You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शाह मालदाच्या रॅलीत विरोधकांबद्दल खोटं बोलले का?
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज टीम
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या युनायटेड इंडिया रॅलीत 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' अशा घोषणा दिल्या नसल्याचा दावा अमित शाह यांनी केला होता.
अमित शाह मंगळवारी पश्चिम बंगालमधल्या मालदा इथल्या भाजपच्या रॅलीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी (19 जाने) रोजी अनेक विरोधी पक्षांना एकत्र बोलावून 'युनायटेड इंडिया रॅली'चं आयोजन केलं होतं.
त्या रॅलीत राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, DMKचे नेते MK स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि पाटीदार समुदायाचे नेते हार्दिक पटेल यांचा समावेश होता.
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येऊन मैदानात उतरु असा संदेश त्यांनी मंचावरून दिला.
या रॅलीतील भाषणांना प्रत्युत्तर देताना अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधल्या मालदा येथे एक रॅली घेतली. "विरोधी पक्षांच्या रॅलीत जय हिंदच्या घोषणा दिल्या नसल्याचं," अमित शाह यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षांची महाआघाडी ही संधीसाधू राजकारणाची झलक आहे. ते देशावर प्रेम करत नाहीत, असंही शाह म्हणाले.
अमित शाह यांचं हे वक्तव्य भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरूनही ट्वीट करण्यात आलं.
पण अमित शाह यांनी केलेला आरोप कितपत खरा आहे? विरोधी पक्षांनी 'त्या' रॅलीत खरोखर जय हिंद असं म्हटलं नव्हतं का? तर याचं उत्तर हे नाही, असं आहे. अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर लावलेला आरोप साफ खोटा आहे.
बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमने याची पडताळणी केली असता विरोधी पक्षांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या होत्या.
पाटीदार पक्षाचे नेते हार्दिक पटेल यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट "भारत माता की जय" असं म्हणून केला.
हार्दिक पटेल यांनी 2017मध्ये गुजरातच्या विधानसभा निवडणुकित भाजप विरोधी प्रचार केला होता.
दरम्यान ते कोणत्याही पक्षाशी संलग्न नाहीत. गुजरातमध्ये झालेल्या पाटीदार आंदोलनानंतर ते पाटीदार समुदायाचे नेते म्हणून पुढं आले.
केवळ हार्दिक पटेलच नव्हे तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषण संपताना 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' अशा घोषणा दिल्या होत्या.
विरोधी पक्षांच्या घोषणा दिल्या नाहीत असं म्हणणारे अमित शाह हे एकटेच नाहीत. याआधी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. त्यामध्ये 'आज तक' टीव्ही चॅनलच्या अँकर श्वेता सिंह यांनी विरोधी पक्षांनी घोषणा दिल्या नसल्याचं लिहिलं होतं.
दरम्यान श्वेता सिंह यांनी ट्वीटरवरून असं काही लिहिलं नसल्याचं स्पष्ट केलं. तर विरोधी पक्षांनी 'जय हिंद'च्या घोषण दिल्याचं म्हटलं आहे.
भाजप आणि विरोधी पक्ष यांनी लोकसभेच्या प्रचारात पूर्णपणे झोकून दिलं आहे. यादरम्यान राष्ट्रवादाचा मुद्दा चर्चेत येत आहे.
"जे कोणी भारत माता की जय आणि जय हिंद अशा घोषणा देत नाहीत ते हिंदू विरोधी आहेत," असं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा म्हटलं आहे.
हा मुद्दा अनेकदा मुस्लिम नेत्यांबद्दल समोर यतो. MIMचे नेते खासदार असदउद्दीन ओवैसी यांच्या मते 'वंदे मातरम्' म्हणणं हे त्यांच्या धर्माच्या विरोधी आहे.
2017मध्ये ANI या वृत्तसंस्थेसी बोलताना असदउद्दीन ओवैसी म्हणाले, "आम्ही केवळ अल्लाहची पूजा करतो. मक्का आणि पैगंबराचीही पूजा करत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही देशावर प्रेम करत नाही. इतिहास पुरावे आहेत की आम्ही देशासाठी प्राण दिले आहेत. संविधानानुसार आम्हाला आमचा धर्म मानण्याचा हक्क आहे."
भाजपने विरोधी पक्षांवर असे आरोप करणं हे आश्चर्यकारक नाहीए. पण यावेळी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी खोटा आरोप करून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
आतापर्यंत पक्षानं किंवा भाजपच्या नेत्यानं या खोट्या आरोपांबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)