You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ठाण्याच्या रौनकने CATमध्ये असे मिळवले 100 पर्सेंटाइल
देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असा CATचा लौकिक आहे. देशभरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM)मधील प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा अर्थात CAT घेण्यात येते. यावर्षी ठाणे येथील रौनक मुजूमदारनं कॅटच्या परीक्षेत 100 पर्सेंटाइल मिळवले.
CATच्या परीक्षेत रौनकसह 11 जणांनी 100 पर्सेंटाईल मिळवले आहेत.
मुजूमदार कुटुंब मूळचे पश्चिम बंगलाचे आहे. रौनकचा जन्म आणि त्याचं बारावीपर्यंतचं शिक्षण हे मुंबईमध्येच झालं आहे. IIT कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेला रौनक सध्या गुरुग्राममध्ये एका अमेरिकन कंपनीमध्ये जॉब करत आहे.
काम करत असतानाच अभ्यासाचंही वेळापत्रक सांभाळत रौनकनं या परीक्षेत यश मिळवलं आहे.
रौनकच्या यशाची गुरुकिल्ली
आपल्या यशाचा फॉर्म्युला रौनकनं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितला. "ऑगस्ट 2018 पासून मी CATच्या तयारीला सुरुवात केली. IIT कानपूरमध्ये असतानाच मी मॅनेजमेंटसंबंधीचे काही अभ्यासक्रम पूर्ण केले होते. त्यामुळे CATच्या तयारीचा माझा पाया पक्का होता. म्हणूनच मी सर्वात जास्त भर सराव परीक्षांवर दिला. प्रत्येक आठवड्याला मी एक किंवा दोन सराव परीक्षा देत होतो," असं तो म्हणाला.
सराव परीक्षांइतकंच महत्त्व त्या परीक्षांच्या विश्लेषणालाही असल्याचं रौनक म्हणाला. त्यानं सांगितलं, "प्रत्येक चाचणीनंतर केलेल्या विश्लेषणामुळं माझं नेमकं कुठे चुकतंय हे माझ्या लक्षात यायचं आणि मग मी त्या चुका सुधारू शकायचो."
IIM अहमदाबाद, IIM कोलकाता आणि IIM बेंगलुरू यांना रौनकनं प्राधान्य दिलं होतं. या तीनही संस्था अतिशय उत्तम दर्जाच्या असून यातील कोणत्याही संस्थेत प्रवेश मिळाला तरी मला आनंदच होईल, अशी भावना रौनकनं व्यक्त केली.
"IIM मधून कोणतंही स्पेशलायझेशन करता येत नाही. पण इथून MBA केल्यानंतर मी फायनान्स या विषयात स्पेशलायझेशनचा विचार करेन," असं आपल्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना रौनकनं सांगितलं.
IIMचं महत्त्व
मॅनेजमेंटचा अभ्यासक्रमासाठी IIM अग्रगण्य समजल्या जातात. याठिकाणी मॅनेजमेंट या विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट आणि एक्झिक्युटिव्ह कोर्सेस शिकवले जातात.
IIMमधून MBA करायचे असेल तर CAT ही राष्ट्रीय पातळीवर प्रवेश परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते.
CATची परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला मेरिटनुसार देशातल्या विविध IIMमध्ये दोन वर्षांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन करता येते. या परीक्षेव्यतिरिक्त उमेदवाराला मुलाखत आणि ग्रुप डिस्कशनला सामोरं जावं लागतं.
देशात एकूण 20 IIM आहेत. महाराष्ट्रात नागपूरमध्ये 2015पासून IIM सुरू झाले आहे.
- IIM अहमदाबाद, गुजरात.
- IIM कोलकता, पश्चिम बंगाल.
- IIM बेंगळुरू, कर्नाटक.
- IIM इंदूर, मध्य प्रदेश
- IIM लखनऊ, उत्तर प्रदेश.
- IIM कोझिकोद, केरळ.
- IIM शिलाँग, मेघालय.
- IIM रायपूर, छत्तिसगड.
- IIM रांची, झारखंड.
- IIM रोहतक, हरियाणा.
- IIM काशीपूर, उत्तराखंड.
- IIM तिरुचापल्ली, तामिळनाडू.
- IIM उदयपूर, राजस्थान.
- IIM अमृतसर, पंजाब
- IIM बोधगया, बिहार
- IIM नागपूर, महाराष्ट्र
- IIM संबलपूर, ओडिशा.
- IIM सिरमौर, हिमाचल प्रदेश.
- IIM विशाखापट्टनम, आंध्र प्रदेश.
- IIM जम्मू, जम्मू आणि काश्मीर
CATचा स्कोअर देशातल्या अनेक नामवंत मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेशासाठी ग्राह्य धरला जातो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)