You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाह फैजल : मला काश्मीरच्या राजकारणाचा भाग व्हायला आवडेल
आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राजकारणात यायचे संकेत दिले आहेत.
राजीनाम्यासंदर्भात श्रीनगरमधले बीबीसीचे प्रतिनिधी रियाज मसरूर यांच्याशी बोलताना त्यांनी राजकारणात येण्याचं नियोजन करत असल्याचं सांगितलं आहे.
बीबीसीशी त्यांनी केलेल्या चर्चेचा सार :-
शाह फैजल म्हणाले, मी कधीच म्हटलं नाही की मी नोकरी सोडू शकत नाही. माझ्यासाठी नोकरी ही लोकांची सेवा करण्याचं एक माध्यमं होतं. जनतेची सेवा अनेक पद्धतीनं केली जाऊ शकते. जे लोक प्रशासकीय सेवेत असतात, ते लोकांचीच सेवा करत असतात. मागील काही वर्षांमध्ये देशात ज्यापद्धतीची परिस्थिती आपण अनुभवली, जम्मू-काश्मीर जे पाहिलं. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर हत्या होताना पाहिल्या आहेत.
हिंदू-मुस्लीम यांच्यात वाढती दरी पाहायला मिळाली. अंगावर काटे उभे राहतील असे व्हीडिओ आपण बघितले. गोरक्षेच्या नावावर उपद्रव बघितला. हे तर कधी बघायला मिळालं नव्हतं. अभिव्यक्तीच्या नावावर स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रयत्न आम्ही पाहिले.
अशावेळी एका अधिकाऱ्याचं नोकरीत राहणं शक्य नाही. आणि समाजाच्या नैतिक प्रश्नांपासून स्वतःला वेगळं ठेवणं किंवा त्यावर प्रतिक्रिया न देणं माझ्यासाठी शक्य नव्हतं.
सिव्हिल सर्व्हिस कोडची ज्यावेळी आपण गोष्ट करत असतो, त्यावेळी अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर काही प्रमाणात बंधनं येतात. राजकारण हे लोकसेवेचाच विस्तार आहे. आतापर्यंत मी राजकारण्याबरोबर काम करत होतो.
आता स्वतः राजकारण करू शकतो. चळवळवादी होऊ शकतो. लोकांचं म्हणणं मांडणं आणि त्यांची कामं करणं, राजकारण या दोन्ही बाबी करण्याची संधी तुम्हाला देतं.
राजकारण हे लोकसेवेचाच विस्तार आहे. मी विचार करतोय की जर मला संधी मिळत असेल तर राजकारणात जरूर यायला हवं. सध्यातरी हे नक्की नाही की मी कोणत्या पक्षात प्रवेश करेन. प्रत्येक पक्षाचा एक वारसा आहे. जर राजकारणात गेलो तर मी अशा पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करेन जो की मला या राज्यातल्या सद्यपरिस्थितीवर मनमोकळेपणानं बोलायचं स्वातंत्र देईल.
मी अशा पक्षाचा एक भाग होऊ इच्छितो जिथं मला अल्पसंख्यांवर, काश्मिरींवर होणाऱ्या अन्यायावर उघडपणे बोलण्याची संधी मिळेल. मी आपल्या पर्यायांवर मंथन करत असून लवकरच निर्णय घेईन.
माझ्यासाठी प्रादेशिक पक्षात जाणं जास्त सोपं राहील. मी काश्मीरविषयी बोलू इच्छितो. मी संसदेत काश्मीरींचा आवाज बनू इच्छितो.
अनेकजण मला नवीन पक्ष काढण्याविषयी सांगत आहे. पण मला वाटतं की सध्या राज्याला एकजूटीची आवश्यकता आहे. जितके जास्त पक्ष बनतील तितकंच मत विभाजन होईल.
आतापर्यंत तुम्ही राजकारणातले खोटी नाणी पाहिली असतील. मी काहीतरी मागे सोडून राजकारणात येत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट लिहून राजीनामा
"काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या हिंसेच्या विरोधात मी राजीनामा देत आहे," असं सोशल मीडियावर पोस्ट करत काश्मीरचे IAS अधिकारी शाह फैजल यांनी राजीनामा दिला.
ते 2009 साली झालेल्या UPSC परीक्षेत देशात पहिले आले होते.
"काश्मिरात खुलेआम हत्या होत आहेत. तसंच ही हिंसा रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतंही विश्वासार्ह राजकीय पाऊल उचललं गेलं नसल्यामुळे मी IAS पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिरी लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत," त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.
याआधी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणी याच्या सैन्यासोबत झालेल्या चकमकीनंतरही फैजल यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला होता.
फैजल यांनी लिहिलं होतं की, ते काश्मीरच्या सद्यस्थितीमुळे दुःखी आहेत. त्यावेळेस ते श्रीनगरमध्ये शिक्षण विभाग प्रमुख या पदावर होते आणि काश्मिरमध्ये होणाऱ्या हिंसेसंदर्भात माध्यमांच्या भूमिकेबद्दल ते नाराज होते.
काश्मिरी तरूणांची तुलना करण्यासाठी त्यांचा आणि बुरहान वाणीचा फोटो शेजारी शेजारी ठेवून अनेकदा माध्यमांत दाखवला गेला होता. त्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "देशातली माध्यमं काश्मिरात होणाऱ्या हिसेंचं चुकीचं दर्शन घडवत आहेत. लोकांमध्ये व्देष पसरवून त्यांच्यात दरी निर्माण करत आहेत."
35 वर्षीय फैजल 2009 साली UPSC परीक्षेत देशात पहिले आले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिले काश्मिरी ठरले. अल्पावधीतच ते तरूणांचे आयकॉन म्हणून प्रसिद्धीस आले.
फेसबुकवर लिहिलेल्या आपल्या सविस्तर पोस्टमध्ये ते पुढे लिहितात, "जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जावर सतत हल्ला होत आहे. देशातल्या 20 कोटी मुस्लीमांना हिंदुत्ववादी शक्तींच्यामार्फत हीन वागणून देण्याचा प्रयत्न होत आहे. कधी कधी तर त्यांना अनुल्लेखानेच मारण्यात येतंय. त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचा प्रयत्न होतोय."
प्रखर राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. "भारतात प्रखर राष्ट्रवादाच्या नावाखाली असहिष्णुता आणि व्देष वाढतोय. आणि म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे."
सध्याच्या राज्यकर्त्यांकडून CBI, RBI, NIA यांसारख्या राष्ट्रीय संस्थांची मुस्कटदाबी होतेय. असं होत राहिलं तर घटनेच्या मूळ पायाची शकलं होतील. हे आत्ताच थांबवायला हवं, असंही ते म्हणाले.
याविषयी प्रतिक्रिया देताना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत म्हटलं की, "प्रशासकीय व्यवस्थेने जे गमावलं ते राजकारणाने कमावलं."
शाह फैजल यांच्या पोस्टनंतर अनेक जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.
राशीद शेख लिहितात, "आश्चर्य आहे, सध्याची परिस्थिती जर प्रशासकीय अधिकारी बनून बदलता येत नसेल तर राजकीय नेता बनून कशी बदलणार? मागे खेचणारे घटक तर दोन्ही परिस्थितीत सारखेच राहातात."
अनेकांनी फैजल यांचं अभिनंदनही केलं आहे. शफ्फात नक्शबंदी म्हणतात, "असा धाडसी निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता. तुमचं खूप अभिनंदन."
साद गनाई यांनी ट्वीट केलं आहे, "तुमचं अभिनंदन. काश्मिरी जनतेसाठी काही करू पाहाणाऱ्या तुमच्यासारख्या व्यक्तीवर आम्हाला खूप विश्वास आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)