्यान शिकलेल्या नवीन शब्दांची अधिकाधिक गतीनं गोळाबेरीज केली जाते आणि त्यांचं एकत्रीकरण केलं जातं."

मेंदू

फोटो स्रोत, Getty Images

टॅमिनेन यांनी स्लो वेव्ह स्लीपवर अधिक लक्ष्य केंद्रित करताना थिअरी मांडली की, REM ही झोपेची अवस्था व्यक्तीच्या भाषिक समृद्धी वृद्धिंगत व्हायला सिंहाचा वाटा उचलते. अगदी झोपेच्या काही टप्प्यांत स्वप्नावस्था असली तरीही हे काम चालू राहते.

कॅनडा युनिर्व्हसिटी ऑफ ओटावामधील स्लीप अँड ड्रीम्स लॅबमधल्या संशोधनात आढळून आलं की, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी फ्रेंच भाषा शिकताना त्यांना त्यासंर्भातलं स्वप्न पडणं, हे खरोखर शक्य आहे.

शेवटी स्वप्नं म्हणजे तरी काय हो. तर दिवसभरात जे काही घडतं त्यांचं एका अर्थी प्रतिबिंबच. त्यामुळं संशोधन सुचवतं की, मेंदूच्या ठराविक भागांत तर्क आणि भावना यांची सांगड घातली जाते. हे दोन्ही घटक स्वप्न पडताना वेगळं रूप धारण करतात आणि एखादी भाषा शिकताना त्याद्वारे निर्माण झालेली कल्पनाशक्ती त्या भाषेच्या प्रवाहातलं पोहणं काहीसं सुकर करते.

विद्यार्थी REM झोपेच्या टप्प्यावर दुसरी भाषा शिकतात असं लक्षात आलं आहे. त्यामुळं दिवसा एखादा डुलका काढल्यानं त्यांचं भाषिक ज्ञान वाढलेलं दिसतं.

रात्रीस खेळ चाले

एखाद्याच्या झोपेची आवर्तनं नि घटका किती आणि कशी असाव्यात, ते अनेकदा अनुवंशिकतेवर अवलंबून असतं. इतकंच काय तर आपलं शरीरही एक प्रकारे एखाद्या घड्याळासारखं काम करतं. केव्हा झोपावं, केव्हा उठावं ते ते सांगतं आणि त्याच्या या सांगण्याचं नीट पालन केलं तर आपल्या आकलनशक्तीत निश्चितच चांगली भर पडते.

झोप

फोटो स्रोत, Getty Images

मायकेल W यंग यांच्याखेरीज फारच थोड्या जणांना या विषयी माहिती आहे. त्यांना 2017मध्ये सायकॉलॉजी / मेडिसीन क्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. `क्लॉक जीन्स` या विषयावर त्यांनी दोन संशोधकांसोबत काम केलं. याबद्दल ते सांगतात की, "शाळा असो, कामकाज असो किंवा आयुष्यातला कोणताही प्रसंग असो, आपण सगळ्या गोष्टींना एक प्रकारे लय देण्याचा प्रयत्न करायला हवा."

एखाद्या व्यक्तीच्या जीवनशैलीमुळं, भोवतालच्या परिस्थितीमुळं किंवा अनुवंशिकतेमुळं झोपेची समस्या निर्माण होऊन झोपेच्या आकृतीबंधाची लय बिघडते. या प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या झोपेसाठी रात्री पडदे ओढून झोपणं किंवा दिवसाचा नैसर्गिक उजेड टाळून शक्य तेवढा अंधार केला जातो, जेणेकरून चांगली झोप लागू शकते.

डुल डुल डुलकी

मोठ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत सरकेडीअन ऱ्हिदमचा (circadian rhythm) निर्विवादपणं मोठा वाटा असतो, पण लहानपणी कानी पडलेले उच्चार महत्त्वाचे असून अधिकांशी लक्षात राहतात.

मोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये स्लो वेव्ह स्लीप अधिकांशी आढळते. त्यामुळंही असेल कदाचित मुलं भाषा असो किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असोत, फार लवकर शिकतात.

जर्मनीतील युनिर्व्हसिटी ऑफ ट्युबिंगनमधील चाईल्ड स्लीप लॅबमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार मुलांची स्मृती पक्की होण्याच्या प्रक्रियेत झोप ही गोष्टी मोठी भूमिका बजावते. झोपेत मुलांच्या मेंदूत कायकाय बदल होतात, कोणकोणती माहिती झोपेआधी आणि झोपेनंतर मेंदू साठवून ठेवतो, आदी निरीक्षणांमुळं सूचित माहिती आणि तिचं निःसंदिग्ध माहितीत रूपांतरण करणं या प्रक्रिया समोर आल्या. दिवसभरात मोठ्या माणसांनाही अशा प्रकारे माहितीचा साठा होऊन तो पुरवला जातो. पण संशोधक कतरिना झिंक म्हणतात की, "झोपेचा मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडतो."

झोप

फोटो स्रोत, Getty Images

कॅनडिअन स्लीप अँड सरकेडीअन नेटवर्कचे समन्वयक डोमॅनिक पेटिट म्हणतात की, "मेंदूचा सतत विकास होत असल्यानं लहानपणी पडणारा प्रभाव हा अधिक असतो."

त्यांनी मुलांवर सरकेडीअन ऱ्हिदमचा होणारा परिणाम सखोलपणं अभ्यासला आहे. या संकल्पनेचा अर्थ असा की, "मुलांनी दिवसभरात थोडा वेळ झोपावं, म्हणजे त्यांना शिकायचं आहे, त्या गोष्टी त्यांच्या स्मरणात राहतील."

"भर दिवसा एखादी डुलकी काढणं, हे लहान मुलांसाठी महत्त्वाचं असून त्यामुळं त्यांच्या शब्दसंग्रहात भर पडते, त्यांना शब्दांचा अर्थ समजतो आणि भाषेचं सौंदर्य नकळत शिकता येतं," असं त्या म्हणतात. "सलग झोप लागणं हे स्मृतीसाठी आणि आयुष्यभर शिकण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठरतं."

झोपेमुळं माहितीचा साठा होतो, ती मिळते एवढंच नाही तर त्यामुळं माहितीत भर पडण्याच्याही विविध तऱ्हा निर्माण होतात. त्यामुळं मेंदू तरतरीत राहतो आणि पुन्हा प्राप्त झालेली माहिती योग्य रीतीनं जमा करतो. शिवाय आवश्यक तेव्हा त्यातली वेचक माहिती योग्य वेळी पुरवतोदेखील.

झिंक म्हणतात की, "खरंतर स्मृतींची साठवण आणि त्यात सतत होणारे बदल यांमुळं मूळ स्मृतीचाही छडा लावता येतो. एका परीनं प्रत्येक वेळी आठवणींत साठवलेली माहिती ही तितकीच महत्त्वाची असते नी ती जपून ठेवली जाते."

अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर लहान मुलं असोत किंवा मोठं माणसं त्यांना दीर्घकाळ लागलेली झोप ही त्यांच्या आळशीपणाचं नव्हे तर भाषा शिकण्याच्या माध्यमाचं एक चिन्ह आहे. आपला मेंदू आणि आपल्या शरीराच्या घड्याळाचा ताळमेळ साधणं ही खूप अवघड गोष्ट आहे.

म्हणूनच भाषा शिकताना अध्येमध्ये एखाद डुलकी काढणं, किंवा रात्री गाढ झोपणं हे आता अगदी स्वाभाविकच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या शब्दसंपत्तीत भर पडलेली असली तर त्यात नवल ते काय?

आणि परीक्षा जवळ येत आहेत, म्हणून लक्षात ठेवा. अभ्यासासाठी वेळेचं नियोजन करताना झोपेचंही नियोजन करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)