You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हार्दिक पटेल यांना क्लीन बोल्ड करणाऱ्या किंजल पटेल कोण आहेत?
पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे विवाहबद्ध होणार आहेत अशी बातमी झळकली आणि ते कुणासोबत लग्न करणार आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर सुरू झाली.
हार्दिक पटेल हे कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या किंजल पटेल यांच्याशी लग्न करणार आहेत. हार्दिक आणि किंजल हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. हार्दिक पटेल आणि किंजल पटेल यांच्या परिवाराचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत अशी माहिती बीबीसी गुजरातीला मिळाली आहे.
बीबीसी गुजरातीने हार्दिक पटेल यांची मुलाखत घेतली. किंजल आणि ते कसे जवळ आले याची सर्व हकीकत सांगितली.
किंजल आणि हार्दिक यांचं लग्न 27 जानेवारी रोजी सुरेंद्रनगर जिल्ह्यात दिगसर या ठिकाणी होणार आहे. हे लग्न साध्या पद्धतीनं होणार असून या लग्नाला अंदाजे शंभर जण उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
"आम्ही दोघं गेल्या सात वर्षांपासून नात्यात आहोत. आमच्या कुटुंबीयांना मात्र ही गोष्ट गेल्या तीन चार वर्षांतच कळली," अशी कबुली हार्दिक पटेल यांनी बीबीसी गुजरातीला दिली. आमच्या दोघांचं लग्न व्हावं अशी दोन्ही कुटुंबाची इच्छा होती, त्यामुळे हे अरेंज मॅरेज आहे असं हार्दिक सांगतात.
हार्दिक आणि किंजल यांचा या महिन्याच्या 23 तारखेला साखरपुडा होणार आहे तर 27 तारखेला लग्न होईल.
"जेव्हा आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनात मला अटक होणार होती तेव्हा ही गोष्ट मी किंजललाच आधी सांगितली होती," अशी आठवण ते सांगतात.
"सुरुवातीला किंजलच्या कुटुंबीयांचं मत माझ्या राजकारणाशी अनुकूल नव्हतं पण नंतर स्थिती बदलली," असं ते सांगतात.
किंजल या उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांनी पदव्युत्तर पदवीच शिक्षण घेतलं आहे. तसंच त्या नंतर ह्युमन रिसोर्समध्ये शिक्षण घेत होत्या पण नंतर त्यांनी ते सोडलं आणि आता त्या कायद्याचं शिक्षण घेत आहेत. अशी माहिती हार्दिक यांनी दिली.
हार्दिक पटेल आणि किंजल यांच्या आवडी निवडी कशा आहेत याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. किंजल यांना प्रवास आवडतो असं हार्दिक सांगतात. "मला विशेष काही आवड नाही. माझ्याजवळ वेळच नसतो. जर माझ्याकडे वेळ असेल तर तिच्यासोबत फिरायला जायला मला आवडेल," असं हार्दिक म्हणाले.
"किंजलला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड आहे. ती नियमितपणे डायरी लिहिते आणि तिला कादंबऱ्या आवडतात," असं हार्दिक सांगतात.
हनीमूनला कुठे जाणार असं विचारलं असता हार्दिक पटेल म्हणाले, "मला या गोष्टींमधलं फारसं कळत नाही. सध्या माझं लक्ष्य लोकसभा निवडणुकांवर आहे."
हार्दिक पटेल यांचे वडील भारतभाई पटेल यांच्याशी बीबीसी गुजरातीनं बातचीत केली. ते म्हणाले, "समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे साध्या पद्धतीनं हे लग्न होणार आहे."
आम्हाला हे लग्न मेहसाना जिल्ह्यातील उमिया धाम मंदिरात करायचं होतं पण तिथं लग्नाची परवानगी मिळाली नाही म्हणून आम्ही हे लग्न सुरेंद्रनगर जिल्ह्यात करत आहोत. लग्नाला 50-60 लोक उपस्थित राहतील अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)