प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश, पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी

2019 लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं सगळ्यांत मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक लगावला आहे. काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे.

राहुल गांधी सक्रिय राजकारणात आल्यानंतरही प्रियंका दररोजच्या घडामोडींपासून दूर होत्या. त्यांनी कायमच स्वत:ला राहुल यांचा मतदारसंघ असलेला अमेठी आणि सोनियांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीपुरतच मर्यादित ठेवलं होतं.

वर्षभरापूर्वी राहुल गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. त्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं भाजपला जेडीएसच्या मदतीनं सत्तेपासून दूर ठेवलं. तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात सत्ताही मिळवली.

त्यामुळे राहुल यांचं नेतृत्व सर्वमान्य झाल्यानंतर आता काँग्रेसनं ऐन निवडणुकीआधी दीड महिना प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देऊन मोठी खेळी केली आहे.

त्यामुळे किमान उत्तर प्रदेशात तरी प्रियंका गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आणि अमित शाह असा सामना निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. ज्याकडे आता अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.

2019च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमधला संग्राम महत्वाचा का?

उत्तर प्रदेशची लोकसंख्या 22 कोटी आहे. यूपीत लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत.

2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं यातील 71 जागा जिंकल्या होत्या.

ज्या पूर्व उत्तर प्रदेशची अर्थात पूर्वांचलची जबाबदारी प्रियंका यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे, तिथे 24 जिल्हे आहेत.

पूर्व उत्तर प्रदेशात लोकसभेचे एकूण 23 मतदारसंघ आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वाराणसीतून निवडून आलेत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिथून निवडून यायचे, तो गोरखपूर मतदारसंघही पूर्वांचलमध्येच आहे.

त्यामुळे या भागात प्रचार करताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर राहुल गांधींऐवजी प्रियंका गांधी यांचं आव्हान असणार आहे.

उत्तर प्रदेशात मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं युती केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात आपली व्होटबँक कायम ठेवण्यासाठी प्रियंका गांधी यांचा चेहरा कामाला येईल.

प्रियंका गांधी यांची तुलना कायम इंदिरा गांधी यांच्याशी कऱण्यात आलीय, त्या लोकांना जवळच्या वाटतात. उत्तर प्रदेशात त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.

रायबरेलीतून निवडणूक लढवणार?

रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 1999 पासून लोकसभेचा हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि सध्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराची धुरा प्रियांका गांधी यांनी नेहमीच सांभाळली आहे.

प्रियांका गांधी या उत्तम संघटक मानल्या जातात. त्यामुळे प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवण्याचा विचार केल्यास त्यांच्यासाठी रायबरेली मतदारसंघाची निवड होईल असे बोलले जातं.

रायबरेली मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जात असला तरी 1977 साली जनता पक्षाच्या राज नारायण यांनी याच मतदारसंघात इंदिरा गांधी यांचा पराभव केला होता. तसंच 1996 आणि 1998मध्ये भाजपाने तिथं विजय मिळवला होता.

इंदिरा गांधी यांच्यासारखीच छबी

प्रियांका गांधी यांचं व्यक्तीमत्त्व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच असून त्यांची केशभूषा आणि कपड्यांची निवड इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच आहे. त्यामुळे त्या दोघींमध्ये साम्य शोधलं जातं.

मोठ्या प्रचारसभांना आत्मविश्वासाने संबोधित करण्यासारखे त्यांचे गुण काँग्रेसच्या पारंपरिक आणि जुन्या मतदारांना पक्षाबरोबर बांधून ठेवण्यासाठी उपयोगी ठरतील असा विचार केला जातो.

यावर्षी काँग्रेसच्या महाअधिवेशनासाठी प्रियांका गांधी सक्रीय असल्याचं दिसून आलं होतं

रॉबर्ट वाड्रा ही प्रियंकांची अडचण?

प्रियांका गांधी यांचं नाव समोर आल्यावर पाठोपाठ त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर असणाऱ्या घोटाळ्यांच्या आरोपाचा विषय काढला जातो. किंबहुना हे आरोप प्रियांका यांच्या राजकीय वाटचालीत अडथळा मानले जातात.

रॉबर्ट वाड्रा यांच्यावर जमिनव्यवहारात कथित घोटाळे केल्याचे आरोप आहेत. विविध तपास यंत्रणाद्वारे वारंवार तपास आणि न्यायालयीन प्रक्रीयेमुळेही त्यांचं नाव माध्यमांमध्ये येत असतं.

नुकतचं राजस्थानमधील एका प्रकरणी इडीकडून रॉबर्ड आणि त्यांच्या आईंना ईडीनं समन्स बजावलं होतं. वेळ पडली तर त्यांना अटक सुद्धा केला जाईल असं ईडीनं स्पष्ट केल्याचं वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून छापून आलं होतं.

काहीवेळेस बनाना रिपब्लिकसारख्या वादग्रस्त उपमा किंवा ट्वीटरवरील कमेंटसमुळेसुद्धा रॉबर्ट वाड्रा यांनी वाद ओढवून घेतले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)