साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे कोण आहेत?

    • Author, नीतेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी यवतमाळहून

यवतमाळमध्ये होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे.

वैशाली येडे असं त्यांचं नाव आहे. त्या मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावच्या रहिवासी आहेत.

खरंतर 92 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होतं. मात्र राजकीय विरोधानंतर सहगल यांना संमेलनापासून दूर ठेवण्यात आलं.

त्यावर साहित्य क्षेत्रातून टीकाही झाली. सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांमुळे यवतमाळ जिल्हा देशभर चर्चेत आहे.

त्यामुळे आता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन करुन भावनांना हात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे.

कोण आहेत वैशाली येडे?

28 वर्षाच्या वैशाली येडे या यवतमाळच्या राजूरच्या आहेत. त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. वैशाली यांचं शिक्षण 10वी पर्यंत झालं आहे. 2009 मध्ये वैशाली यांचा विवाह सुधाकर यांच्याशी झाला. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2011 ला वैशाली यांचे पती सुधाकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

त्यावेळी वैशाली यांचा मुलगा 1 वर्षांचा होता. तर त्या दोन महिन्यांच्या गरोदर होत्या.

पतीच्या निधनानंतर त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आधारीत नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सध्या त्या हरिष इथापे यांच्या तेरवं या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. घरातल्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर ओढावणारी संकटं आणि अडचणींची कथा या नाटकात आहे.

वैशाली यांच्या आयुष्यातील खऱ्याखुऱ्या संघर्षाचे तीन प्रसंगही या नाटकात आहेत.

शुक्रवारी सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर औपचारिक उद्घाटन दुपारी 4 वाजता होईल.

नेमका वाद काय आहे?

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अनेकांनी विरोधाचा सूर लावला होता. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन हे इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते करणं हा मराठी सारस्वतांचा अपमान आहे, अशी भूमिका मनसेनं घेतली होती.

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या यवतमाळमधल्या साहित्य संमेलनात लोकांना समजेल-उमजेल असा संवाद साधणाऱ्या साहित्यिकाऐवजी इंग्रजीमधून लिखाण करणाऱ्या लेखिकेला आमंत्रण का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नयनतारा सहगल यांना आपला विरोध नसल्याचं पत्रक जारी केलं.

ज्यात राज ठाकरे म्हणतात, "महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संमेलनाचं मराठीपण जपलं जावं, अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका आहे, जी योग्य देखील आहे. पण नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल, आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील एक वाहक होणार असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचं कारणच नाही. हीच भूमिक स्पष्ट शब्दांत पक्षाचे नेते-प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी परवाच मांडली होती. पण पक्षाचा अध्यक्ष या नात्याने तीच भूमिका पुन्हा एकदा मांडत आहे. नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो."

या सगळ्यानंतरही सहगल यांना संमेलनापासून दूर ठेवल्यानंतर त्यांनी भाजपच्या भूमिकेकडे बोट केलं होतं.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "कोणताही विरोधी सूर दडपण्याचे प्रकार केवळ महाराष्ट्रातच नाहीत तर देशभर सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्यामधून असा नकार आल्यानं वाईट वाटतंय. मी अनेकदा साहित्यिक कार्यक्रमांच्या निमित्ताने मुंबई-पुण्यात गेले आहे. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या भूमिकेमुळे निश्चितच मी व्यथित आहे," असं नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत नयनतारा सहगल?

नयनतारा सहगल या जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित आणि रणजित सीताराम पंडित यांच्या कन्या आहेत.

त्यांनी कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. त्यामुळेच नेहरू कुटुंबाशी संबंधित असूनही त्यांनी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीलाही विरोध केला होता.

नयनतारा सहगल यांनी इंग्रजी भाषेतून लिखाण केले असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या 'Rich Like Us' या कादंबरीला 1986 साली साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)