You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रावर सर्वांत जास्त कर्जाचा बोजा आहे, पण...#5मोठ्याबातम्या
वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूयात.
1. देशात सर्वाधिक कर्जाचा भार महाराष्ट्रावर पण...
देशात सर्वाधिक कर्जाचा बोजा महाराष्ट्र राज्यावर असल्याचं क्रिसिल या पतमानांकन संस्थेनं म्हटलं आहे. लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार देशातील सर्व राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जाचा बोजा असला तरी राज्याच्या सकल उत्पन्नाच्या (GDP) तुलनेत हे प्रमाण सर्वांत कमी आहे.
महाराष्ट्रावर या आर्थिक वर्षाअखेर पाच लाख कोटींच्या आसपास कर्जाचा भार असेल असा अंदाज क्रिसिलनं वर्तवला आहे. पण महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण 17 टक्के असल्यामुळे काळजी करायचं कारण नाही असंही क्रिसिलनं म्हटलं आहे.
2. ISISशी संबंध असल्याच्या संशयावरून 9 जणांना अटक
आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणांकडून घातक रसायनं जप्त करण्यात आली आहे. या जीवघेण्या रसायनांचा वापर करून एखाद्या मोठ्या कार्यक्रमात विषप्रयोग करण्याचा त्यांचा डाव असावा असा संशय ATSनं व्यक्त केला आहे. ही बातमी बिजनेस स्टॅंडर्डनं दिली आहे.
महाराष्ट्र एटीएसनं औरंगाबाद आणि मुंब्रामधून 9 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेले तरूण हे उम्मत-ए-मोमदिया संघटनेशी निगडित असल्याचं तपासात उघड झालं आहे. अटक झालेल्यांपैकी काही तरुण हे उच्चशिक्षित असून त्यापैकी 2 जण इंजिनिअर, एक फार्मासिस्ट, दोन इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत असं ATSअधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
3. पीयूष गोयल बजेट सादर करणार?
1 फेब्रुवारी रोजी देशाचा हंगामी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण अरुण जेटलींवर उपचार सुरू असल्यामुळे ते यावेळी बजेट सादर करू शकतील की नाही यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पीयूष गोयल यांची अर्थ आणि कार्पोरेट मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपवली आहे.
जेटली यांची प्रकृती पाहता त्यांच्याऐवजी ही जबाबदारी पीयूष गोयल पार पाडतील की काय अशी चर्चा सध्या रंगली आहे. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे.
4. काँग्रेसच्या निवडणूक समितीचे अशोक चव्हाण प्रमुख, शिंदेंकडे कॅम्पेनची जबाबदारी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्राच्या विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहे. यामध्ये निवडणूक समितीची घोषणा केली आहे. समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची निवड केली आहे असं वृत्त लोकमत न्यूज18 नं दिलं आहे.
निवडणूक अभियान समिती अध्यक्षपदी सुशील कुमार शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मीडिया समितीच्या अध्यक्षपदी कुमार केतकर तर जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शरद रणपिसे यांची नियुक्ती केली आहे.
5. 'काही जणांसाठी कुटुंबच पक्ष पण भाजपमध्ये पक्षच कुटुंब'-मोदी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली. या नियुक्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान यांनी कुणाचं नाव न घेता म्हटलं आहे की देशात अनेक जणांसाठी कुटुंबच पक्ष असतो मात्र भाजपमध्ये पक्षच कुटुंब आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला काय वाटतं यावरून भाजपमध्ये निर्णय घेतला जात नाही असं देखील ते म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांसोबत सुरू असलेल्या संवादात त्यांनी हे म्हटलं. हे वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)