गणपतीचं चित्र बिअरच्या बाटलीवर कोणी छापलं?

    • Author, बीबीसी फॅक्स चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियातील एका बिअरच्या जाहिरातीची कॉपी शेअर केली जात आहे. जाहिरातीत या बिअरवर श्रीगणेशाचा फोटो लावलेला दिसत आहे.

दक्षिण भारतातील अनेक व्हॉट्स अॅप ग्रुपवर ही जाहिरात शेअर करण्यात आली आहे. हिंदू देवी-देवतांची चित्रं मद्याच्या बाटलीवर वापरून हिंदुंच्या भावना दुखावल्या जात आहेत, असंही या व्हॉट्स अॅप पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काही ट्वीटर युजर्सनी जाहिरातीचा फोटो ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अन्य नेत्यांना याविरूद्ध तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. बाटलीवरील देवतांचा फोटो हटविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणीही या युजर्सनी मोदी आणि सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.

अनेकांनी ही जाहिरात ट्वीट करताना ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनाही टॅग करून संबंधित जाहिरात कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

या व्हायरल जाहिरातीनुसार ऑस्ट्रेलियातील ब्रुकवेल युनियन नावाची बिअर कंपनी लवकरच एक नवीन पेय बाजारात आणणार आहे. या नवीन बिअरच्या बाटलीवर भगवान गणेशाचं चित्र आहे आणि 'पायरेट्स ऑफ द कॅरेबियन'च्या धर्तीवर त्यांची वेशभूषा बदलण्यात आली आहे.

मात्र सोशल मीडियावर असेही लोक आहेत, जे ही जाहिरात खरी मानायला तयार नाहीत. जाहिरातीच्या मूळ स्वरूपात बदल करण्यात आला असावा, असं मत हे लोक मांडत आहेत.

मात्र आम्ही केलेल्या पडताळणीमध्ये या जाहिरातीमध्ये तथ्य असल्याचं आढळून आलं आहे. ब्रुकविल युनियन नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी लवकरच एक बिअर बाजारात आणणार आहे, ज्यांच्या बाटलीवर गणपतीचं चित्र असेल.

यापूर्वीही झाला होता वाद

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स (सिडनी) मधील या कंपनीनं २०१३ मध्येही बिअरच्या बाटल्यांवर गणेश आणि लक्ष्मीच्या चित्रांचा वापर केला होता. त्यावरून बराच वादही झाला होता.

त्यावेळी कंपनीनं बिअरच्या बाटल्यांवर लक्ष्मीचं चित्र वापरलं होतं, या चित्राला मस्तक मात्र गणपतीचं होतं. बाटलीवर गाय आणि देवीचं वाहन सिंहाचंही चित्र छापलं होतं.

द टेलिग्राफ या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार २०१३ साली या कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या विवादास्पद जाहिरातीबद्दल एका तथाकथित आंतरराष्ट्रीय हिंदू संघटनेनं आक्षेप नोंदवला होता. पैसे कमावण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावनांची खिल्ली उडवणं गैर असून ते सहन केलं जाणार नाही, असं या संघटनेनं म्हटलं होतं.

बातमीमधील माहितीनुसार या हिंदू संघटनेनं ब्रुकवेल युनियनविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली होती.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या भारतीयांनीही बिअरच्या बाटलीवर लक्ष्मीचा फोटो छापण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वाद चिघळत असल्याचं लक्षात आल्यानंतर बिअर कंपनीनं एक निवेदन प्रसिद्ध करून भारतीयांची माफीही मागितली होती.

डेली टेलिग्राफनं आपल्या बातमीमध्ये कंपनीचं निवेदन छापलं होतं. यामध्ये म्हटलं होतं, "आम्ही भांडणारे नाही, तर प्रेम करणारे लोक आहोत. अजाणतेपणी का होईना आमच्याकडून हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं आम्हाला वाटतं. आम्ही यासंदर्भात माहिती घेत आहोत. काही नवीन डिझाईन्सचाही विचार करत आहोत. लवकरात लवकर या बाटल्यांसाठी नवीन डिझाईन तयार करून नव्यानं ब्रँडिंग करण्याचा आमचा विचार आहे."

हिंदू संघटनांचे प्रयत्न

काही वृत्तांमध्ये असंही म्हटलं होतं, की बिअर कंपनीच्या वेबसाईटवर गणपती उडताना दाखवला आहे आणि मध्येच त्याचा चेहरा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसारखा दिसायला लागतो.

बिअरच्या बाटल्यांवरून देवी-देवतांची चित्रं हटविण्यासाठी अनेक ऑनलाईन याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या.

ऑस्ट्रेलियामध्ये जाहिरातींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेकडे 'ब्रुकविल युनियन'ची तक्रार करू, असंही काही धार्मिक संघटनांनी २०१५ मध्ये म्हटलं होतं.

"तक्रार करून दोन वर्षें उलटल्यानंतरही बिअर कंपनी बाटल्यांवर आपत्तीजनक लेबल लावत आहे. त्यांच्या उत्पादनांच्या बाटल्या तसंच वेबसाईटवरही हिंदू देवी-देवतांची चित्र आहेत. यावर तातडीनं बंदी घालायला हवी," असं या धार्मिक संघटनांचं म्हणणं होतं.

मात्र ब्रुकवेल युनियननं आजपर्यंत बिअरच्या बाटल्या आणि वेबसाईटवरील चित्रं बदलली नाहीत.

बीबीसीनं मेल पाठवून कंपनीशी संपर्क साधला. कंपनी भविष्यात आपल्या बाटल्यांचं पॅकिंग बदलणार का, असा प्रश्न आम्ही ब्रुकवेल युनियनला विचारला. मात्र कंपनीकडून या प्रश्नावर कोणतंही उत्तर देण्यात आलं नाहीये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)