शबरीमला : कनकदुर्गा यांना पतीनं घराबाहेर काढलं

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी बंगळुरूहून

केरळातील शबरीमला मंदिरात प्रवेश करून इतिहास रचणाऱ्या कनकदुर्गा यांना त्यांच्या पतीने घराबाहेर काढलं आहे.

यावर्षींच्या सुरुवातीला 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणखी एका महिलेबरोबर कनकदुर्गा यांनी शबरीमलामधील अयप्पा मंदिरात प्रवेश केला होता.

सोमवारी संध्याकाळीच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं. त्याआधी या मुद्दयावरून त्यांचा सासूशी वाद झाला होता. त्यांच्या सासूच्या मते कनकदुर्गा यांनी मंदिरात प्रवेश करून परंपरा मोडली आहे. यानंतर सासूशी झालेल्या झटापटीत त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. त्यानंतर कनकदुर्गांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

समाजसेवक तंकाचन विठयाटिल यांनी बीबीसीला सांगितलं, "कनकदुर्गा यांच्या पतीनं घर सोडल्याचं त्यांना कळालं. दारालाही कुलूप लागलं आहे. ते कनकदुर्गा यांच्याशी बोलायला तयार नाहीत. कनकदुर्गा यांच्याबरोबर पोलीसही होते. पोलीस त्यांना एका मदत केंद्रात घेऊन आले होते."

कनकदुर्गा रुग्णालयात असतांनाच आपण सासरच्यांना नकोसे झालोय असं त्यांना कळलं. म्हणूनच तिथून सुटी मिळाल्यावर त्यांनी पोलीस ठाणं गाठलं.

मल्लापुरमचे पोलीस अधीक्षक प्रतीश कुमार म्हणाले, "कनकदुर्गा यांचे पती पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी घरी परत येऊ नये असं त्यांना वाटत होतं. कनकदुर्गा यांनी नवऱ्याबरोबरच राहण्याचा हट्ट धरला. त्यावर पोलीस ठाण्यातच राहण्याची भूमिका त्यांच्या पतीने घेतली. आम्ही दोघांची समजूत घातली आणि कनकदुर्गा यांना सरकारतर्फे तयार करण्यात आलेल्या एका मदत केंद्रात त्यांची रवानगी केली."

प्रकरण कोर्टात जाणार

पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की कनकदुर्गा यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. हे आता घरगुती हिंसाचाराचं प्रकरण झालं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोर्टात जाईल.

ज्या दिवशी कनकदुर्गा यांच्या सासूशी त्यांची झटापट झाली त्या दिवशीच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. शबरीमलामधून परतल्यानंतर निदर्शकांच्या भीतीने त्या अनेक दिवस लपून बसल्या होत्या. ज्या दिवशी त्या घरी परतल्या त्या दिवशी घरातच विरोध सहन करावा लागला.

10 ते 50 या वयोगटातील सगळ्या महिलांना मंदिरात प्रार्थना करण्याची परवानगी असल्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. याच आदेशाला अनुसरून 39 वर्षीय कनकदुर्गा आणि 40 वर्षीय बिंदू अम्मिनी यांनी दोन जानेवारीला मोठी यात्रा करून शबरीमाला मंदिरात प्रवेश केला.

मंदिराच्या 18 पायऱ्या चढण्याआधी ज्या रीती रिवाजांचं पालन करावं लागतं त्या सगळ्या प्रथांचं पालन या दोघींनी केलं होतं. याआधीही त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना यश मिळालं नाही. यावेळी त्यांच्याबरोबर साध्या वेशातील महिला पोलीस अधिकारीही होत्या.

24 डिसेंबरला पोलिसांच्या उपस्थितीत कनकदुर्गा आणि बिंदू यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपाशी निगडीत शबरीमाला कर्मा समितीच्या सदस्यांनी पोलिसांना विरोध केला होता.

या समितीचा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला विरोध आहे. त्यांच्या मते ज्या बायकांना मासिक पाळी येते त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जावा कारण ते परंपरेच्या विरुद्ध आहे.

28 सप्टेंबर 2018 ला सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने 4-1 अशा बहुमताने परंपरेपेक्षा महिलांच्या अधिकारांना जास्त प्राधान्य दिलं होतं.

तंकाचन म्हणाल्या, "बुधवारी कनकदुर्गा सत्र न्यायालयात घरी प्रवेश मिळवण्यासाठी अपील करतील. सध्या तरी या प्रकरणात त्या कुणाशीच काही बोलू इच्छित नाहीत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)